पाहते तर योशिदासान करंगळीएवढया, He-manच्या तलवारीसारख्या दिसणा-या स्टीलच्या आयुधाने मला टोचत होत्या. पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांनीही किमोनोत दडवलेल्या पाकिटातून आपापल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या. मंडळी ती मिठाई नाजूकपणे तलवारीने कापून, तिलाच टोचून खात होती. हातातोंडाच्या लढाईला आम्ही तलवार वापरत नाही असं त्यांना सांगावसं वाटलं. पण चहा मिळाल्यावर बोलू म्हणून गप्प बसले. पण बाकी काहीही म्हणा मिठाई दिसायला आणि असायला भलती़च ग्वाssड होती.
आम्ही मिठाई खात असतानाच एक तरूण मुलगी खोलीत आली आणि चहा करायला लागली. यंत्राचं बटण दाबावं तशा तिच्या स्लो-मोशनमधे शिस्तबद्ध हालचाली सुरु झाल्या. प्रथम एका लाल सिल्कच्या कापडाची त्रिकोणी घडी करून चहाचे वाडगे आणि पळी पुसली, वाडग्यात मापाने माच्चाची हिरवी पावडर घातली, काळ्या चिनीमातीच्या बोन्साई रांजणातलं गरम पाणी बांबूच्या पळीने त्या वाडग्यात ओतलं आणि लाकडी चासेनने अंडं फेटावं तसाच पण हळुवारपणे चहा फेटला. तयार झालेला चहाचा वाडगा घड्याळाच्या दिशेने तीन वेळा फिरवला आणि बाजूला ठेऊन दिला. त्याबरोब्बर आज्जी उठल्या आणि तो वाडगा घेऊन पाहुण्यांकडे गेल्या. पाहुण्यांनी तो तीन वेळा आपल्याकडे फिरवून घेतला आणि त्या वाडग्यावरची नक्षी पाहून धन्य झाल्यासारखं दाखवलं. बोलक्या काकूंनी सगळ्यांच्या वतीने वाडगा आवडल्याचं सांगितलं. त्याबरोब्बर आज्जीची वाडगा कोण, कुठला, सध्याच्या ऋतूला तो कसा चांगला आहे ह्याविषयीची कॉमेंट्री सुरु झाली. वास्तविक मी जपानमधेच ह्याच्यापेक्षा कित्तीतरी सुंदर वाडगे पाहिले आहेत. त्या काळ्या वाडग्यात एवढं पाहण्यासारखं काय होतं ते त्या झेनलाच ठाऊक! सगळ्यात शेवटी माझ्यापर्यंत चहा पोचला. तो लहान बाळांच्या फॅरेक्स एवढा घट्ट आणि फेसाळ होता. चव कडुलिंबाच्या रसासारखी होती. लहानपणी चहाच्या आधी क्रीमचं बिस्किट खाल्लं की आई “आता चहा काय गोड लागणार!” असं म्हणायची. आणि इथे नेमकं तेच तत्त्व वापरून चहा पद्धतशीरपणे कडू लागवण्यात आला होता. सगळेजण वाडगा तोंडाला लावून सुर्रकन तो घट्ट चहा शोषून घेत होते. एवढी एकच गोष्ट मात्र मला चांगली जमली. चहा पिऊन झाल्यावर आलेल्या हिरव्या मिशा आणि आपापल्या कपाची उष्टावलेली कड ओल्या टिश्यूने पुसून तो वाडगा परत तीन वेळा फिरवून आज्जींकडे परत दिला. चहा करणा-या काकूंनी मग हळूहळू एक एक करून कप विसळले, चहाची भांडी विसळली, पुसली आणि एकदाचे नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही निघायला मोकळे झालो. इथे एका परिच्छेदात आटपलेली सेरेमनी प्रत्यक्षात मात्र तासभर चालू होती. एक तास वज्रासनात बसून पाय जड होऊन दुखण्याच्या पलिकडे गेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच “चहा नको पण सेरेमनी आवर” असा मी आपल्या देवाचा धावा केला।
चहा पिण्यासारखा साधा आनंद एवढा अगम्य का वाटावा? का तो सोपा झाला तर त्यातली मजा निघून जाईल? टी सेरेमनी करण्यामागे “इचि गो इचि ए” (一期一会) अशी संकल्पना आहे. म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक गाठभेट ही एकमेवच असल्याने तिचा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी हा टी सेरेमनीचा खटाटोप. बरोबरच आहे. असा अखंड वज्रासनात बसवून, न बोलता, कडू चहा प्यायला दिला तर ती भेट ही शेवटचीच ठरेल ह्यात काय शंका?
चहाचा मार्ग वगैरे म्हटलं की मला लगेच आठवतो आमचा कॉलेजचा दीक्षित रोड. ’चायला’ ही शिवी न रहाता देणा-याला आणि घेणा-यालाही आनंद वाटावा अशी जागा म्हणजे तो चहावाला. आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची. आमच्या टी. वायच्या वर्गात मोजून नऊ टाळकी होती. तास संपला की चर्चा, मस्करी सगळं फुल्याफुल्यांच्या गाळलेल्या जागा भरून वर्गातून टपरीवर पुढे चालू होई. एकदा तर पावसाळ्यात शेक्सपिअर शिकताना “अत्ता चहा हवा होता बुवा!” असं कुणीतरी म्हणालं तेव्हा कॉलेजच्या आणि टपरीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तो चहा टपरी ओलांडून वर्गात आला होता. आणि मग तेव्हापासून आम्ही Tea.Y.B.A. म्हणून ओळखले जायला लागलो. तिथे टपरीवर खिदळणे, गाडयांचे हॉर्न, चहावाल्याने पळीने केलेली ठोकठो्क ह्या सगळ्या गदारोळात चर्चा, रोमान्स, भांडणं, मांडवली, अभ्यास हे सगळं व्यवस्थित चालू असायचं. जप्त झालेली आय. डी., प्रेमभंग सारखी चहाच्या कपातली वादळंही चहानेच थंड व्हायची आणि केट्या सुटल्याचे, थापा पचल्याचे आनंदही चहानेच साजरे केले जायचे. दुःखाचा किंवा आनंदाचाही जास्त बाऊ न करता “कटिंग”वरच ठेवायची फिलॉसोफी त्या टपरीवरच्या चहाने शिकवली. मला खात्री आहे की जपानी टी सेरेमनीतसुद्धा नियमांच्या ऐवजी थोडया दिलखुलास गप्पा असत्या तर तो कडू चहाही नक्कीच गोड झाला असता. आणि ह्या एकमेव भेटीनेच पुढल्या भेटीची ओढ लावली असती.
निःशब्दपणे हिरव्या चहाचा एकेक घोट घेताना त्या चहातून आजुबाजूचा निसर्ग आपलाच एक भाग असल्याची सुखद जाणीव झेनला होते। आणि मला चहापत्तीच्या कडवटपणातून, आल्याच्या तिखटपणातून आणि दूधसाखरेच्या गोडव्यातून अगदी जिवलग मित्राला भेटल्याचं, मनसोक्त गप्पा मारल्याचं समाधान मिळतं. कुणाचं सुख कशात असेल हे सांगता येत नाही. पण म्हणतात नां “सर्व देव नमस्कारम्, केशवम् प्रतिगच्छति” तसेच चहाचे कोणतेही मार्ग शेवटी आनंदाच्याच वाटेला जाऊन मिळतात हेच खरं.
1 Comment:
Subscribe to:
Post Comments (Atom)
आधीही (बहुधा मिसळपावावर) वाचलेलाच लेख होता, पण पुन्हा वाचतांना नवी मजा आली!