आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात. हे एकेक हाताच्या पंजाएवढे कोळी, कमावलेल्या शरीराची चिलटं, फावल्या वेळेत मारण्यासाठी रंगीबेरंगी माशा असे अनेक स्वघोषित रूममेट्स माझ्या घरी जाऊन येऊन असतात. देवाने पंख दिलेत म्हणून उगाच ते माझ्या कानाशी येऊन फडफडवण्यात त्या माशांना, जाळं विणता येतं म्हणून उगाच कानाकोप-यांत जाळी विणण्यात त्या कोळ्यांना, आणि रात्री सहा ढेंगा वर करून निवांत झोपायचं सोडून उगाच गगनभरा-या मारण्यात झुरळांना काय सुख मिळतं कोणास ठाऊक. पण ह्यांची आणि आमची शाळाकॉलेजपासूनची ओळख म्हणून खपवून घेते झालं! त्यामुळेच तर घरात सापडलेल्या पहिल्यावहिल्या मुकादेला मी निरागसपणे बाहेर टाकून जीवदान दिलं.
आता “मुकादे म्हंजे रे काय भाऊ?” यासारखे प्रश्न तुम्हाला पडणं किंवा दे च्या आधी मनातल्या मनात स्पेस द्यावंसं वाटणं सहाजिक आहे. प्रकरण ’चावट’ असले तरी रोमॅंटिक वगैरे अजिबात नाही. मुकादे हा शब्द जपानी चित्रलिपीत 百足असा लिहितात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे ’शंभर’ आणि ’पाय’ असा होतो. ह्याचाच अर्थ मुकादे हा २० किंवा त्याहून अधिक पाय आणि दोन खतरनाक नांग्या असलेला काळाकुट्ट, तुरुतुरु पळणारा सेंटिपीड जातीचा किडा आहे. मराठीत मुक्याच्या देण्याघेण्याने मनात गुदगुल्या होत असल्या तरी मुकादेने मुका घेतला तर सूज, उलटया, अंग काळेनिळे पडून बधीरपणा येणे, जळजळ हे सर्व होतं. (अनुभव नसल्याने फार वर्णन करता येणार नाही!) पण माणूस मरत नाही हे नशीब. “मुकामुका होतंय” म्हणजे जपानीत “कसंतरी होतंय” त्यामुळे पठ्ठा जपानीत आपल्या नावाला जागून आहे. मुकामार मधला ’मुका’ म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. त्याचा उगम बहुदा ह्या जपानी ’मुकामुका’ मध्ये असावा! असंही ऐकलंय की मुकादे नेहमी जोडीने फिरतात. त्यामुळे एक सापडला की दुसरा कुठेतरी निवांत प्लानिंग करत असेल हे सांगता येत नाही. मी जिथे रहाते तिथे औषधालाही माणूस सापडत नाही त्यामुळे जिवंत माणूस दिसला की माझ्यासारखाच मुकादेलाही आनंद होत असावा. आता आनंद व्यक्त करण्याची काहींची पद्धत असते चावरी! त्याला ते बिचारे काय करणार? असाही एक सहानुभूतीपूर्ण विचार माझ्या मनात येतो.
साधारण जूनच्या सुमारास जपानात ’त्सुयू’ म्हणजे ’मान्सून’ सुरु झाला की मुकादे फॉर्मात येतात. बाथटब, छान घडी करून ठेवलेले कपडे, चपला, उशा, गाद्या ह्या मुकादेच्या आवडत्या जागा आहेत. जपानी लोक साधारण मुकादे आला की त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून वरून दगड / काठीने बडवतात, गरम तेलात / पाण्यात टाकतात, किंवा मुकादेसाठीचा फवारा मारतात. पहिला साकुरा ही जशी जपान्यांसाठी बातमी असते तशीच पहिला मुकादे ही माझ्यासाठी. म्हणजेच कोणीही क्षयझने “आज मी घरात मुकादे पाहिला” असं म्हटलं रे म्हटलं की त्यादिवशीपासून लगेच मी चपला, गाद्या, उशा, कपडे वगैरे काहीही आधी झटकून मगच वापरते.
अगदी पहिल्या वर्षी “तुला इथे येऊन एक वर्ष झालं तरी मुकादे नाही दिसला?? घाबरला वाटतं तुला!” अशी खूप टिंगल झाली. पण सवयीनुसार तीही मी झटकली.
आणि एक दिवस नेहमीसारखी़च घाईत शाळेत जायला निघाले होते. मोजे घालून बूट घालायला उचलला तर खाली एक आठ इंची मुकादे माझी वाट बघत वळवळत होता. हसावं की रडावं तेच कळेना. मुकादेचा स्प्रे, गरम पाणी, तेल, बत्ता, मुसळ, वरवंटा असं काहीही जवळ नसतानाच्या निःशस्त्र अवस्थेत मुकादेशी वीसेक हात करणे भाग होतं. (अवांतर: बुटाने मुकादे मरत नाही.) मराठमोळं रक्त उफाळून आलं आणि त्याच तिरमिरीत त्याला चिमटयात पकडलं, सरळ गॅसवर धरलं आणि खालून गॅस पेटवून त्याचा एनकाउंटर केला. आणि त्यानंतर मिरच्यांची धुरी, एस. टी श्टॅंडावरील स्वच्छतागृहे, शाळेतली प्रयोगशाळा, २५ वर्ष सलग न धुता वापरलेले मोजे, जळका टायर ह्या सगळ्या वासाचं मिश्रण असलेला एक अवर्णनीय वास घरभर भरून गेला. तो वास एका स्प्रे वगैरे मधे भरून घेता आला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे माझे बॉस, वायफळ गोष्टींचा रिपोर्ट लिहायला लावणारे सुपर्वायझर, मी केलेल्या मसालेभातावर (“केवढा तिखट आहे!” असं म्हणत) यथेच्छ ताव मारणारे काही जपानी माझ्या दिशेने कूच करताना पाहून मी स्कंकसारखा ह्या स्प्रेचा वापर नक्की केला असता.
आत्तापर्यंत सापडलेल्या मुकादेची संख्या सम असल्याने सध्या मी निवांत आहे. लहानपणापासून जून म्हटला की नव्याकोर्या पुस्तकांचा, ओल्या मातीचा, आंब्याफणसाचा असल्या वासांची नाकाला सवय होती. आता मात्र त्यात काही नव्या वासांची भर पडली आहे.
मी मुकादे आला होता वगैरे सांगितल्यावर माझ्या काही हितचिंतक मित्रमैत्रिणींनी “काहीतरी शेंडया लावू नकोस. आता पुन्हा मुकादे आला नां की त्याचा एक फोटो काढून पाठव.” असे उत्साहवर्धक उद्गार काढल्यामुळे त्यांच्यासाठी हे पुराव्याने शाबीत! मुकादेचे अधिक रोमांचकारी छायाचित्रे व किस्से पाहाण्यासाठी यू-टयूब आहेच.
काहे अब तुम आये हो, मेरे द्वारे... असे काहीसे शब्द आहेत. (हा राग सकाळी सकाळी नाही, तरी पहाटे गातात.) बुटात मुकादेचं दर्शन झालं असा प्रसंग चित्रपटात दाखवायचा झाल्यास backgroundला हे शब्द चपखल बसतील. ;)
तसंच "पिपात मेले ओले उंदीर" च्या धरतीवर "बुटात मेले पीत मुकादे" वगैरे कविता/गाणंही टाकता येईल. ;)
btw. सहीच.
हर हर मुकादे!
आपलं... हर हर महादेव!
आपल्या अतितत्पर अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. आपणासारखा जबाबदार आणि जागरूक पत्रकार अजूनही एखाद्या सन्मानपदकापासून वंचित असावा ह्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही! कदाचित अशीच तत्परता आणि कल्पकता आपण स्वत:च्या ब्लॉगविषयी दाखवलीत तर मीही एका शिक्षिकेच्या नात्याने एखाद्या प्रकाशकाकडे आपली शिफारस करून आपल्या ऋणातून अंशत: तरी मुक्त होण्याचा प्रयत्न करीन.
पण त्याआधी मी ज्यांच्यापासून स्फूर्ती घेतली अशा अनेक वीरांची / वीरांगनांची नावे व पराक्रम तपशीलासह पाठवीन. त्यांचीही दखल घेतली जावी एवढीच कळकळीची विनंती.
कृपाभिलाषी,
सई विश्वास मुंडले
अशाप्रकारे एक मुलगी आपल्या (supposedly) मुकादे-free घरात सुखासमाधानाने नांदू लागली. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सध्यातरी सुफळ संपूर्ण!
ब्लॉग मस्त आहे. सर्व पोस्ट्स वाचल्या नाहीत अजून पण वाचतेय हळूहळू...
बाई गं कुमामोतोत एकटी कशी काय राहतेस! औषधाला तरी कोणी भारतीय आहे का? त्यामानाने तोक्योत भारतीय डोकी बरीच दिसल्याने मला तसं खूप जाणवलं होतं :)
-वर्षा
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मला वाटतं टायफून, किडे वगैरे भन्नाट गोष्टी क्यूश्यूची खासियत असावी. कुमामोतो शहरात असतील रहात पुरेसे भारतीय…कारण सध्या इथे इंडियन रेस्टॉरंट्सना ऊत आला आहे. पण माझ्या घराजवळ मात्र एकच भारतीय मुलगी रहाते. पण त्यामुळे माझा रोज जपानीचा सराव होतो हेच दु:खात सुख!