30 तारखेच्या साहसातंच पुढच्या वर्षाचं ट्रेलर मला दिसलं. तोमोकोचा नव्या वर्षाचा संकल्प “लग्न करणे” असा असल्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबरचा हा शेवटचा थर्टी फर्स्ट असं तिला सारखं वाटंत होतं. त्यामुळेच की काय पण मला काय दाखवू आणि काय नको असं तिला होत होतं.
आजकाल आपल्याकडेदेखील गुढीपाडव्याऐवजी सगळे थर्टी फर्स्टच साजरा करतात. तसंच जपानमध्ये असावं. कारण जपानीत महिना आणि चन्द्र ह्यांच्यासाठी एकच शब्द आहे. त्यामुळे जपानाताही भारतीयांप्रमाणेच चान्द्रमास असावा असा माझा आपला एक अंदाज आहे.
जपानात नवीन वर्षाआधी सणासुदीचंच वातावरण असतं. नवीन वर्षाआधी लोक घराचा कोपरान कोपरा झाडूनपुसून लख्ख करतात. माझ्या शाळेतही (मी सोडून) सर्व शिक्षकांनी आपापली टेबले साफ केली. घराबाहेर किंवा जिंजाबाहेर (निंजा नव्हे. जिंजा म्हणजे शिन्तो आश्रम) “कोदामात्सू” (बांबू, गवत आणि पाईनचे तोरण म्हणा नां!) लावतात. ३१ तारखेला बरोब्बर १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करतात. एक तारखेच्या दिवशी कुटुंबकबिल्यासकट जिंजामध्ये प्रार्थनेसाठी जातात. मित्रांना, सहका-यांना, नातेवाईकांना भेटकार्डे पाठवतात. (मला दिवाळीची कितीकिती म्हणून आठवण झाली! आणि हे लिहीत असताना मागे “गेले ते दिन गेले” चालू आहे. वाह! रडण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झालं आहे!)
मी काही फार मोठी धार्मिक नाही. बाप्पांची आठवण मला फक्त परीक्षेच्या आधी होते. पण तोमोको मात्र अतिशय धार्मिक आहे. तिच्याकडे भाविष्यावरचं एक पुस्तक आहे. त्यात जन्मतारखेनुसार अमुक एका दिवशी अमुक एका दिशेला प्रवास करावा किंवा करू नये वगैरेची कोष्टके दिली आहेत. त्या पुस्तकावर तिची नितांत श्रद्धा आहे. पुस्तकानुसार तोमोकोला ३१ च्या रात्री पश्चिमेकडचा प्रवास वर्ज्य असल्यामुळे कुमामोतो किल्ल्यावरची फटाक्यांची आतषबाजी बघायला जाता आले नाही. पण त्याच्याचमुळे मला “जोयानोकाने” साठी मात्र जाता आलं. ब-याच जपानी लोकांनीही हे केलं नाही आहे हे ऐकल्यावर मी त्या पुस्तकाचे मनोमन आभार मानले.
नववर्षाच्या दिवशी काही देवळामध्ये एक मोठी घंटा १०८ वेळा वाजवली जाते. (१०८ हा आकडा मला ज़रा ओळखीचा वाटला. आपल्याकडे पण जपमाळेत मणी १०८च असतात नाही का?) १०८ च का? तर तोमोको म्हणाली की माणसाला १०८ प्रकारच्या वेगवेगळ्या भौतिक इच्छाआकांक्षा (जपानीत “बोन नोऊ”) असतात. जो घंटा वाजवतो किंवा ऐकतो तो हया इच्छांपासून मुक्त होतो. (पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक जपानी दरवर्षी हया घंटा ऐकत असतो. तरीही रोबोट, वेगवेगळी यंत्र पण जपानमध्येच निर्माण होतात. त्यामुळे कदाचित भौतिक इच्छांचे प्रकार १०८ हून बरेच जास्त असावेत असा विचार माझ्या मनात आला.) तर ही घंटा वाजवण्यासाठी आम्ही तामाना डोंगरावरच्या देवळात जायला निघालो. लांबूनही तामानाचा डोंगर आणि त्याच्यावरचा उंच पागोडा दिव्यांच्या प्रकाशात सुंदर दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत दगडी दिव्यातल्या ज्योती मिणमिणत होत्या. जणू अख्खा डोंगरच एक भव्य दीपमाळ झाला होता.
बाहेर थंडीचा कडाका वाढतच होता. पण तामानाला जावून पोचलो तर असंख्य गाडया तिथे अगोदरच येऊन पोचलेल्या होत्या. काही टूरिस्ट कंपन्यांनी तर चक्क खास त्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. देवळाच्या ब-याच लांब गाडी लावून आम्ही देवळात निघालो तर अजूनही गाडया येतच होत्या आणि पार्किंगसाठी अजिबात जागा नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना वाटेतच थांबवून ठेवले होते. घंटा १०-१० च्या गटाने वाजवायची असल्यामुळे पहिल्या १०८० भाग्यवानांनाच ही संधी मिळते. पण आमचे तारे जोरात होते. त्यामुळे तिकिट घेऊन आम्ही एका लांबलचक रांगेत उभे राहिलो.
आमची पाळी आली आणि एक लांब दोरखंड आमच्या हातात देण्यात आला. घंटा वाजवतानाचा मंत्र सांगण्यात आला. आणि मग तो दोर ओढून आम्ही ती घंटा वाजवली. सर्व आसमंत त्या घनगंभीर आवाजाने भरून गेला. तो क्षणच इतका भारलेला होता की आपोआपच “कर जुळले दोन्ही” चा अनुभव आला. क्षणभर थांबून डोळे मिटून देवाची प्रार्थना केली. (मी अगदी मनापासून “तोमोकोला तिचा जोडीदार मिळू दे” अशी प्रार्थना केली पण नंतर तोमोको म्हणाली जपानी देव अशा प्रार्थनेला पावत नाहीत. अशा वेळी काही मागायचं नसून देवाचे आभार मानायचे असतात. पण देवांचं पण काहीतरी नेटवर्क असेलंच की नाही! जपानी देव माझी प्रार्थना आमच्या बाप्पांपर्यंत नक्की पोचवतील.)
घंटा वाजवून बाहेर पडलो तर तिथे तीर्थ म्हणून “आमाझाके” (गोड दारू) वाटत होते. ती आम्ही एक घोट प्यायलो आणि तोमोको जवळजवळ ओरडलीच. तिला गाडी चालवायची होती आणि जपानात गाडी चालावताना रक्तात दारूचा एक थेंबदेखील असणे हा गुन्हा आहे. पण तीर्थाला नाही म्हणणेदेखील तिला पटेना. अशाप्रकारे पापाचं खातं वर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडलं गेल्यामुळे तिला फारच वाईट वाटलं.
जपान हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा देश. तिथे भावभावनांना स्थान नसते. पण त्या दिवशी तामानाच्या रुपाने ह्याच देशाचा एक भाविक कोपरा मला पहायला मिळाला. तोमोकोसान… कोकोरोकारा आरिगातो!
छान लिहितेस की ग तू! शिकवणे ह्या प्रोफेशन नंतर लिहिणे हे तुझं दो नं.च आय मीन क्रमांकाच उपजिविकेच साधन होऊ शकत ;) ही ही पोस्ट आवडली! आणखीही लिही जपान बद्दल त्यांच्या संस्कृती बद्दल