लग्न

असेच गणपतीचे दिवस. दणकवून झालेल्या आरत्या, डाव्या उजव्या बाजूंचं साग्रसंगीत जेवण, अटीतटीने खाल्लेले मोदक आणि मोदकांवर तुपाएवढांच पळ्यांनी पडणारा आग्रह असं झोपेचं मस्त रसायन जमलं होतं. पण लवकरच पाहुण्यांची ये-जा सुरु होणार म्हणून प्रत्येकाचंच बाजीप्रभू होऊन खिंड लढवणं चालू होतं. एवढयात कोणीतरी ताईच्या लग्नाचा अल्बम आणला आणि मग गप्पा पुन्हा रंगात आल्या. ब-याच वेळाने लक्षात आलं. आत्तापर्यंत अखंड चिवचिव करणारं, मावशीला टेडी बेअर समजून चिवळणारं माझं भाचरू कुठे गेलं? आतल्या खोलीत शोधलं, बाहेर शोधलं, अगदी शेजारी पण विचारलं त्यात ५-७ मिनिटं गेली असतील नसतील तेवढयात स्वयंपाकघरातून एक ठणठणीत आवाज आला. “मी इथे आहे!” (“तुम्हाला मोठया माणसांना एवढं साधं कसं कळत नाही?” असं मनात असताना सात्विक रागाचा जो एक नैसर्गिक टोन लागेल तोच टोन…अर्थात तिच्या दृष्टीने पोकेमॉनमधल्या पिकाचू आणि बल्बासॉरची लढाई झाली तर कोण जिंकेल हे सांगता न येणारं कोणीही लहानंच होतं! त्यामुळे नेमकं उलट तिच्या मनात आलं नसेलच असं नाही)
चेहरा स्वयंपाकघरातल्या फ्रीज आणि कपाटाच्या खबदाडीत बसल्याने घामाघूम आणि रागाने अधिकच गोलगरगरीत झालेला होता. अगदी थेट कंपासने वर्तुळ काढावं तसा! डोळे एकटक तिच्या आईवर रोखलेले… तेव्हा क्षणभर त्या टपो-या बोलक्या डोळ्यांना सांगावंसं वाटलं “तुम्ही जरा गप्प बसलात तरच मला तिचं बोलणं ऐकता येईल.” अशा सगळ्या एकंदर अवतारावरून मेलोड्राम्याची चिन्ह स्पष्टच दिसत होती.
“सांग बरं काय झालं??” ताई.
“तुम्ही माझे आई-बाबा आहात नां?” एकदम सिरियस सन्नाटा. (पाठीमागे एखादं शोकसंगीत असतं तर एकदम थेट क-केविलवाणा प्रसंग झाला असता!)
“अगं हो. असं का विचारतेस?” तिच्या आईचा सांत्वन मोड
“मग तुमच्या लग्नाला मला का नाही बोलावलंत? माझा एकपण फोटो नाहीए.”
अगदी तोंडाशी आलेलं हसू दाबत तिला मिठीत घेत शक्य तितक्या सहजपणे ताई म्हणाली,”मनू सॉरी! पण तुझा जन्म थोडा उशिरा झाला म्हणून… नाहीतर नक्की बोलावलं असतं तुला…”
“मी माझ्या बच्चूला माझ्या लग्नाला नक्की बोलावणार आहे”….तिच्या ह्या जाहीरनाम्यावर सगळ्यांनी खोखो हसून घेतलं.
*****
आणि असाच त्या दिवशी तोमोमीच्या लग्नाचा अल्बम पहात होतो. तेव्हा फोटोतल्या एका गोब-या गालांच्या किमोनो घातलेल्या छ्बकडीकडे बोट दाखवून ती म्हणाली,” ही रेना. माझी मुलगी. आता किती वेगळी दिसते नाही!”
इथे माझा आश्चर्याने आ वासलेला आणि मला ह्यात आश्चर्य वाटावं ह्याचे तोमोमीला आश्चर्य! अशा आश्चर्यांच्या देवाणघेवाणीलाच “सांस्कृतिक धक्का” म्हणत असावेत कदाचित.
तर ह्या सांस्कृतिक धक्क्यातून सावरत माझ्या निरागस मनात जे आगाऊ प्रश्न आले ते शक्य तितक्या नम्रपणे विचारले. “तुझ्या लग्नात तुझी मुलगी यावी हे कसं बरं झालं?”
“त्यात काय विशेष? इथे असं कितीतरी वेळा होतं!” माझ्या आश्चर्यात भर.
शेवटी एकदा सरळच विचारून टाकलं,” तुझं लग्न तुझ्या मुलीच्या जन्मानंतर कसं झालं?”
“तसं नाही काही. नव-याच्या family register मध्ये माझ्या नावाची नोंद झाली की रीतसर लग्न झालं असं आम्ही मानतो. लग्नाचा वाढदिवसही त्या नावनोंदणीच्या दिवशीच साजरा करतो. जिंजामध्ये जाऊन देवाच्या साक्षीने ’फक्त’ विधी होतात. ह्या लग्नविधी आणि रिसेप्शनच्या खर्च ४०,००००-५०,०००० येनच्या जवळपास होतो. तो करण्याची ऐपत आली की मग विधी केले तरी चालतात. मी दोन मुलांची आई झाल्यावर कुठे पुरेसे पैसे आम्ही साठवू शकलो.”
“एवीतेवी मुलं झालीच होती तर मग एवढया वर्षांनी ते ’फक्त’ विधी करण्याची काय गरज?” असाही प्रश्न मला पडलाच. (पण असले प्रश्न विचारायला सुधीर गाडगीळ असावं लागतं सई मुंडले नाही हे वेळीच लक्षात येऊन आवरलं.)
*****
चला म्हणजे फ़ारा वर्षापूर्वी माझ्या चिमखडया भाचीच्या बालमुखातून बाहेर पडलेले बोल जपानात खरे होऊ शकतात म्हणायचं म्हणून तिला फोन केला तर ती म्हणाली,”अगं तेव्हा मी लहान होते; पण आता मोठ्ठी झालिए. मला माहित्येय की लग्न झाल्यावरच बच्चू होतं. मग त्याला नाहीच बोलावता येणार नां आईबाबांच्या लग्नाला! तिने एप्रिल फूल केलं असेल तुला!”
ती आणि मी दोघीही किती बदलल्या आहोत ह्या विचाराने तेव्हासारखंच आत्ताही हसायला आलं.

हाइकू हा नावाप्रमाणेच चिमुकला (जपानमध्ये जन्मला म्हणूनही असेल कदाचित!) पण अर्थपूर्ण काव्यप्रकार.
माझ्या शाळेतल्या जपानीच्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की हाइकूला यमकाचं बंधन नाही. पण अक्षरसंख्येवर आणि शब्दनिवडीवर मात्र आहे. तीन ओळीत अनुक्रमे ५-७-५ सिलॅबल आवश्यक आहेत. आता मराठी आणि जपानीत सिलॅबल्स मोजण्याची पद्धत सारखी असल्यामुळे मराठीत हाइकू रचताना इंग्रजीएवढा प्रश्न येणार नाही. (उदा. हाइकू ह्या शब्दात हा-इ-कू अशी तीन सिलॅबल्स आहेत.)
हाइकू रचताना “किगो” नावाच्या खास हाइकूसाठी वापरल्या जाणा-या शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे. हे शब्द रोजच्या बोलण्यात वापरले जात नाहीत. मराठीत उदाहरण द्यायचं झालं तर मला ऐवजी मजला, झाड ऐवजी तरू असे खास कवितेसाठी राखून ठेवलेले शब्द आपल्याकडेही आहेतच. जपानमध्ये चारही ऋतूंचं आपापलं असं वैशिष्ठ्य आहे. ते दाखवणारे हे शब्द असतात. पण हे बंधन लोक आजकाल फारसं पाळत नाहीत.
झालंच तर ओळ संपताना “किरेगो” म्हणजे ओळीचा शेवट दाखवणारे शब्दही वापरणे आवश्यक आहे. उदा. या/केरी/ओरु वगैरे. आता इतर भाषेत हाइकू लिहिणे कठीण होण्याचं कारण म्हणजे हे केरी/ओरु वगैरे शब्दच अर्थवाही असतात. उदा. कुठल्याही क्रियापदाला जोडून केरी आलं की त्या क्रियापदाचा अर्थ सरधोपट न रहाता “असं असेल का?” असा होतो. उदा. “वातारू” ह्या क्रियापदाचा साधा अर्थ “ओलांडणे” असा आहे. पण हेच जर मी “वातारीकेरी” असं म्हटलं तर “क्षयझ काहीतरी ओलांडत असेल का?” असा अर्थ सूचित होतो. (म्या पामराला ’जणू, भासे, गमे असे देशी शब्द आठवले!) ह्या छोट्याशा शब्दात अर्थाच्या खाणी असतात असं त्या म्हणाल्या. त्यामुळे इतर भाषेत इतक्या कमी शब्दांत पण तितक्याच प्रभावीपणे अर्थ व्यक्त करता येईलंच असं नाही.
साधारणपणे हाइकूचा विषय निसर्ग असतो. विषेशत: साध्याशाच गोष्टीतून नव्याने जाणवलेले काहीतरी, नैसर्गिक चमत्कार पाहिल्यावर कवीच्या मनात उमटणारे भाव, एखाद्या वेगळ्याच कोनातून टिपलेला निसर्ग वगैरे. उदा. माझ्या गावात एक जुना आणि अवाढव्य दगडी पूल आहे. त्याची उंची जवळजवळ ३० एक मीटर असावी. मध्यरात्री त्या पुलाखालून जाताना कवीला अचानक भास झाला की आत्ता कुणीतरी तो पूल ऒलांडून जात आहे. पण पाहिलं तर वर कुणीच नव्हतं. मग तो म्हणतो की कदाचित चंद्रच असावा! पुष्कळ प्रयत्न करूनही ही कल्पना मला मराठी हाइकूत नाही उतरवता आली. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं!
आता एकदम वोरिजिनल, गरमागरम भज्यांसारखी कुरकुरीत कल्पना सुचेपर्यंत हाइकूदेवतेची प्रार्थना करणे किंवा तोपर्यंत इतर दिग्गजांनी तळलेल्या आयत्या भज्यांवर ताव मारणे ओघाने आलेच!

आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात. हे एकेक हाताच्या पंजाएवढे कोळी, कमावलेल्या शरीराची चिलटं, फावल्या वेळेत मारण्यासाठी रंगीबेरंगी माशा असे अनेक स्वघोषित रूममेट्स माझ्या घरी जाऊन येऊन असतात. देवाने पंख दिलेत म्हणून उगाच ते माझ्या कानाशी येऊन फडफडवण्यात त्या माशांना, जाळं विणता येतं म्हणून उगाच कानाकोप-यांत जाळी विणण्यात त्या कोळ्यांना, आणि रात्री सहा ढेंगा वर करून निवांत झोपायचं सोडून उगाच गगनभरा-या मारण्यात झुरळांना काय सुख मिळतं कोणास ठाऊक. पण ह्यांची आणि आमची शाळाकॉलेजपासूनची ओळख म्हणून खपवून घेते झालं! त्यामुळेच तर घरात सापडलेल्या पहिल्यावहिल्या मुकादेला मी निरागसपणे बाहेर टाकून जीवदान दिलं.
आता “मुकादे म्हंजे रे काय भाऊ?” यासारखे प्रश्न तुम्हाला पडणं किंवा दे च्या आधी मनातल्या मनात स्पेस द्यावंसं वाटणं सहाजिक आहे. प्रकरण ’चावट’ असले तरी रोमॅंटिक वगैरे अजिबात नाही. मुकादे हा शब्द जपानी चित्रलिपीत 百足असा लिहितात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे ’शंभर’ आणि ’पाय’ असा होतो. ह्याचाच अर्थ मुकादे हा २० किंवा त्याहून अधिक पाय आणि दोन खतरनाक नांग्या असलेला काळाकुट्ट, तुरुतुरु पळणारा सेंटिपीड जातीचा किडा आहे. मराठीत मुक्याच्या देण्याघेण्याने मनात गुदगुल्या होत असल्या तरी मुकादेने मुका घेतला तर सूज, उलटया, अंग काळेनिळे पडून बधीरपणा येणे, जळजळ हे सर्व होतं. (अनुभव नसल्याने फार वर्णन करता येणार नाही!) पण माणूस मरत नाही हे नशीब. “मुकामुका होतंय” म्हणजे जपानीत “कसंतरी होतंय” त्यामुळे पठ्ठा जपानीत आपल्या नावाला जागून आहे. मुकामार मधला ’मुका’ म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. त्याचा उगम बहुदा ह्या जपानी ’मुकामुका’ मध्ये असावा! असंही ऐकलंय की मुकादे नेहमी जोडीने फिरतात. त्यामुळे एक सापडला की दुसरा कुठेतरी निवांत प्लानिंग करत असेल हे सांगता येत नाही. मी जिथे रहाते तिथे औषधालाही माणूस सापडत नाही त्यामुळे जिवंत माणूस दिसला की माझ्यासारखाच मुकादेलाही आनंद होत असावा. आता आनंद व्यक्त करण्याची काहींची पद्धत असते चावरी! त्याला ते बिचारे काय करणार? असाही एक सहानुभूतीपूर्ण विचार माझ्या मनात येतो.
साधारण जूनच्या सुमारास जपानात ’त्सुयू’ म्हणजे ’मान्सून’ सुरु झाला की मुकादे फॉर्मात येतात. बाथटब, छान घडी करून ठेवलेले कपडे, चपला, उशा, गाद्या ह्या मुकादेच्या आवडत्या जागा आहेत. जपानी लोक साधारण मुकादे आला की त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून वरून दगड / काठीने बडवतात, गरम तेलात / पाण्यात टाकतात, किंवा मुकादेसाठीचा फवारा मारतात. पहिला साकुरा ही जशी जपान्यांसाठी बातमी असते तशीच पहिला मुकादे ही माझ्यासाठी. म्हणजेच कोणीही क्षयझने “आज मी घरात मुकादे पाहिला” असं म्हटलं रे म्हटलं की त्यादिवशीपासून लगेच मी चपला, गाद्या, उशा, कपडे वगैरे काहीही आधी झटकून मगच वापरते.
अगदी पहिल्या वर्षी “तुला इथे येऊन एक वर्ष झालं तरी मुकादे नाही दिसला?? घाबरला वाटतं तुला!” अशी खूप टिंगल झाली. पण सवयीनुसार तीही मी झटकली.
आणि एक दिवस नेहमीसारखी़च घाईत शाळेत जायला निघाले होते. मोजे घालून बूट घालायला उचलला तर खाली एक आठ इंची मुकादे माझी वाट बघत वळवळत होता. हसावं की रडावं तेच कळेना. मुकादेचा स्प्रे, गरम पाणी, तेल, बत्ता, मुसळ, वरवंटा असं काहीही जवळ नसतानाच्या निःशस्त्र अवस्थेत मुकादेशी वीसेक हात करणे भाग होतं. (अवांतर: बुटाने मुकादे मरत नाही.) मराठमोळं रक्त उफाळून आलं आणि त्याच तिरमिरीत त्याला चिमटयात पकडलं, सरळ गॅसवर धरलं आणि खालून गॅस पेटवून त्याचा एनकाउंटर केला. आणि त्यानंतर मिरच्यांची धुरी, एस. टी श्टॅंडावरील स्वच्छतागृहे, शाळेतली प्रयोगशाळा, २५ वर्ष सलग न धुता वापरलेले मोजे, जळका टायर ह्या सगळ्या वासाचं मिश्रण असलेला एक अवर्णनीय वास घरभर भरून गेला. तो वास एका स्प्रे वगैरे मधे भरून घेता आला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे माझे बॉस, वायफळ गोष्टींचा रिपोर्ट लिहायला लावणारे सुपर्वायझर, मी केलेल्या मसालेभातावर (“केवढा तिखट आहे!” असं म्हणत) यथेच्छ ताव मारणारे काही जपानी माझ्या दिशेने कूच करताना पाहून मी स्कंकसारखा ह्या स्प्रेचा वापर नक्की केला असता.
आत्तापर्यंत सापडलेल्या मुकादेची संख्या सम असल्याने सध्या मी निवांत आहे. लहानपणापासून जून म्हटला की नव्याकोर्‍या पुस्तकांचा, ओल्या मातीचा, आंब्याफणसाचा असल्या वासांची नाकाला सवय होती. आता मात्र त्यात काही नव्या वासांची भर पडली आहे.
मी मुकादे आला होता वगैरे सांगितल्यावर माझ्या काही हितचिंतक मित्रमैत्रिणींनी “काहीतरी शेंडया लावू नकोस. आता पुन्हा मुकादे आला नां की त्याचा एक फोटो काढून पाठव.” असे उत्साहवर्धक उद्गार काढल्यामुळे त्यांच्यासाठी हे पुराव्याने शाबीत! मुकादेचे अधिक रोमांचकारी छायाचित्रे व किस्से पाहाण्यासाठी यू-टयूब आहेच.


इतरांच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी कोणीतरी बाई येतात. कालपरत्वे प्रमोशन मिळून त्यांच्या (वयानुसार) ताई, मावशी, काकू किंवा आत्या होतात. पण भारती आमच्या घरी आली तीच भारती म्हणून आणि घरातलीच एक होण्यासाठी तिला कधीच मावशी आणि काकूसारख्या उपपदांची गरज पडली नाही. उलट तिच्या येण्याने माझ्या आईचीच “बाबूची आई” अशी एक नवीन ओळख तयार झाली.
उंच काटक बांधा, रेखीव चेहरा पण बसलेली गालफडं, सततच्या पानतंबाखूने रंगलेले ऒठ, कनवटीला खोचलेला बटवा आणि त्यात खुळखुळणा-या कात आणि चुन्याच्या छोट्या डब्या, चापूनचोपून नेसलेली धुवट नववारी साडी आणि त्यातून क्वचित डोकावणारं खपाटीला गेलेलं पोट. मी जवळजवळ २५ वर्षापूर्वी पाहिलेली भारती ही अशी होती आणि आजही ती अशीच असेल अशी मला खात्री आहे.
भारतीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. ते मला लक्षात रहायचं कारण म्हणजे मंगळसूत्राला चांदीच्या वाटया मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिल्या. पण भारतीची विचारपूस करताना कळलं की पदरात दोन मुलं ठेवून भारतीचा नवरा जो मुंबईला आला तो ह्या प्रचंड मायानगरीत पुरता रमला. आजतगायत तो जिवंत आहे किंवा नाही हेदेखील भारतीला ठाऊक नाही. तो परागंदा झाल्यावर मुलांना गावीच ठेवून पैशाच्या (आणि कुंकवाच्या?) शोधात ती मुंबईत आली. पण आजही त्याच्या आठवणींइतकंच काळं पडलेलं ते मंगळसूत्र मात्र तिने जपून ठेवलं आहे.
भूतकाळात जरी भारतीला वाईट अनुभव आले असले तरी त्याचे सावट तिच्या कामावर कधीच पडले नाही. माझी आज्जी स्वच्छ्तेच्या बाबतीत भयंकर काटेकोर होती. मोलकरणीने घासलेली भांडी ती पुन्हा विसळल्याखेरीज वापरत नसे. आधीच्या मोलकरणींच्या ते पथ्यावरच पडायचं. पण आपण घासलेली भांडी आज्जी पुन्हा विसळून घेते ह्यात कुठेतरी आपण तर कमी पडत नाही नां असं वाटून तिने स्वत:च ती दुस-यांदा विसळायला सुरुवात केली.
माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्या घरी एक पितळी तपेलं होतं. प्यायचं पाणी त्या तपेल्यात उकळलं जायचं. माझ्या आज्जीचा त्या तपेल्याशी काहीतरी ‌ऋणानुबंध असावा किंवा कदाचित तिच्या तरुणपणीच्या आठवणी त्या तपेल्याशी जोडल्या गेल्या होत्या की काय कुणास ठाऊक पण ती त्या तपेल्याची सर्वतोपरी काळजी घेत असे. रोजच्या वापरामुळे ते काळं पडंत असे. की लागलीच आज्जी ते जातीने आधी आमसुलाने आणि नंतर पावडरने लख्ख धुवून काढत असे. आता पूर्वीचं जुने तपेलं ते! चांगलंच जाडजूड होतं. ते कमरेत वाकून धुवायचं म्हणजे चांगलंच दिव्य होतं. मोलकरणी तर दूरच पण घरच्या कुणीही ते धुतलेलं आज्जीला पसंत पडत नसे. आजी म्हातारी होत होती पण तपेल्याची सेवा करण्यात काही खंड नव्हता. एक दिवस भारती आली आणि तिला काय वाटलं कोण जाणे. काहीही न बोलता तिने ते तपेलं घेतलं आणि चक्क करून पुन्हा जागेवर ठेवून दिलं. आज्जीही तेव्हा काहीच बोलली नाही पण त्या दिवसापासून तपेलं काळवंडलं की ते घासायच्या भांडयांबरोबर ठेवलं जायला लागलं. तपेल्याची जबाबदारी जशी भारतीच्या पदरात पडली तसाच आज्जीचा विश्वासही…
भारती मुंबईत तिच्या आत्त्याकडे रहायला आली. पहिल्यापहिल्यांदा आत्याच्या ओळखीनेच तिला कामे मिळत गेली. पण मग आत्याबाईंचे कुटंब जसजसे विस्तारत गेले तसतशी तिथे भारतीची अडचण व्हायला लागली. स्वत:ची जागा शोधणे जितके अपरिहार्य तितकेच अशक्य होते. पैशाची मदत करणारे आमच्यासारखे बरेच लोक होते. पण खरी मदत केली ती बाग कुटंबियांनी. बरीच वर्षे ती त्यांच्या घरीच रहायला होती. त्यामुळे एकवेळ दुस-या कुणीही लवकर किंवा उशीरा बोलावले तर भारतीने नकार दिला असता पण बागवहिनींचा शब्द तिने कधीही खाली पडू दिला नाही. हां आता त्या बागवहिनींचेही पाय मातीचेच त्यामुळे त्याही तिला कधी वेडंवाकडं बोलल्या नसतीलंच असं नाही. त्यामुळे ती तक्रारही करायची पण लगेच दिलजमाईही होत असे. एकदा माझ्या आईने मोदक केले होते. आमच्या घरी कुठ्लाही नवीन पदार्थ केला की तो भारतीसाठीही राखून ठेवला जात असे. तसेच चार मोदकही भारतीला आणि तिच्या मुलांना दिले. दुस-या दिवशी आईने भारतीला विचारलं,” काय मग जमले होते का मला मोदक?”
तर भारती हसत म्हणाली,” अगं बाबूची आई, मी खाल्लेच नाहीत.”
“का गं? चार होते नां?” पुन्हा आई.
“अगं दोन मुलांना दिले आणि दोन शोनाच्या आईला (सौ. बाग) आवडतात म्हणून तिला दिले.”
तेव्हापासून आई मोदक केले की तिच्याचबरोबर ते बागांकडे पाठवे. देताना थट्टेने म्हणे “दोन मुलांना, दोन तुला आणि दोन तुझ्या लाडक्या शेठाणीला!”
भारतीच्या ह्या वागण्याला बरेच लोक तिची मोठेपणाची हौस म्हणून हिणवतही असतील. आणि ब-याचवेळा ती स्वत:ला तोशीस पोचवून तसं करतंही असे. माझ्या भावाच्या मुंजीत तिने घातलेलं ५०१ रुपयांचे पाकीट काय किंवा आजीने तिला दिलेला स्वेटर तिने गावी आईसाठी पाठवून देणं काय ह्या सगळ्याबद्दल ती माझ्या आईची बोलणीही खात असे. ब-याचदा पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण मिरवण्याचा मोह भल्याभल्यांनाही आवरत नाही. मग ह्यापैकी काहीच नसलेल्या तिने आपल्याकडची मनाची श्रीमंती मिरवली तर त्यात काय चूक?
ती फटकळ आहे असंही ब-याच जणांचं मत होतं. मला वाटतं फाटक्या खिशाचा फाटक्या तोंडाशी जवळचा संबंध असावा. ती आदर्श होती असा दावा मी करणार नाही. पण तिच्यातले दोष झाकण्याएवढे गुण नक्कीच तिच्यात होते. पण त्याचबरोबर समस्त मोलकरीण जमातीचे काही गुणविशेषही होते. कधीकधी भिंतीचे कान बनून ती घरोघरीच्या नाना परी आमच्यापर्यंत पोचवत असे, केर काढायला आल्यावर पसारा पडलेला असेल तर भरधाव तोंड सोड्त असे. माझं वजन वाढून मी बेढब झाल्यामुळे मला जीन्स कशी शोभत नाही हे ती जसं सहजपणे सांगे तितक्याच निरागसपणे “बाबूच्या घरचा रांगोळीचा स्टिकर वर्षभर टिकून आहे. कारण ह्या घरची माणसं पुण्यवान आहेत” हेही तीच सांगू जाणे. चांगलं बोललं की तो निरागसपणा आणि टीका केली की फटकळपणा हा दुटप्पीपणा नाही का?
आज भारतीची पूर्वीसारखी रोज भेट होत नाही. आजही ती आपल्या गळक्या घरात रहात असेल की मुंबई सोडून गावाकडे परत गेली असेल??? माझ्यासारखीच दुपारचा चहा पिताना किंवा पिझ्झा खाताना तिला तिच्या बाबूच्या घराची आठवण येत असेल का???
जपानात कुणाला मोलकरीण ही संकल्पनाच माहीत नाही. त्यामुळे भारतीचे आमच्या घराशी जुळलेले ऋणानुबंधही इथल्या लोकांना कळणार नाहीत. आणि कळत नाहीत हेच बरं कारण सांगायचं म्हटलं तरी मला ते कुठच्याच भाषेत सांगता येणार नाहीत.

कचरा

जपानात पहिले दोन आठवडे होमस्टेची ऐश लुटल्यावर स्वत:च्या अपार्टमेंट्मध्ये येऊन “चला आता आपण स्वातंत्र्यवीर” असा मोकळा श्वास घेतला. पण लवकरच ’स्वातंत्र्यातला जाचकपणा’ सारख्या आत्तापर्यंत फक्त गज़लांमध्येच ऐकलेल्या कल्पना प्रत्यक्षात अनुभवाला यायला लागल्या.
आल्याआल्याच सहज नजर फिरवली तेव्हा माझ्या स्वयंपाकघरातल्या भिंतीं कॅलेंडरसारख्या दिसण-या रंगीबेरंगी तक्तांनी व्यापलेल्या होत्या. त्यावर जपानी चित्रलिपीत काहीतरी लिहिलं होतं. मेंदूला फारसा ताण न देता असेल जपानी पद्धत म्हणून सोडून दिलं. पण कारण पुढच्याच आठवडयात कळलं.
कोण्या एका रम्य संध्याकाळी शेजारच्या एक जपानी काकू “गोमेन कुदासाई” अशी मंजुळ हाक मारत दारात आल्या. (माझ्या मराठमोळ्या नजरेला सगळ्याच जपानी बायका संतूरछाप “त्वचासे मेरी उम्र का पता ही नहीं चलता” वाटतात. त्यामुळे त्यांना काकू म्हणताना जीभ जरा अडखळते.) जपानी माणूस कधीही वेळ ठरवल्याशिवाय येत नाही. आलाच तर काहीतरी गडबड आहे असं डोळे मिटून समजून जावं. त्यामुळे त्यांना तेव्हा तसं अचानक आलेलं पाहून आज कुठला राग आळवला जाणार आहे ह्याचा मी अंदाज बांधायला लागले.
जनरल गप्पा झाल्यावर काकू समेवर आल्या. “कचरा कसा टाकतेस तू?” आता माझं घर, माझा कचरा, टाकणारी पण मीच. मग ह्या काकूंना कशाला नसत्या चौकश्या? एवढा विचार करेपर्यंत काकू स्वयंपाकघरात घुसलेल्या होत्या आणि त्यांनी चक्क माझ्या कचरापेटीला हात घातलेला होता. आणि पुढच्याच क्षणी माझ्या कचरापेटीचा नम्र भाषेत पंचनामा सुरु झाला. आणि मग अर्जुनाला गीता सांगावी अशा थाटात त्यांनी मला कच-यावर आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबद्दल एक गीताई सांगितली. तीच ’थोडक्यात’ (?)
कच-याला जपानीत “गोमी” असं म्हणतात. ऐकता क्षणीच cuteness scale वर ह्या शब्दाला दहापैकी नऊ मार्क देवून टाकले. गोमी म्हटलं की दोन पोनीटेल घातलेली एक छकुली “माझं नाव गोमी” म्हणत बागडते आहे असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं रहातं.
सध्या जपान्यांच्या जिव्हाळ्याचे शब्द म्हणजे “मोत्ताईनाई (wastage)”, “एको (eco)” आणि “रीसाईकुरिंगु (recycling)” (जपानीत ’अ’ हा स्वरच नसल्यामुळे सगळे अकारान्ती शब्द उकारान्ती उच्चारले जातात. त्यामुळे एकदम ज्ञानेश्वरी मराठीत बोलल्यासारखं वाटतं.) जपानमध्ये मोत्ताईनाई (टाकाऊ) असं काहीही आणि कुणीही रीसायकल होवू शकते. एका नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार इथली माणसे जवळजवळ एक चतुर्थांश आयुष्य कच-याची ३२७ गटात विभागणी करण्यात घालवतात. मुलांवरही इथल्या समस्त शामच्या आया हे संस्कारही करत असाव्यात.
आपण इतके घाईत असतो की कच-याची जबाबदरी खुश्शाल कचरेवाल्यावर सोपवून मोकळे होतो. पण इथे कचरेवाला ही संस्थाच नाही. आठवड्याच्या ठरवून दिलेल्या वारीच कचरा टाकता येतो, रोज नाही. बरं कचरा टाकायचा म्हणजे नुसताच घराबाहेर ठेवायचा असे नाही. तर विभागानुसार नाक्यानाक्यावर छोटया खोल्या बांधलेल्या असतात. त्या त्या विभागातील लोक आपल्या जवळच्या खोलीत ठरलेल्या वारी ८-४ या वेळात कचरा जमा करतात.
आत्तापर्यंत कचरा ही टाकण्याची गोष्ट आहे एवढंच मला माहीत होतं. पण त्यालाही एक पद्धत असते हे मला जपानने शिकवलं. कच-याच्या प्रकारानुसार त्याला रंग ठरवून दिलेला असतो. उदा. माझ्या विभागात burnable कच-यासाठी पिवळा, recyclable कच-यासाठी हिरवा आणि इतर प्रकारच्या कच-यासाठी निळा रंग ठरलेला आहे. त्याप्रमाणे त्या त्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या विकत घेऊन, त्यावर नाव घालूनच कचरा टाकावा लागतो. पहिले काही दिवस मी नाव घालायचं विसरले तेव्हा माझा बेवारशी कचरा उचलला गेला नाही. ह्या पिशव्या जवळच्या दुकानात, कन्विनियन्स स्टोअर्समध्ये मिळतात. इतर ठिकाणचे मला माहित नाही पण माझ्या जवळच्या दुकानात मिळणा-या पिशव्यांवर सेइवा हे माझ्या गावाचं नाव ठळक अक्षरात छापलेलं असतं. म्हणजेच मला त्या पिशव्या दुसरीकडे विकत घेता येणार नाहीत आणि घेतल्याच तर कदाचित त्यावर पत्ताही लिहावा लागेल. असलं काही मी अजून करून पाहिलेलं नाही. पण काकूंना विचारून माहिती करून घ्यायला हवी.

कचरा ब-याच प्रकारे विभागला जातो.
१. मोएरु गोमी (burnable waste)
नावावरूनच स्पष्ट होतं त्याप्रमाणे जाळता येतं असं काहीही. खरं म्हणजे त्याचं खत तयार करणे हा सर्वात उत्तम आणि eco-friendly उपाय आहे. कदाचित तसं करण्याने माझ्या शेजा-यांना फारसा आनंद होणार नाही पण पुढच्या वेळी मासे पकडायला जाताना गळाला लावण्यासाठी किडे विकत घ्यावे लागणार नाहीत हा फायदा आहे. ओला कचरा खरंतर वाळवून पण अगदीच शक्य नसेल तर निदान कागदात गुंडाळून टाकावा असा नियम आहे.
२. उमेताते गोमी (land-fill waste)
काही कचरा कितीही उत्तम प्रतीचं जळण वापरूनही जाळता येत नाही. तो सरळ non-burnable कच-याच्या पिशवीत घालावा.
३. शिगेन गोमी (recyclable waste)
शीतपेयांचे कॅन्स, प्लास्टिकचे कागद, पिशव्या, पेट बॉटल्स, काचेच्या वस्तू, कागदी/ थर्मोकोलचे पॅक्स. प्रत्येक पॅकवर तो recyclable आहे असं लिहिलेलं असल्यामुळे अजिबात डोकं चालवावं लागत नाही. दुधाचे पॅक, मासे/चिकनचे थर्मोकोलचे ट्रे, कॅन्स वगैरे वस्तू धुवून, वाळवून टाकाव्यात असा नियम आहे.
४. ओगाता गोमी (large waste)
अर्थात जुनं फर्निचर, इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे. अशा सामानची विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे आहेत. मी अजून स्वत: अनुभव घेतलेला नाही पण असं ऐकलंय की वॉर्ड ऑफिसमधून काही शे येनचे स्टॅंप विकत घेऊन ते त्या कच-यावर चिकटवून त्या कच-याच्या खोलीबाहेर ठेवलं की कोणीतरी अदृश्य शक्ती ते सामान उचलून नेते.
ह्या संदर्भात internet वर थोडाशी शोधशोध केल्यावर कळलं की पूर्वी नको असलेली इलेक्ट्रिक उपकरणे नदीकाठी, रस्त्याच्या कडेला वगैरे टाकलेली आढळत. एवढयाशा देशात जिथे माणसांनाच जागा अपूरी पडते तिथे असा अवजड कचरा हा मोठाच प्रश्न होऊन बसला. ह्यावर उपाय म्हणून महत्त्वाची घरगुती उपकरणे ६०% recyclable असलीच पाहिजेत असा कायदा करण्यात आला. यशिरो येथे मत्सुशिता इलेक्ट्रॉनिक्स ह्या प्रसिद्ध कंपनीचा (पॅनासॉनिक फेम) एक appliance-recycling plant आहे. तिथे दरवर्षी एक कोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चुंबकीय प्रणाली वापरून recycle केली जातात.

तर असे सगळे नियम म्हणजे सुरुवातीला सासुरवास वाटला पण नंतरनंतर हाताला सवयच लागली. एका बाबतीत मला जपान्यांचं फार कौतुक वाटतं. हे सगळे नियम जिथेतिथे लिहिलेले असतात किंवा चित्रांमधून स्पष्ट केलेले असतात. त्यामुळे जपानी वाचता येत असेल/नसेल तरीही माणूस ते नजरेआड करूच शकत नाही. गावातल्या प्रत्येकाला माझ्या घरात आहेत तशी कचरा कॅलेंडर्स वाटली जातात. त्यात प्रत्येक तारखेला कुठला कचरा टाकावा हे व्यवस्थित लिहिलेलं असतं. इथे कचरादेखील एवढा स्वच्छ असतो की त्याला गोमी सारखं cute नाव खरंच शोभून दिसतं.
सर्वसाधारणपणे recycling म्हणजे एखाद्या वस्तूचा re-make एवढंच मला माहित होतं. पण recyclingची व्यापकता एवढयापुरतीच मर्यादित न रहाता आता recyclable वस्तूंचा कच्चा माल म्हणून अनेक प्रकारे उपयोग करता येतो.
आता ट्रेन किंवा विमानातून जाताना ह्या विमानाचे पंख/ ट्रेनचा दरवाजा काही महिन्यांपूर्वीचा कुणाचातरी बिअरचा कॅन होते का? किंवा आज मी हौसेने विकत घेतलेला शर्ट म्हणजेच पूर्वाश्रमीची पेट बॉटल असेल का? असे मजेशीर विचार
ब-याचदा माझ्या मनात येतात. त्याचबरोबर आपल्या इटुकल्या गावाची आणि देशाची जिवापाड काळजी घेणारे हे लिलिपुट्स मला फ़ुजीसानएवढे उंच भासतात.

V-Day

ब-याच दिवसात काहीच लिहिलेलं नाही. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. लिहिण्यावरचं माझं प्रेम व्यक्त करण्याचा लिहिण्यासारखा दुसरा मार्ग नाही आणि व्हॅलेंटाइन डे सारखा दुसरा मुहूर्त नाही असा विचार करून शेवटी जरा उशीरा का होईना पण जपानी व्हॅलेंटाइन डे बद्दलंच लिहायचं ठरवलं.
एकंदरीत V-day म्हणजे कुणीही कुणावरही प्रेम करण्याचा दिवस असं मला वाटायचं. पण जपानात आले आणि काहीतरी वेगळाच प्रकार ऐकला आणि पाहिला. १४ फेब्रुवारीला जपानात व्हॅलेंटाईन डे नाही तर चॉकलेट डे असं म्हणतात. हया दिवशी घरोघरच्या ताई माई अक्का ह्या काका, मामा, बाबा, मित्र सहकारी अशा कुठल्याही कॅटेगरीतल्या पुरुषांसाठी चॉकलेटं किंवा इतर काही वस्तू बनवतात किंवा विकत घेतात. चॉकलेटचेही असंख्य प्रकार. तोमो-चॉको=मैत्री व्यक्त करण्यासाठीचं एकदम जनरल चॉकलेट, गिरी-चॉको=वरिष्ठांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठीचं “मस्का” चॉकलेट, आई-चॉको=प्रेम व्यक्त करण्यासाठीचं चॉकलेट वगैरे वगैरे….
इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण खरी आश्चर्याची गोष्ट पुढेच आहे. १४ फेब्रुवारीला मिळालेली सगळी चॉकलेटं आणि भेटवस्तू परत कराव्याच लागतात- १४ मार्चला! जपानात त्यादिवशी पांढरा दिवस साजरा केला जातो. आता प्रेमाचा रंग लाल किंवा गुलाबी असतो अशी एक युनिवर्सल समजूत आहे. पण जपानी लोकांना ते पांढरं का दिसावं हे मला माहीत नाही.
बरं नुसतं चॉकलेट फ़ॉर चॉकलेट असावं तर तेही नाही. काय तर म्हणे घेतलेल्या वस्तूच्या निदान तिप्पट किमतीची वस्तू तरी द्यावीच लागते. (कदाचित अशा अघोरी प्रथेमुळे पुरुषांचे पांढरेफटक पडलेले चेहरे पाहूनच कुणालातरी त्या दिवसाला पांढरा असं नाव देण्याची दुष्ट कल्पना सुचली असावी) सगळं जग जरी महिला दिवस ८ मार्चला साजरा करीत असलं तरी जपानी महिला मात्र तो ख-या अर्थाने १४ मार्चला साजरा करत असाव्यात.
पण मला मात्र ही जपानी पद्धत अजिबात पटत नाही. प्रेमाने दिलेल्या एखाद्या वस्तूची किंमत तरी कशी मोजावी आणि केवळ कोरडया व्यवहारापोटी परत केलेल्या तिप्पट किमतीच्या वस्तूची किंमत खरं तर शून्यच नाही का?
तो संत वॅलेंटाईन कोण होता त्याने खरंच प्रेमाचा प्रसार केला किंवा नाही ह्या गोष्टीशी मला जराही देणंघेणं नाही. पण प्रेम किंवा मैत्रीसारखी ब-याचदा अव्यक्त रहाणारी भावना शब्दांत किंवा कृतीत उतरवण्याचा दिवस म्हणून मला हा दिवस आवडतो.
आता काही जण म्हणतील की मग त्याला वेगळा दिवस कशाला हवा, ते आपण कधीही करू शकतो की! खरं आहे. पण काही शब्द सततच्या वापराने गुळगुळीत आणि बोथट होतात त्यापैकीच प्रेम हा आहे. मी किंवा माझे बरेच मित्रमैत्रिणी मेलचा शेवट “love” असा करतात. त्यापैकी किती वेळा तो खरंच मनापासून लिहिला जातो आणि किती वेळा फक्त बोटांपासून लिहिला जातो? मागे मी Amy Tan नावाच्या लेखिकेने लिहिलेलं The Joy Luck Club नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. पूर्ण गोष्ट मला आठवत नाही पण एक प्रसंग मात्र ह्या संदर्भात आठवतो. लिना आणि तिचा नवरा कुठेतरी बाहेर निघालेले असतात आणि आणि गाडीत शिरताशिरता लिना आपल्या नव-याचा हात हातात घेते आणि प्रेमाने म्हणते, “Herald, I love you!” हेराल्ड आरशात पहात गाडी मागे घेत म्हणतो, “ I love you too. Did you lock the door?”
पुस्तक वाचतानाही वाटलं होतं आणि आत्ताही वाटतं आहे…something is missing…seriously missing!

30 तारखेच्या साहसातंच पुढच्या वर्षाचं ट्रेलर मला दिसलं. तोमोकोचा नव्या वर्षाचा संकल्प “लग्न करणे” असा असल्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबरचा हा शेवटचा थर्टी फर्स्ट असं तिला सारखं वाटंत होतं. त्यामुळेच की काय पण मला काय दाखवू आणि काय नको असं तिला होत होतं.
आजकाल आपल्याकडेदेखील गुढीपाडव्याऐवजी सगळे थर्टी फर्स्टच साजरा करतात. तसंच जपानमध्ये असावं. कारण जपानीत महिना आणि चन्द्र ह्यांच्यासाठी एकच शब्द आहे. त्यामुळे जपानाताही भारतीयांप्रमाणेच चान्द्रमास असावा असा माझा आपला एक अंदाज आहे.
जपानात नवीन वर्षाआधी सणासुदीचंच वातावरण असतं. नवीन वर्षाआधी लोक घराचा कोपरान कोपरा झाडूनपुसून लख्ख करतात. माझ्या शाळेतही (मी सोडून) सर्व शिक्षकांनी आपापली टेबले साफ केली. घराबाहेर किंवा जिंजाबाहेर (निंजा नव्हे. जिंजा म्हणजे शिन्तो आश्रम) “कोदामात्सू” (बांबू, गवत आणि पाईनचे तोरण म्हणा नां!) लावतात. ३१ तारखेला बरोब्बर १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करतात. एक तारखेच्या दिवशी कुटुंबकबिल्यासकट जिंजामध्ये प्रार्थनेसाठी जातात. मित्रांना, सहका-यांना, नातेवाईकांना भेटकार्डे पाठवतात. (मला दिवाळीची कितीकिती म्हणून आठवण झाली! आणि हे लिहीत असताना मागे “गेले ते दिन गेले” चालू आहे. वाह! रडण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झालं आहे!)
मी काही फार मोठी धार्मिक नाही. बाप्पांची आठवण मला फक्त परीक्षेच्या आधी होते. पण तोमोको मात्र अतिशय धार्मिक आहे. तिच्याकडे भाविष्यावरचं एक पुस्तक आहे. त्यात जन्मतारखेनुसार अमुक एका दिवशी अमुक एका दिशेला प्रवास करावा किंवा करू नये वगैरेची कोष्टके दिली आहेत. त्या पुस्तकावर तिची नितांत श्रद्धा आहे. पुस्तकानुसार तोमोकोला ३१ च्या रात्री पश्चिमेकडचा प्रवास वर्ज्य असल्यामुळे कुमामोतो किल्ल्यावरची फटाक्यांची आतषबाजी बघायला जाता आले नाही. पण त्याच्याचमुळे मला “जोयानोकाने” साठी मात्र जाता आलं. ब-याच जपानी लोकांनीही हे केलं नाही आहे हे ऐकल्यावर मी त्या पुस्तकाचे मनोमन आभार मानले.
नववर्षाच्या दिवशी काही देवळामध्ये एक मोठी घंटा १०८ वेळा वाजवली जाते. (१०८ हा आकडा मला ज़रा ओळखीचा वाटला. आपल्याकडे पण जपमाळेत मणी १०८च असतात नाही का?) १०८ च का? तर तोमोको म्हणाली की माणसाला १०८ प्रकारच्या वेगवेगळ्या भौतिक इच्छाआकांक्षा (जपानीत “बोन नोऊ”) असतात. जो घंटा वाजवतो किंवा ऐकतो तो हया इच्छांपासून मुक्त होतो. (पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक जपानी दरवर्षी हया घंटा ऐकत असतो. तरीही रोबोट, वेगवेगळी यंत्र पण जपानमध्येच निर्माण होतात. त्यामुळे कदाचित भौतिक इच्छांचे प्रकार १०८ हून बरेच जास्त असावेत असा विचार माझ्या मनात आला.) तर ही घंटा वाजवण्यासाठी आम्ही तामाना डोंगरावरच्या देवळात जायला निघालो. लांबूनही तामानाचा डोंगर आणि त्याच्यावरचा उंच पागोडा दिव्यांच्या प्रकाशात सुंदर दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत दगडी दिव्यातल्या ज्योती मिणमिणत होत्या. जणू अख्खा डोंगरच एक भव्य दीपमाळ झाला होता.
बाहेर थंडीचा कडाका वाढतच होता. पण तामानाला जावून पोचलो तर असंख्य गाडया तिथे अगोदरच येऊन पोचलेल्या होत्या. काही टूरिस्ट कंपन्यांनी तर चक्क खास त्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. देवळाच्या ब-याच लांब गाडी लावून आम्ही देवळात निघालो तर अजूनही गाडया येतच होत्या आणि पार्किंगसाठी अजिबात जागा नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना वाटेतच थांबवून ठेवले होते. घंटा १०-१० च्या गटाने वाजवायची असल्यामुळे पहिल्या १०८० भाग्यवानांनाच ही संधी मिळते. पण आमचे तारे जोरात होते. त्यामुळे तिकिट घेऊन आम्ही एका लांबलचक रांगेत उभे राहिलो.
आमची पाळी आली आणि एक लांब दोरखंड आमच्या हातात देण्यात आला. घंटा वाजवतानाचा मंत्र सांगण्यात आला. आणि मग तो दोर ओढून आम्ही ती घंटा वाजवली. सर्व आसमंत त्या घनगंभीर आवाजाने भरून गेला. तो क्षणच इतका भारलेला होता की आपोआपच “कर जुळले दोन्ही” चा अनुभव आला. क्षणभर थांबून डोळे मिटून देवाची प्रार्थना केली. (मी अगदी मनापासून “तोमोकोला तिचा जोडीदार मिळू दे” अशी प्रार्थना केली पण नंतर तोमोको म्हणाली जपानी देव अशा प्रार्थनेला पावत नाहीत. अशा वेळी काही मागायचं नसून देवाचे आभार मानायचे असतात. पण देवांचं पण काहीतरी नेटवर्क असेलंच की नाही! जपानी देव माझी प्रार्थना आमच्या बाप्पांपर्यंत नक्की पोचवतील.)
घंटा वाजवून बाहेर पडलो तर तिथे तीर्थ म्हणून “आमाझाके” (गोड दारू) वाटत होते. ती आम्ही एक घोट प्यायलो आणि तोमोको जवळजवळ ओरडलीच. तिला गाडी चालवायची होती आणि जपानात गाडी चालावताना रक्तात दारूचा एक थेंबदेखील असणे हा गुन्हा आहे. पण तीर्थाला नाही म्हणणेदेखील तिला पटेना. अशाप्रकारे पापाचं खातं वर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडलं गेल्यामुळे तिला फारच वाईट वाटलं.
जपान हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा देश. तिथे भावभावनांना स्थान नसते. पण त्या दिवशी तामानाच्या रुपाने ह्याच देशाचा एक भाविक कोपरा मला पहायला मिळाला. तोमोकोसान… कोकोरोकारा आरिगातो!

“अगं तू ३१च्या रात्री काय करणार आहेस?”
“नाही गं अजून काहीच ठरलेलं नाहीएं.”
“मग तू माझ्या घरी रहायला ये नां. नववर्षाचं स्वागत आपण जपानी पद्धतीने करूयात. चालेल?”
इतक्या आपुलकीच्या आग्रहाला मी नाही म्हणूच शकले नाही. आणि जवळजवळ १ डिसेंबरलाच तोमोकोने मला बुक करून टाकलं. तोमोको नुसतं आमंत्रण देवूनच थांबली नाही तर ३० तारखेला सकाळी ९ वाजता मी तुला न्यायला येते आहे असा निरोपही पाठवला. वास्तविक तोमोकोचं घर माझ्या घरापासून गाडीने जवळजवळ तासाच्या अंतरावर आहे. उगीच माझ्यासाठी तोमोकोला एवढा त्रास देणं काही मला बरं वाटेना म्हणून अर्धं अंतर मी बसने येते असं म्हटल्यावर तिच्या जपानी मनाला ते अजिबात पटलं नाही. माझ्या पाहुणचारात काहीही कसर ठेवायची नाही असा चंगच तिने बांधला होता.
दुर्दैवाने २९ तारखेच्या रात्रीच इथे जोरदार बर्फ पडायला सुरुवात झाली. रात्रभर वादळी वा-यासह बर्फ पडत होता. सकाळी सहाच्या सुमारासच इथे रस्त्यांवर ४ इंच बर्फाचा थर साचला होता. आता काही तोमोको येत नाही असं मला वाटलं पण बाईसाहेब ठरल्यावेळी दाराशी हजर झाल्या.
तोमोकोच्या गाडीला बर्फासाठीचे खास टायर बसवलेले नव्हते. त्यामुळे आम्ही दोघीही प्रचंड घाबरलेल्या होतो. काहीही न बोलता एका विचित्र शांततेत आम्ही दोघीही जीव मुठीत धरून बसून होतो. (बरोबर कुणीतरी असताना अर्धा तास मी चक्क “सायलेंट मोड” मध्ये? विश्वासच बसत नाहीए!) जाताना काही गाडय़ांना अपघात होऊन त्या रस्त्याच्या कडेला उभ्या पाहिल्यावर नवीन वर्षाची पहाट काही माझ्या नशीबात नाही बहुतेक वगैरे अभद्र विचारदेखील अगदीच मनात आले नाहीत असं नाही.
आसो नावाचा ज्वालामुखीय पर्वत अगदी जवळ असल्यामुळे ’सेवा’ या माझ्या गावात (आणि जवळच्या याबे या गावात) भरपूर बर्फ पडतो. पण गंमत म्हणजे एकदा याबे ओलांडलं की अगदी जादू केल्यासारखं बर्फ किंवा पाऊस नावालासुद्धा दिसत नाही. त्यामुळे ३० तारखेला तोमोकोच्या इथलं आकाश एवढं निरभ्र होतं की माझ्याइकडे बर्फ पडतंय हा मला झालेला भास होता की काय असं मला वाटलं.शेवटी एकदाचं आम्ही याबे ओलांडलं आणि त्या “white out” मधून सहीसलामत बाहेर पडलो. तोमोकोने शांतपणे गाडी बाजूला थांबवली आणि चक्क मला मिठी मारली!

मागच्या महिन्यात एका कॉन्फरन्सला (मराठी प्रतिशब्द?) गेले होते. “जेट” या उपक्रमाअंतर्गत कुमामोतोमध्ये सहाय्यक इंग्रजी शिक्षक म्हणून काम करणा-यांसाठी ही कॉन्फरन्स होती. ह्या निमित्ताने विविध देशांच्या, भाषांच्या, वयांच्या पण एकच काम करणा-या अनेक लोकांना भेटण्याचा योग आला.
दुस-या महायुद्धानंतर जपानने जगासाठी आपले दरवाजे बंद केले होते. आता स्वयंपूर्ण राष्ट्र म्हणून जन्माला आल्यावर जपान जगासाठी खुला झाला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून गेल्या २० वर्षांपासून जपानी परराष्ट्र खात्यातर्फे जेट नावाचा एक उपक्रम देशोदेशी राबवला जातो. भारतातून यंदा माझ्यासारख्या ९ जणांची निवड झाली होती. जगाशी व्यवहार करताना जपानला येणारी मोठ्ठी अडचण म्हणजे भाषेची. भारतात इंग्रजी ही परभाषा (foreign language) नसून दुसरी भाषा (second language) आहे. पण आजही जपानमध्ये चाळीशीपुढची पिढी इंग्रजी अजिबात वाचू किंवा बोलू शकत नाही. टोकियोसारख्या मोठया शहरात परिस्थिती बरी असेल कदाचित पण इथे ग्रामीण भागात मात्र प्रश्न बिकट आहे. म्हणूनच जपानी शाळांतून विद्यार्थ्यांना इंग्रजीची आणि त्याचबरोबर आपापल्या देशाची ओळख करून देणे हे माझ्यासारख्या जेट शिक्षकांचे काम आहे.
बरंच विषयांतर झालं. तर ह्या कॉन्फरन्समध्ये प्रत्यक्ष शिकवण्यापलिकडे जावून ब-याच विषयांची चर्चा झाली. त्यापैकीच एक म्हणजे जपानी लोकांशी संवाद कसा साधावा हा होय. त्यासाठी जपानी लोकांमध्ये वावरताना, त्यांच्याशी बोलताना परदेशी लोकांना खटकणा-या गोष्टी कोणत्या ह्याचा एक सर्व्हे (मराठी प्रतिशब्द?) घेण्यात आला.
मला खटकणारी गोष्ट म्हणजे जपानी माणसे बोलताना कधीच नजरेला नजर देत नाहीत त्यामुळे आपण एकटे स्वतःशीच बोलत आहोत की काय असं मला सारखं वाटत रहातं.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की पश्चिमेकडून आलेल्या ब-याच लोकांना “तुम्ही चॉपस्टिक्स किती छान वापरू शकता” असं जपानी लोकांकडून होणारं कौतुक खटकत होतं.
आता जपानी लोकांकडून होणा-या कौतुकाने वैतागून जायचं काय कारण आहे? हे लोक स्वतःला फारच शहाणे समजतात असा समज करून घेऊन मी ती गोष्ट तिथेच सोडून दिली. पण नंतर निवांतपणे बसून विचार केल्यावर मला सापडलेली ही काही कारणं.
१. जपानमध्ये साधारणपणे ६ महिने किंवा त्याहून अधिक काळ रहिल्यानंतर चॉपस्टिक्स वापरता येणे ही काही फार मोठी गोष्ट रहात नाही. चॉपस्टिक मॅनर्स (मराठी प्रतिशब्द?) कठीण असतील कदाचित (सगळ्या जपान्यांना तरी माहीत असतील की नाही कुणास ठाऊक!) पण चॉपस्टिक्स वापरून जेवणे हे एवढं कठीण नक्कीच नाही. थोडयाशा सरावाने कुणालाही ते सहज जमू शकतं. मग त्याचं कौतुक होणं म्हणजे जरा अतिच! एक मुलगा म्हणाला,” हे म्हणजे तुम्ही किती छान चालू शकता” असं म्हणण्यासारखंच आहे!
२. दुसरं कारण थोडंसं मानसिक आहे. “तुम्ही चॉपस्टिक्स किती छान वापरता” अशी दाद देताना त्यापाठीमागे “तुम्ही जपानी नसूनसुद्धा” हे अध्याहृत असतं. ह्याचाच अर्थ तो कौतुक करणारा माणूस प्रत्यक्षात तुम्हाला परका समजत आहे असा काही जणांचा समज होऊ शकतो. जपानी मनात (आणि भाषेतही) आजुबाजूच्या जगाची “उचिवा” (आपली माणसं) आणि “सोतोवा” (परकी माणसं) अशा दोन गटात आपोआपच विभागणी होत असावी. परक्या देशात घर करून रहाणा-या प्रत्येकाला त्या देशातल्या लोकांनी आपल्याला घरच्यासारखं वागवावं असंच वाटत असतं. मग आपल्या माणसाचं आपण अशा साध्यासाध्या गोष्टींसाठी कौतुक करतो का?
चॉपस्टिक्स नाही पण जपानी बोलण्याच्या बाबतीतला माझा अनुभव ह्या वैताग्या मंडळींसारखाच आहे. तुम्ही साधं आपलं नाव जरी जपानीत सांगितलंत तरी इथली लोकं तुमची तोंडभर स्तुती करतील. मला पहिल्यापहिल्यांदा उगीचच आपण फार ग्रेट वगैरे आहोत असं वाटायचं. नंतरनंतर मात्र अगदीच वैताग नाही तरी “अरे हे काय चाललंय?” असे भाव माझ्या चेह-यावर नक्कीच उमटले असतील.
पण आजुबाजूच्या लोकांना थोडंच बदलता येतं? म्हणून मग आता मी माझा दृष्टिकोनच बदलला आहे.
अशी दाद देणे हा जपानी औपचारिकपणाचाच एक भाग असावा. शहाण्याने त्यातून फार काही अर्थ काढण्याच्या फंदात पडू नये हे बरं. संभाषणाची सुरुवात करणे एवढाच मर्य़ादित हेतू त्यात असावा. ह्यालाच जपानीत “आइसात्सु” असं म्हणतात. हवापाण्याच्या गप्पांऐवजी कौतुक एवढाच काय तो फरक.आता कुणीही मला मी कशी छान जपानी बोलते हे सांगितल्यावर मला आनंदच होतो. मी खरंच जपानी चांगलं बोलते म्हणून नाही तर कुणालातरी माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटताहेत म्हणून!

भेळ

बाहेरच्या लोकांसाठी मुंबईची ओळख जरी उद्योगसंस्कृती अशी असली तरीही मला मात्र मुंबईची खाद्यसंस्कृतीच जास्त भुरळ घालते. पिझ्झा हट्, मॅकडोनाल्डस्, सब्-वे अशा परकीय आक्रमणांना न जुमानता चाट, सॅन्डविच्, डोसा, वडापाव विकणारे असंख्य एतद्देशीय भय्या, दादा, काका, अण्णा हे मुंबईकरांच्या उदराभरणाचा गाडा सुखेनैव हाकत आहेत. मुंबईकरांच्या रसनेची आणि त्याचबरोबर खिश्याचीही काळजी घेणारी ही चालतीबोलती रेस्टॉरंट्स हेच मुंबईचे खरे वैशिष्टय आहे असे मला वाटते.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीविषयी बोलताना अग्रपूजेचा मान चाटचा आणि त्यातही भेळेचा (की भेळीचा?) काही जण मानतात की भेळ गुजरातहून आली, तर काही जण म्हणतात उत्तरप्रदेशातून. (पण भेळ बनवणा-यांसाठी भय्या हे कॉमन संबोधन असल्यामुळे भेळेचा जन्म एखाद्या उत्तरप्रदेशीय रसोईत झाला असावा हे माझे मत) पण भेळेचा बनिया संस्कृतीशी जवळचा संबंध असावा. गल्ल्यावर बसल्याबसल्या तोंडाला चाळा म्हणून कुरमुरे, शेव आणि चाट मसाला ह्यांचे मिश्रण जन्माला आले असावे. नंतर कुण्या देशीच्या बायडीने (बुवानेही असेल कदचित!) त्यात आपल्या कल्पकतेची भर घालून आजची साग्रसंगीत भेळ तयार झाली असावी. भेळेचं माहेर कुठेही असो. आज ती सासरी सुखाने नांदते आहे.

भेळेचा USP हा की ती चुटकीसरशी तयार होवू शकते. तळणे, शिजवणे, भाजणे ही भानगड नसल्यामुळे एकदा का कच्चा माल तयार असला की पाचव्या मिनिटाला खायला सुरुवात करता येते.
पण रस्त्यावरच्या भेळेचा ख्ररा आनंद लुटायला थोडं आंधळं व्हावं लागतं. भय्याच्या हातांचा रंग, चटणीसाठी वापरलेलं पाणी वगैरेचा विचार करायला लागलात तर भेळ तुमच्या कधीच पचनी पडणार नाही. फक्त कल्पना करा की समोर निळाशार समुद्र पसरलेला आहे, त्या स्वच्छ किना-यावर भेळेचं एक टुमदार दुकान आहे. तुम्ही तिथे गेल्यावर पांढराशुभ्र एप्रन नेसलेला भय्या अदबीने तुमचे स्वागत करीत आहे आणि ग्लोव्ह्ज घालून नुकत्याच निर्जंतुक केलेल्या पातेल्यात टी-स्पून टेबलस्पूनच्या मापाने भेळ बनवतो आहे. शेजारीच एका फलकावर भेळेच्या आहारमूल्याचा एक तक्ता लिहिलेला आहे. हे चित्र म्हणूनच ठीक आहे. पण प्रत्यक्षात भय्या जर असे वागू लागला तर लोक नक्कीच त्याच्या एक ठेवून देतील आणि त्याला भानावर आणतील. (“बागबान” नावाचा एक अतिशय सुमार हिन्दी चित्रपट पाहिला आहात का? त्यातल्या सलमान खानच्या अतिचांगुलपणामुळे मला अशीच एक ठेवून द्यावीशी वाटत होती!) जी गोष्ट भेळेची तीच पाणीपुरीची. लाल फडकं लपेटलेल्या स्टीलच्या घड्यात न बुचकळलेली पाणीपुरी खाल्ली तर माझं पोट नक्कीच बिघडेल! The secrets of a perfect bhel/panipuri lie in these imperfections! नाही म्हणायला मिनरल वॉटर पाणीपुरी नावाचे एक फॅड आले होते कधीतरी. पण मुंबईकरांना फार काळ मानवले नाही.
जुहूचा किनारा, खारी हवा, सुखद गारवा, आणि वाळूत अंथरलेल्या चटईवर बसून सूर्यास्त पहात आणि नाकाडोळ्यातलं पाणी परतवत कागदी द्रोणातल्या अगदी तळाशी रहिलेल्या चुरमु-यापर्यंत खाल्लेली झणझणीत पण चटकदार भेळ! तिची सर पंचतारांकित हॉटेलातल्या जेवणालाही येणार नाही. अगदी फुकट असलं तरीही…अशा भेळेच्या कर्त्याकरवित्याविषयी पुन्हा कधीतरी!

मी चाट ह्या प्रकाराची अशक्य चाह्ती आहे. एरवी एक पोळी आणि लिंबाएवढा भात असं मोजूनमापून जेवणारी मी पण चटकदार भेळ, गोडूस दहीपुरी किंवा वाफ़ाळतं रगडापॅटिस बघितलं की माझी भूक अक्राळविक्राळ रूप धारण करते. ते पाहूनच की काय “चाट पडणे” सारखा वाक्यप्रचार मराठीत आला असावा. हे एवढं लिहित असतानादेखील माझ्या तोंडाला महापूर आला आहे!
पण सध्या जपानच्या कोप-यातल्या एका छोट्याशा गावात राहून जिभेचे चोचले कसे पुरवू? नाही म्हणायला टोकियोतल्या “ताज” नावाच्या एका हॉटेलात खाल्ली होती. पण ती खाल्ल्यावर “याच वाडगाभर पाण्यात बुडून जीव दे” असं करणा-याला म्हणावंसं वाटलं.
पण मी इतक्या सहजी हार मानणार नाही. रसभरीत जेवणाचा नाही तर रसभरीत वर्णनाचा आनंद तर मला नक्कीच घेता येईल. हे म्हणजे दुधाची तहान दुधाच्या जहिरातींवर भागवण्यासारखे आहे. पण नाइलाजास्तव “they hog and I blog” असे ब्रीदवाक्य करण्याखेरीज गत्यंतर नाही.

नमन

काही गोष्टी नमनातच (घडाभर तेल लागले तरी) कबूल करायच्या असतात.
 माझी मायबोली मराठी तर माझी पितृभाषा (असे काही अस्तित्वात असेल तर)इन्ग्रजी आहे. आता जपानात मुक्काम ठोकल्यावर गप्पा पण जपानीत ठोकाव्या लागतात. त्यामुळे माझ्या डोक्यात भाषान्चा (हे असं टिळकान्च्या संत, सन्त, सन् तसारखं वाटतं आहे पण सवय होईपर्यंत इलाज नाही.) एक अभूतपूर्व गुंडा झाला आहे. त्यातूनच “ही डिश कसली ओईशिई (जपानीत चविष्ट) आहे नां!” असली त्रिवेणी संगमी वाक्ये अस्मादिकांच्या मुखातून सहज बाहेर पडतात. सांगायचा मुद्दा हा की चुकुनमाकुन माझ्या मनातला इंग्रजीचा कप्पा उघडला गेलाच तर चूकभूल द्यावी घ्यावी.
 मग अशा मुलीने मराठीत लिहायचे उपद्व्याप करायचेच कशाला?
 एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथे कुणालाही मराठी वाचता येत नाही. त्यामुळे मला कुणाचा राग आला की मी शिस्तीत एक कागद घेते आणि खुश्शाल त्याच्यावर माझी लेखणी मोकाट सोडते. (ह्यालाच papyrus therapy असं म्हणतात. जपानीत कागद आणि देव ह्यांच्यासाठी “कामी” असा एकच शब्द आहे हा योगायोग म्हणावा का?)
 दुसरं म्हणजे इथे माझं काम जरी इंग्रजी शिकवण्याचं असलं तरी मुलं सर्रास जपानीतच बोलतात. त्यांना इंग्रजी बोलायला लावायचे माझे सर्व प्रयत्न कामी आले. मी इंग्रजीतून त्यांना काहीही विचारले की (मातृभूमीतले) कावळे वस्तूचे निरिक्षण करताना जशी मान वाकडी करतात तशी मान वेळावून ते “ऑं…ऑं???” असा विचित्र आवाज काढतात. त्यांना माझ्याशी बोलायचं नसावं कदाचित असा समज होऊन काही काळ मी थंड घेतलं. पण तेच प्रश्न माझ्या भारी जपानीत विचारले तर त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. हे ऐकून अडचण मी नसून भाषा आहे हे समजल्यावर निजमनास अतीव आनंदु जहाला.
 आता त्याचेच अस्त्र मी त्यांच्याविरुद्ध वापरते. म्हणजे पहा हां- कुणीही मुलाने मला “先週の土曜日何をしたの?“(गेल्या शनिवारी काय केलंस?) असं विचारलं की मी शुद्ध मराठीत “अरे मट्ठा इंग्लिशमधे बोल की!” अशी सुरुवात करते. मुलगा/मुलगी कितीही मट्ट असली तरीही इंग्लिश हा शब्द त्यांना व्यवस्थित समजतो आणि गाडी इंग्रजीवर येते. 
तिसरं कारण म्हणजे विशाल, शशांक, ट्युलिप वगैरें दिग्गजांच्या अनुदिन्या मी बरेचदा चाळते. पण “कधीतरी वाचणा-याने लिहिणा-याचे हात घ्यावेत” म्हणून लिहायला सुरुवात तर केली आहे. जात्यावर बसलं की ओव्या सुचतात म्हणतात तसं लिहायला लागल्यावर सुचतं आहे का बघू.
पण काहीही म्हणा. माझ्या मातीपासून दूर गेल्यावरच मी तिच्या जवळ यायला लागली आहे हे मात्र खरं!

;;