इतरांच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी कोणीतरी बाई येतात. कालपरत्वे प्रमोशन मिळून त्यांच्या (वयानुसार) ताई, मावशी, काकू किंवा आत्या होतात. पण भारती आमच्या घरी आली तीच भारती म्हणून आणि घरातलीच एक होण्यासाठी तिला कधीच मावशी आणि काकूसारख्या उपपदांची गरज पडली नाही. उलट तिच्या येण्याने माझ्या आईचीच “बाबूची आई” अशी एक नवीन ओळख तयार झाली.
उंच काटक बांधा, रेखीव चेहरा पण बसलेली गालफडं, सततच्या पानतंबाखूने रंगलेले ऒठ, कनवटीला खोचलेला बटवा आणि त्यात खुळखुळणा-या कात आणि चुन्याच्या छोट्या डब्या, चापूनचोपून नेसलेली धुवट नववारी साडी आणि त्यातून क्वचित डोकावणारं खपाटीला गेलेलं पोट. मी जवळजवळ २५ वर्षापूर्वी पाहिलेली भारती ही अशी होती आणि आजही ती अशीच असेल अशी मला खात्री आहे.
भारतीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. ते मला लक्षात रहायचं कारण म्हणजे मंगळसूत्राला चांदीच्या वाटया मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिल्या. पण भारतीची विचारपूस करताना कळलं की पदरात दोन मुलं ठेवून भारतीचा नवरा जो मुंबईला आला तो ह्या प्रचंड मायानगरीत पुरता रमला. आजतगायत तो जिवंत आहे किंवा नाही हेदेखील भारतीला ठाऊक नाही. तो परागंदा झाल्यावर मुलांना गावीच ठेवून पैशाच्या (आणि कुंकवाच्या?) शोधात ती मुंबईत आली. पण आजही त्याच्या आठवणींइतकंच काळं पडलेलं ते मंगळसूत्र मात्र तिने जपून ठेवलं आहे.
भूतकाळात जरी भारतीला वाईट अनुभव आले असले तरी त्याचे सावट तिच्या कामावर कधीच पडले नाही. माझी आज्जी स्वच्छ्तेच्या बाबतीत भयंकर काटेकोर होती. मोलकरणीने घासलेली भांडी ती पुन्हा विसळल्याखेरीज वापरत नसे. आधीच्या मोलकरणींच्या ते पथ्यावरच पडायचं. पण आपण घासलेली भांडी आज्जी पुन्हा विसळून घेते ह्यात कुठेतरी आपण तर कमी पडत नाही नां असं वाटून तिने स्वत:च ती दुस-यांदा विसळायला सुरुवात केली.
माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्या घरी एक पितळी तपेलं होतं. प्यायचं पाणी त्या तपेल्यात उकळलं जायचं. माझ्या आज्जीचा त्या तपेल्याशी काहीतरी ऋणानुबंध असावा किंवा कदाचित तिच्या तरुणपणीच्या आठवणी त्या तपेल्याशी जोडल्या गेल्या होत्या की काय कुणास ठाऊक पण ती त्या तपेल्याची सर्वतोपरी काळजी घेत असे. रोजच्या वापरामुळे ते काळं पडंत असे. की लागलीच आज्जी ते जातीने आधी आमसुलाने आणि नंतर पावडरने लख्ख धुवून काढत असे. आता पूर्वीचं जुने तपेलं ते! चांगलंच जाडजूड होतं. ते कमरेत वाकून धुवायचं म्हणजे चांगलंच दिव्य होतं. मोलकरणी तर दूरच पण घरच्या कुणीही ते धुतलेलं आज्जीला पसंत पडत नसे. आजी म्हातारी होत होती पण तपेल्याची सेवा करण्यात काही खंड नव्हता. एक दिवस भारती आली आणि तिला काय वाटलं कोण जाणे. काहीही न बोलता तिने ते तपेलं घेतलं आणि चक्क करून पुन्हा जागेवर ठेवून दिलं. आज्जीही तेव्हा काहीच बोलली नाही पण त्या दिवसापासून तपेलं काळवंडलं की ते घासायच्या भांडयांबरोबर ठेवलं जायला लागलं. तपेल्याची जबाबदारी जशी भारतीच्या पदरात पडली तसाच आज्जीचा विश्वासही…
भारती मुंबईत तिच्या आत्त्याकडे रहायला आली. पहिल्यापहिल्यांदा आत्याच्या ओळखीनेच तिला कामे मिळत गेली. पण मग आत्याबाईंचे कुटंब जसजसे विस्तारत गेले तसतशी तिथे भारतीची अडचण व्हायला लागली. स्वत:ची जागा शोधणे जितके अपरिहार्य तितकेच अशक्य होते. पैशाची मदत करणारे आमच्यासारखे बरेच लोक होते. पण खरी मदत केली ती बाग कुटंबियांनी. बरीच वर्षे ती त्यांच्या घरीच रहायला होती. त्यामुळे एकवेळ दुस-या कुणीही लवकर किंवा उशीरा बोलावले तर भारतीने नकार दिला असता पण बागवहिनींचा शब्द तिने कधीही खाली पडू दिला नाही. हां आता त्या बागवहिनींचेही पाय मातीचेच त्यामुळे त्याही तिला कधी वेडंवाकडं बोलल्या नसतीलंच असं नाही. त्यामुळे ती तक्रारही करायची पण लगेच दिलजमाईही होत असे. एकदा माझ्या आईने मोदक केले होते. आमच्या घरी कुठ्लाही नवीन पदार्थ केला की तो भारतीसाठीही राखून ठेवला जात असे. तसेच चार मोदकही भारतीला आणि तिच्या मुलांना दिले. दुस-या दिवशी आईने भारतीला विचारलं,” काय मग जमले होते का मला मोदक?”
तर भारती हसत म्हणाली,” अगं बाबूची आई, मी खाल्लेच नाहीत.”
“का गं? चार होते नां?” पुन्हा आई.
“अगं दोन मुलांना दिले आणि दोन शोनाच्या आईला (सौ. बाग) आवडतात म्हणून तिला दिले.”
तेव्हापासून आई मोदक केले की तिच्याचबरोबर ते बागांकडे पाठवे. देताना थट्टेने म्हणे “दोन मुलांना, दोन तुला आणि दोन तुझ्या लाडक्या शेठाणीला!”
भारतीच्या ह्या वागण्याला बरेच लोक तिची मोठेपणाची हौस म्हणून हिणवतही असतील. आणि ब-याचवेळा ती स्वत:ला तोशीस पोचवून तसं करतंही असे. माझ्या भावाच्या मुंजीत तिने घातलेलं ५०१ रुपयांचे पाकीट काय किंवा आजीने तिला दिलेला स्वेटर तिने गावी आईसाठी पाठवून देणं काय ह्या सगळ्याबद्दल ती माझ्या आईची बोलणीही खात असे. ब-याचदा पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण मिरवण्याचा मोह भल्याभल्यांनाही आवरत नाही. मग ह्यापैकी काहीच नसलेल्या तिने आपल्याकडची मनाची श्रीमंती मिरवली तर त्यात काय चूक?
ती फटकळ आहे असंही ब-याच जणांचं मत होतं. मला वाटतं फाटक्या खिशाचा फाटक्या तोंडाशी जवळचा संबंध असावा. ती आदर्श होती असा दावा मी करणार नाही. पण तिच्यातले दोष झाकण्याएवढे गुण नक्कीच तिच्यात होते. पण त्याचबरोबर समस्त मोलकरीण जमातीचे काही गुणविशेषही होते. कधीकधी भिंतीचे कान बनून ती घरोघरीच्या नाना परी आमच्यापर्यंत पोचवत असे, केर काढायला आल्यावर पसारा पडलेला असेल तर भरधाव तोंड सोड्त असे. माझं वजन वाढून मी बेढब झाल्यामुळे मला जीन्स कशी शोभत नाही हे ती जसं सहजपणे सांगे तितक्याच निरागसपणे “बाबूच्या घरचा रांगोळीचा स्टिकर वर्षभर टिकून आहे. कारण ह्या घरची माणसं पुण्यवान आहेत” हेही तीच सांगू जाणे. चांगलं बोललं की तो निरागसपणा आणि टीका केली की फटकळपणा हा दुटप्पीपणा नाही का?
आज भारतीची पूर्वीसारखी रोज भेट होत नाही. आजही ती आपल्या गळक्या घरात रहात असेल की मुंबई सोडून गावाकडे परत गेली असेल??? माझ्यासारखीच दुपारचा चहा पिताना किंवा पिझ्झा खाताना तिला तिच्या बाबूच्या घराची आठवण येत असेल का???
जपानात कुणाला मोलकरीण ही संकल्पनाच माहीत नाही. त्यामुळे भारतीचे आमच्या घराशी जुळलेले ऋणानुबंधही इथल्या लोकांना कळणार नाहीत. आणि कळत नाहीत हेच बरं कारण सांगायचं म्हटलं तरी मला ते कुठच्याच भाषेत सांगता येणार नाहीत.
खरंच हे ऋणानुबंध शब्दांच्या पलिकडलेच असतात. कितीही लिहिलं तरी पूर्ण न होणारे व शब्दांत न मांडताही परिपूर्ण.
अप्रतीम...
ब्लॉग मस्तच
ajun ek.. tuzi lihinyacha baj ekdam shanta shelkyansarkhi vatate.. sahaj..sopi tarihi classy.(mafi asavi, marathi shabda sapadla nahi)
flow khupach mast aahe.... sunder blog...
-अश्विनी गोरे.