30 तारखेच्या साहसातंच पुढच्या वर्षाचं ट्रेलर मला दिसलं. तोमोकोचा नव्या वर्षाचा संकल्प “लग्न करणे” असा असल्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबरचा हा शेवटचा थर्टी फर्स्ट असं तिला सारखं वाटंत होतं. त्यामुळेच की काय पण मला काय दाखवू आणि काय नको असं तिला होत होतं.
आजकाल आपल्याकडेदेखील गुढीपाडव्याऐवजी सगळे थर्टी फर्स्टच साजरा करतात. तसंच जपानमध्ये असावं. कारण जपानीत महिना आणि चन्द्र ह्यांच्यासाठी एकच शब्द आहे. त्यामुळे जपानाताही भारतीयांप्रमाणेच चान्द्रमास असावा असा माझा आपला एक अंदाज आहे.
जपानात नवीन वर्षाआधी सणासुदीचंच वातावरण असतं. नवीन वर्षाआधी लोक घराचा कोपरान कोपरा झाडूनपुसून लख्ख करतात. माझ्या शाळेतही (मी सोडून) सर्व शिक्षकांनी आपापली टेबले साफ केली. घराबाहेर किंवा जिंजाबाहेर (निंजा नव्हे. जिंजा म्हणजे शिन्तो आश्रम) “कोदामात्सू” (बांबू, गवत आणि पाईनचे तोरण म्हणा नां!) लावतात. ३१ तारखेला बरोब्बर १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करतात. एक तारखेच्या दिवशी कुटुंबकबिल्यासकट जिंजामध्ये प्रार्थनेसाठी जातात. मित्रांना, सहका-यांना, नातेवाईकांना भेटकार्डे पाठवतात. (मला दिवाळीची कितीकिती म्हणून आठवण झाली! आणि हे लिहीत असताना मागे “गेले ते दिन गेले” चालू आहे. वाह! रडण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झालं आहे!)
मी काही फार मोठी धार्मिक नाही. बाप्पांची आठवण मला फक्त परीक्षेच्या आधी होते. पण तोमोको मात्र अतिशय धार्मिक आहे. तिच्याकडे भाविष्यावरचं एक पुस्तक आहे. त्यात जन्मतारखेनुसार अमुक एका दिवशी अमुक एका दिशेला प्रवास करावा किंवा करू नये वगैरेची कोष्टके दिली आहेत. त्या पुस्तकावर तिची नितांत श्रद्धा आहे. पुस्तकानुसार तोमोकोला ३१ च्या रात्री पश्चिमेकडचा प्रवास वर्ज्य असल्यामुळे कुमामोतो किल्ल्यावरची फटाक्यांची आतषबाजी बघायला जाता आले नाही. पण त्याच्याचमुळे मला “जोयानोकाने” साठी मात्र जाता आलं. ब-याच जपानी लोकांनीही हे केलं नाही आहे हे ऐकल्यावर मी त्या पुस्तकाचे मनोमन आभार मानले.
नववर्षाच्या दिवशी काही देवळामध्ये एक मोठी घंटा १०८ वेळा वाजवली जाते. (१०८ हा आकडा मला ज़रा ओळखीचा वाटला. आपल्याकडे पण जपमाळेत मणी १०८च असतात नाही का?) १०८ च का? तर तोमोको म्हणाली की माणसाला १०८ प्रकारच्या वेगवेगळ्या भौतिक इच्छाआकांक्षा (जपानीत “बोन नोऊ”) असतात. जो घंटा वाजवतो किंवा ऐकतो तो हया इच्छांपासून मुक्त होतो. (पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक जपानी दरवर्षी हया घंटा ऐकत असतो. तरीही रोबोट, वेगवेगळी यंत्र पण जपानमध्येच निर्माण होतात. त्यामुळे कदाचित भौतिक इच्छांचे प्रकार १०८ हून बरेच जास्त असावेत असा विचार माझ्या मनात आला.) तर ही घंटा वाजवण्यासाठी आम्ही तामाना डोंगरावरच्या देवळात जायला निघालो. लांबूनही तामानाचा डोंगर आणि त्याच्यावरचा उंच पागोडा दिव्यांच्या प्रकाशात सुंदर दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत दगडी दिव्यातल्या ज्योती मिणमिणत होत्या. जणू अख्खा डोंगरच एक भव्य दीपमाळ झाला होता.
बाहेर थंडीचा कडाका वाढतच होता. पण तामानाला जावून पोचलो तर असंख्य गाडया तिथे अगोदरच येऊन पोचलेल्या होत्या. काही टूरिस्ट कंपन्यांनी तर चक्क खास त्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. देवळाच्या ब-याच लांब गाडी लावून आम्ही देवळात निघालो तर अजूनही गाडया येतच होत्या आणि पार्किंगसाठी अजिबात जागा नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना वाटेतच थांबवून ठेवले होते. घंटा १०-१० च्या गटाने वाजवायची असल्यामुळे पहिल्या १०८० भाग्यवानांनाच ही संधी मिळते. पण आमचे तारे जोरात होते. त्यामुळे तिकिट घेऊन आम्ही एका लांबलचक रांगेत उभे राहिलो.
आमची पाळी आली आणि एक लांब दोरखंड आमच्या हातात देण्यात आला. घंटा वाजवतानाचा मंत्र सांगण्यात आला. आणि मग तो दोर ओढून आम्ही ती घंटा वाजवली. सर्व आसमंत त्या घनगंभीर आवाजाने भरून गेला. तो क्षणच इतका भारलेला होता की आपोआपच “कर जुळले दोन्ही” चा अनुभव आला. क्षणभर थांबून डोळे मिटून देवाची प्रार्थना केली. (मी अगदी मनापासून “तोमोकोला तिचा जोडीदार मिळू दे” अशी प्रार्थना केली पण नंतर तोमोको म्हणाली जपानी देव अशा प्रार्थनेला पावत नाहीत. अशा वेळी काही मागायचं नसून देवाचे आभार मानायचे असतात. पण देवांचं पण काहीतरी नेटवर्क असेलंच की नाही! जपानी देव माझी प्रार्थना आमच्या बाप्पांपर्यंत नक्की पोचवतील.)
घंटा वाजवून बाहेर पडलो तर तिथे तीर्थ म्हणून “आमाझाके” (गोड दारू) वाटत होते. ती आम्ही एक घोट प्यायलो आणि तोमोको जवळजवळ ओरडलीच. तिला गाडी चालवायची होती आणि जपानात गाडी चालावताना रक्तात दारूचा एक थेंबदेखील असणे हा गुन्हा आहे. पण तीर्थाला नाही म्हणणेदेखील तिला पटेना. अशाप्रकारे पापाचं खातं वर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडलं गेल्यामुळे तिला फारच वाईट वाटलं.
जपान हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा देश. तिथे भावभावनांना स्थान नसते. पण त्या दिवशी तामानाच्या रुपाने ह्याच देशाचा एक भाविक कोपरा मला पहायला मिळाला. तोमोकोसान… कोकोरोकारा आरिगातो!
“अगं तू ३१च्या रात्री काय करणार आहेस?”
“नाही गं अजून काहीच ठरलेलं नाहीएं.”
“मग तू माझ्या घरी रहायला ये नां. नववर्षाचं स्वागत आपण जपानी पद्धतीने करूयात. चालेल?”
इतक्या आपुलकीच्या आग्रहाला मी नाही म्हणूच शकले नाही. आणि जवळजवळ १ डिसेंबरलाच तोमोकोने मला बुक करून टाकलं. तोमोको नुसतं आमंत्रण देवूनच थांबली नाही तर ३० तारखेला सकाळी ९ वाजता मी तुला न्यायला येते आहे असा निरोपही पाठवला. वास्तविक तोमोकोचं घर माझ्या घरापासून गाडीने जवळजवळ तासाच्या अंतरावर आहे. उगीच माझ्यासाठी तोमोकोला एवढा त्रास देणं काही मला बरं वाटेना म्हणून अर्धं अंतर मी बसने येते असं म्हटल्यावर तिच्या जपानी मनाला ते अजिबात पटलं नाही. माझ्या पाहुणचारात काहीही कसर ठेवायची नाही असा चंगच तिने बांधला होता.
दुर्दैवाने २९ तारखेच्या रात्रीच इथे जोरदार बर्फ पडायला सुरुवात झाली. रात्रभर वादळी वा-यासह बर्फ पडत होता. सकाळी सहाच्या सुमारासच इथे रस्त्यांवर ४ इंच बर्फाचा थर साचला होता. आता काही तोमोको येत नाही असं मला वाटलं पण बाईसाहेब ठरल्यावेळी दाराशी हजर झाल्या.
तोमोकोच्या गाडीला बर्फासाठीचे खास टायर बसवलेले नव्हते. त्यामुळे आम्ही दोघीही प्रचंड घाबरलेल्या होतो. काहीही न बोलता एका विचित्र शांततेत आम्ही दोघीही जीव मुठीत धरून बसून होतो. (बरोबर कुणीतरी असताना अर्धा तास मी चक्क “सायलेंट मोड” मध्ये? विश्वासच बसत नाहीए!) जाताना काही गाडय़ांना अपघात होऊन त्या रस्त्याच्या कडेला उभ्या पाहिल्यावर नवीन वर्षाची पहाट काही माझ्या नशीबात नाही बहुतेक वगैरे अभद्र विचारदेखील अगदीच मनात आले नाहीत असं नाही.
आसो नावाचा ज्वालामुखीय पर्वत अगदी जवळ असल्यामुळे ’सेवा’ या माझ्या गावात (आणि जवळच्या याबे या गावात) भरपूर बर्फ पडतो. पण गंमत म्हणजे एकदा याबे ओलांडलं की अगदी जादू केल्यासारखं बर्फ किंवा पाऊस नावालासुद्धा दिसत नाही. त्यामुळे ३० तारखेला तोमोकोच्या इथलं आकाश एवढं निरभ्र होतं की माझ्याइकडे बर्फ पडतंय हा मला झालेला भास होता की काय असं मला वाटलं.शेवटी एकदाचं आम्ही याबे ओलांडलं आणि त्या “white out” मधून सहीसलामत बाहेर पडलो. तोमोकोने शांतपणे गाडी बाजूला थांबवली आणि चक्क मला मिठी मारली!
मागच्या महिन्यात एका कॉन्फरन्सला (मराठी प्रतिशब्द?) गेले होते. “जेट” या उपक्रमाअंतर्गत कुमामोतोमध्ये सहाय्यक इंग्रजी शिक्षक म्हणून काम करणा-यांसाठी ही कॉन्फरन्स होती. ह्या निमित्ताने विविध देशांच्या, भाषांच्या, वयांच्या पण एकच काम करणा-या अनेक लोकांना भेटण्याचा योग आला.
दुस-या महायुद्धानंतर जपानने जगासाठी आपले दरवाजे बंद केले होते. आता स्वयंपूर्ण राष्ट्र म्हणून जन्माला आल्यावर जपान जगासाठी खुला झाला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून गेल्या २० वर्षांपासून जपानी परराष्ट्र खात्यातर्फे जेट नावाचा एक उपक्रम देशोदेशी राबवला जातो. भारतातून यंदा माझ्यासारख्या ९ जणांची निवड झाली होती. जगाशी व्यवहार करताना जपानला येणारी मोठ्ठी अडचण म्हणजे भाषेची. भारतात इंग्रजी ही परभाषा (foreign language) नसून दुसरी भाषा (second language) आहे. पण आजही जपानमध्ये चाळीशीपुढची पिढी इंग्रजी अजिबात वाचू किंवा बोलू शकत नाही. टोकियोसारख्या मोठया शहरात परिस्थिती बरी असेल कदाचित पण इथे ग्रामीण भागात मात्र प्रश्न बिकट आहे. म्हणूनच जपानी शाळांतून विद्यार्थ्यांना इंग्रजीची आणि त्याचबरोबर आपापल्या देशाची ओळख करून देणे हे माझ्यासारख्या जेट शिक्षकांचे काम आहे.
बरंच विषयांतर झालं. तर ह्या कॉन्फरन्समध्ये प्रत्यक्ष शिकवण्यापलिकडे जावून ब-याच विषयांची चर्चा झाली. त्यापैकीच एक म्हणजे जपानी लोकांशी संवाद कसा साधावा हा होय. त्यासाठी जपानी लोकांमध्ये वावरताना, त्यांच्याशी बोलताना परदेशी लोकांना खटकणा-या गोष्टी कोणत्या ह्याचा एक सर्व्हे (मराठी प्रतिशब्द?) घेण्यात आला.
मला खटकणारी गोष्ट म्हणजे जपानी माणसे बोलताना कधीच नजरेला नजर देत नाहीत त्यामुळे आपण एकटे स्वतःशीच बोलत आहोत की काय असं मला सारखं वाटत रहातं.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की पश्चिमेकडून आलेल्या ब-याच लोकांना “तुम्ही चॉपस्टिक्स किती छान वापरू शकता” असं जपानी लोकांकडून होणारं कौतुक खटकत होतं.
आता जपानी लोकांकडून होणा-या कौतुकाने वैतागून जायचं काय कारण आहे? हे लोक स्वतःला फारच शहाणे समजतात असा समज करून घेऊन मी ती गोष्ट तिथेच सोडून दिली. पण नंतर निवांतपणे बसून विचार केल्यावर मला सापडलेली ही काही कारणं.
१. जपानमध्ये साधारणपणे ६ महिने किंवा त्याहून अधिक काळ रहिल्यानंतर चॉपस्टिक्स वापरता येणे ही काही फार मोठी गोष्ट रहात नाही. चॉपस्टिक मॅनर्स (मराठी प्रतिशब्द?) कठीण असतील कदाचित (सगळ्या जपान्यांना तरी माहीत असतील की नाही कुणास ठाऊक!) पण चॉपस्टिक्स वापरून जेवणे हे एवढं कठीण नक्कीच नाही. थोडयाशा सरावाने कुणालाही ते सहज जमू शकतं. मग त्याचं कौतुक होणं म्हणजे जरा अतिच! एक मुलगा म्हणाला,” हे म्हणजे तुम्ही किती छान चालू शकता” असं म्हणण्यासारखंच आहे!
२. दुसरं कारण थोडंसं मानसिक आहे. “तुम्ही चॉपस्टिक्स किती छान वापरता” अशी दाद देताना त्यापाठीमागे “तुम्ही जपानी नसूनसुद्धा” हे अध्याहृत असतं. ह्याचाच अर्थ तो कौतुक करणारा माणूस प्रत्यक्षात तुम्हाला परका समजत आहे असा काही जणांचा समज होऊ शकतो. जपानी मनात (आणि भाषेतही) आजुबाजूच्या जगाची “उचिवा” (आपली माणसं) आणि “सोतोवा” (परकी माणसं) अशा दोन गटात आपोआपच विभागणी होत असावी. परक्या देशात घर करून रहाणा-या प्रत्येकाला त्या देशातल्या लोकांनी आपल्याला घरच्यासारखं वागवावं असंच वाटत असतं. मग आपल्या माणसाचं आपण अशा साध्यासाध्या गोष्टींसाठी कौतुक करतो का?
चॉपस्टिक्स नाही पण जपानी बोलण्याच्या बाबतीतला माझा अनुभव ह्या वैताग्या मंडळींसारखाच आहे. तुम्ही साधं आपलं नाव जरी जपानीत सांगितलंत तरी इथली लोकं तुमची तोंडभर स्तुती करतील. मला पहिल्यापहिल्यांदा उगीचच आपण फार ग्रेट वगैरे आहोत असं वाटायचं. नंतरनंतर मात्र अगदीच वैताग नाही तरी “अरे हे काय चाललंय?” असे भाव माझ्या चेह-यावर नक्कीच उमटले असतील.
पण आजुबाजूच्या लोकांना थोडंच बदलता येतं? म्हणून मग आता मी माझा दृष्टिकोनच बदलला आहे.
अशी दाद देणे हा जपानी औपचारिकपणाचाच एक भाग असावा. शहाण्याने त्यातून फार काही अर्थ काढण्याच्या फंदात पडू नये हे बरं. संभाषणाची सुरुवात करणे एवढाच मर्य़ादित हेतू त्यात असावा. ह्यालाच जपानीत “आइसात्सु” असं म्हणतात. हवापाण्याच्या गप्पांऐवजी कौतुक एवढाच काय तो फरक.आता कुणीही मला मी कशी छान जपानी बोलते हे सांगितल्यावर मला आनंदच होतो. मी खरंच जपानी चांगलं बोलते म्हणून नाही तर कुणालातरी माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटताहेत म्हणून!
बाहेरच्या लोकांसाठी मुंबईची ओळख जरी उद्योगसंस्कृती अशी असली तरीही मला मात्र मुंबईची खाद्यसंस्कृतीच जास्त भुरळ घालते. पिझ्झा हट्, मॅकडोनाल्डस्, सब्-वे अशा परकीय आक्रमणांना न जुमानता चाट, सॅन्डविच्, डोसा, वडापाव विकणारे असंख्य एतद्देशीय भय्या, दादा, काका, अण्णा हे मुंबईकरांच्या उदराभरणाचा गाडा सुखेनैव हाकत आहेत. मुंबईकरांच्या रसनेची आणि त्याचबरोबर खिश्याचीही काळजी घेणारी ही चालतीबोलती रेस्टॉरंट्स हेच मुंबईचे खरे वैशिष्टय आहे असे मला वाटते.
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीविषयी बोलताना अग्रपूजेचा मान चाटचा आणि त्यातही भेळेचा (की भेळीचा?) काही जण मानतात की भेळ गुजरातहून आली, तर काही जण म्हणतात उत्तरप्रदेशातून. (पण भेळ बनवणा-यांसाठी भय्या हे कॉमन संबोधन असल्यामुळे भेळेचा जन्म एखाद्या उत्तरप्रदेशीय रसोईत झाला असावा हे माझे मत) पण भेळेचा बनिया संस्कृतीशी जवळचा संबंध असावा. गल्ल्यावर बसल्याबसल्या तोंडाला चाळा म्हणून कुरमुरे, शेव आणि चाट मसाला ह्यांचे मिश्रण जन्माला आले असावे. नंतर कुण्या देशीच्या बायडीने (बुवानेही असेल कदचित!) त्यात आपल्या कल्पकतेची भर घालून आजची साग्रसंगीत भेळ तयार झाली असावी. भेळेचं माहेर कुठेही असो. आज ती सासरी सुखाने नांदते आहे.
भेळेचा USP हा की ती चुटकीसरशी तयार होवू शकते. तळणे, शिजवणे, भाजणे ही भानगड नसल्यामुळे एकदा का कच्चा माल तयार असला की पाचव्या मिनिटाला खायला सुरुवात करता येते.
पण रस्त्यावरच्या भेळेचा ख्ररा आनंद लुटायला थोडं आंधळं व्हावं लागतं. भय्याच्या हातांचा रंग, चटणीसाठी वापरलेलं पाणी वगैरेचा विचार करायला लागलात तर भेळ तुमच्या कधीच पचनी पडणार नाही. फक्त कल्पना करा की समोर निळाशार समुद्र पसरलेला आहे, त्या स्वच्छ किना-यावर भेळेचं एक टुमदार दुकान आहे. तुम्ही तिथे गेल्यावर पांढराशुभ्र एप्रन नेसलेला भय्या अदबीने तुमचे स्वागत करीत आहे आणि ग्लोव्ह्ज घालून नुकत्याच निर्जंतुक केलेल्या पातेल्यात टी-स्पून टेबलस्पूनच्या मापाने भेळ बनवतो आहे. शेजारीच एका फलकावर भेळेच्या आहारमूल्याचा एक तक्ता लिहिलेला आहे. हे चित्र म्हणूनच ठीक आहे. पण प्रत्यक्षात भय्या जर असे वागू लागला तर लोक नक्कीच त्याच्या एक ठेवून देतील आणि त्याला भानावर आणतील. (“बागबान” नावाचा एक अतिशय सुमार हिन्दी चित्रपट पाहिला आहात का? त्यातल्या सलमान खानच्या अतिचांगुलपणामुळे मला अशीच एक ठेवून द्यावीशी वाटत होती!) जी गोष्ट भेळेची तीच पाणीपुरीची. लाल फडकं लपेटलेल्या स्टीलच्या घड्यात न बुचकळलेली पाणीपुरी खाल्ली तर माझं पोट नक्कीच बिघडेल! The secrets of a perfect bhel/panipuri lie in these imperfections! नाही म्हणायला मिनरल वॉटर पाणीपुरी नावाचे एक फॅड आले होते कधीतरी. पण मुंबईकरांना फार काळ मानवले नाही.
जुहूचा किनारा, खारी हवा, सुखद गारवा, आणि वाळूत अंथरलेल्या चटईवर बसून सूर्यास्त पहात आणि नाकाडोळ्यातलं पाणी परतवत कागदी द्रोणातल्या अगदी तळाशी रहिलेल्या चुरमु-यापर्यंत खाल्लेली झणझणीत पण चटकदार भेळ! तिची सर पंचतारांकित हॉटेलातल्या जेवणालाही येणार नाही. अगदी फुकट असलं तरीही…अशा भेळेच्या कर्त्याकरवित्याविषयी पुन्हा कधीतरी!
मी चाट ह्या प्रकाराची अशक्य चाह्ती आहे. एरवी एक पोळी आणि लिंबाएवढा भात असं मोजूनमापून जेवणारी मी पण चटकदार भेळ, गोडूस दहीपुरी किंवा वाफ़ाळतं रगडापॅटिस बघितलं की माझी भूक अक्राळविक्राळ रूप धारण करते. ते पाहूनच की काय “चाट पडणे” सारखा वाक्यप्रचार मराठीत आला असावा. हे एवढं लिहित असतानादेखील माझ्या तोंडाला महापूर आला आहे!
पण सध्या जपानच्या कोप-यातल्या एका छोट्याशा गावात राहून जिभेचे चोचले कसे पुरवू? नाही म्हणायला टोकियोतल्या “ताज” नावाच्या एका हॉटेलात खाल्ली होती. पण ती खाल्ल्यावर “याच वाडगाभर पाण्यात बुडून जीव दे” असं करणा-याला म्हणावंसं वाटलं.
पण मी इतक्या सहजी हार मानणार नाही. रसभरीत जेवणाचा नाही तर रसभरीत वर्णनाचा आनंद तर मला नक्कीच घेता येईल. हे म्हणजे दुधाची तहान दुधाच्या जहिरातींवर भागवण्यासारखे आहे. पण नाइलाजास्तव “they hog and I blog” असे ब्रीदवाक्य करण्याखेरीज गत्यंतर नाही.
काही गोष्टी नमनातच (घडाभर तेल लागले तरी) कबूल करायच्या असतात.
माझी मायबोली मराठी तर माझी पितृभाषा (असे काही अस्तित्वात असेल तर)इन्ग्रजी आहे. आता जपानात मुक्काम ठोकल्यावर गप्पा पण जपानीत ठोकाव्या लागतात. त्यामुळे माझ्या डोक्यात भाषान्चा (हे असं टिळकान्च्या संत, सन्त, सन् तसारखं वाटतं आहे पण सवय होईपर्यंत इलाज नाही.) एक अभूतपूर्व गुंडा झाला आहे. त्यातूनच “ही डिश कसली ओईशिई (जपानीत चविष्ट) आहे नां!” असली त्रिवेणी संगमी वाक्ये अस्मादिकांच्या मुखातून सहज बाहेर पडतात. सांगायचा मुद्दा हा की चुकुनमाकुन माझ्या मनातला इंग्रजीचा कप्पा उघडला गेलाच तर चूकभूल द्यावी घ्यावी.
मग अशा मुलीने मराठीत लिहायचे उपद्व्याप करायचेच कशाला?
एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथे कुणालाही मराठी वाचता येत नाही. त्यामुळे मला कुणाचा राग आला की मी शिस्तीत एक कागद घेते आणि खुश्शाल त्याच्यावर माझी लेखणी मोकाट सोडते. (ह्यालाच papyrus therapy असं म्हणतात. जपानीत कागद आणि देव ह्यांच्यासाठी “कामी” असा एकच शब्द आहे हा योगायोग म्हणावा का?)
दुसरं म्हणजे इथे माझं काम जरी इंग्रजी शिकवण्याचं असलं तरी मुलं सर्रास जपानीतच बोलतात. त्यांना इंग्रजी बोलायला लावायचे माझे सर्व प्रयत्न कामी आले. मी इंग्रजीतून त्यांना काहीही विचारले की (मातृभूमीतले) कावळे वस्तूचे निरिक्षण करताना जशी मान वाकडी करतात तशी मान वेळावून ते “ऑं…ऑं???” असा विचित्र आवाज काढतात. त्यांना माझ्याशी बोलायचं नसावं कदाचित असा समज होऊन काही काळ मी थंड घेतलं. पण तेच प्रश्न माझ्या भारी जपानीत विचारले तर त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. हे ऐकून अडचण मी नसून भाषा आहे हे समजल्यावर निजमनास अतीव आनंदु जहाला.
आता त्याचेच अस्त्र मी त्यांच्याविरुद्ध वापरते. म्हणजे पहा हां- कुणीही मुलाने मला “先週の土曜日何をしたの?“(गेल्या शनिवारी काय केलंस?) असं विचारलं की मी शुद्ध मराठीत “अरे मट्ठा इंग्लिशमधे बोल की!” अशी सुरुवात करते. मुलगा/मुलगी कितीही मट्ट असली तरीही इंग्लिश हा शब्द त्यांना व्यवस्थित समजतो आणि गाडी इंग्रजीवर येते.
तिसरं कारण म्हणजे विशाल, शशांक, ट्युलिप वगैरें दिग्गजांच्या अनुदिन्या मी बरेचदा चाळते. पण “कधीतरी वाचणा-याने लिहिणा-याचे हात घ्यावेत” म्हणून लिहायला सुरुवात तर केली आहे. जात्यावर बसलं की ओव्या सुचतात म्हणतात तसं लिहायला लागल्यावर सुचतं आहे का बघू.
पण काहीही म्हणा. माझ्या मातीपासून दूर गेल्यावरच मी तिच्या जवळ यायला लागली आहे हे मात्र खरं!