बाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबईतला महागाईचा प्रश्न सुटल्यासारखा वाटतो; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो.
पण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच. जपानमध्ये असताना जरी मला एकदाही भूकंप जाणवला नाही तरी घरी परत गेले असताना मला आणि इतरांना बसलेले भूकंपाचे काही सौम्य धक्के…

मला बसलेला धक्का
स्थळ: हनुमान मार्ग, विलेपार्ले
रिश्टर स्केल: २-३
सालाबाद्प्रमाणे ह्याही वर्षी सात वाजता आय. सी. आय. सी. आय. बॅंकेच्या कट्टयावर भेटायचं ठरलं. मी एकटीच मुलुंड नावाच्या परग्रहावरून येणार होते. अशावेळी मर्फीच्या नियमानुसार गाडया हमखास लेट असतात हे लक्षात घेऊन नेहमीपेक्षा चांगला अर्धा तास अगोदर निघाले आणि अगदी सात नाही पण सात पाचला संकेतस्थळी पोचले. बघण्यासारखे इतरही लोक तिथे असल्याने सव्वा सात कसे वाजले ते कळलंच नाही. मग मात्र न राहवून फोन लावला.
मी: हॅलो…मॅडम आहात कुठे? सातला भेटायचं ठरलं होतं! मी लांब राहून सर्वात आधी पोचली आहे याबद्द्ल तुला काही लाज???
ती: थंड घे. दोन मिनिटात निघतेच. तोपर्यंत तू ४९-९९ मधे जाऊन टाईमपास कर.
मी: काssssय??
ह्यावर नॉर्मल माणसं सॉरी म्हणतात पण आमच्या ब्रुटसने मलाच वर एक शामची आई छाप डायलॉग कम टोमणा मारला.
ती: बाळ शाम, शरीराने भारतात आलास तसाच मनानेही येण्याचा प्रयत्न कर हो.


आईला बसलेला धक्का
रिश्ट्र स्केल आईच्या मते १० वगैरे।
आई: काय गं, परिक्षा कशी झाली?
मी: रिझल्ट लागेपर्यंत उत्तम.
आई: रिझल्ट कधी आहे मग?
मी: नवव्या महिन्यात!
आई: काssssssssssssssssय????? बरी आहेस नां???
मी: ही हा हा हा…..

जपानी न येणा-या लोकांसाठी तळटीप
जपानीत महिन्यांना नावे नसतात. जानेवारीला पहिला महिना, फेब्रुवारीला दुसरा महिना असं म्हणतात. त्यामुळे नववा महिना म्हणजे सप्टेंबर ही गोष्ट हुशार वाचकांच्या लक्षात आलीच असेल.

मराठी न येणा-या लोकांसाठी तळटीप
अरे हो! ते हा ब्लॉग वाचण्याच्या भानगडीतच पडणार नसल्याने प्रश्न मिटलेला आहे.आणि जर चुकून तुम्ही कुण्या अमराठी भाषिकाला हा किस्सा विनोद म्हणून सांगितलातच तर स्वत:चा पोपट होऊ नये म्हणून तुम्ही यथाशक्ती उकल करालच की!

9 Comments:

  1. bindhast said...
    ultimate....hyatala pahila dhakka mala japan la jaun yayachya adhipasunch basato ahe...
    var eikawe lagate 'evadhe welewar yayachech kashala'
    Yawning Dog said...
    "मराठी न येणा-या लोकांसाठी तळटीप" अल्टिमेट आहे :)

    मस्तच आहे ब्लॉग
    Unknown said...
    तुझे लेखन चातुर्य फारच वाढलेले दिसत आहे - कारण : - "केल्याने देशाटन ... पंडित मैत्री ... सभेत संचार ... मनुजा चातुर्य येते फार ...
    Dk said...
    hahaha! good one!
    Saee said...
    बिनधास्त, yawning dog, दीप आणि चिन्मय प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
    बिनधास्त, खरं आहे तुझं. सर्वात लांबच्या लोकांची तर अतिच गोची होते. म्हणून आजकाल मी options ठेऊन भेटायला जाते...
    चिन्मय, पंडित मैत्री म्हणजे तुझ्याशी मैत्री असं तर नाही ना म्हणायचं तुला? मग ठीक आहे...[:)]
    ऋयाम said...
    gud. :)
    Kaustubh said...
    :)
    प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...
    काल तुमच्याशी गप्पा झाल्या आणि आज तुमच्या ब्लॉगवर पोचलो. तुमचा ब्लॉग तुम्हाला शोभणाराच आहे.
    नरेंद्र गोळे said...
    सुबक ठेंगणी व्यक्तीरेखा घेऊन कोण बॊ लिहीतय? असे वाटले. पण मग गॆसवर मुकादे जाळल्याचे वाचतांना पुनर्भेटीचा आनंद झाला. तेव्हाच खुलासा झाला. बाकी तुझ्या बोलण्यात आणि लेखनातही सुरस सहजता आहे. अनेक जपानी संकल्पना तू आमच्यापर्यंत पोहोचवू शकशील या मीनल यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. तेव्हा चालू देत लेखन, वेगाने.

Post a Comment