काही गोष्टी नमनातच (घडाभर तेल लागले तरी) कबूल करायच्या असतात.
माझी मायबोली मराठी तर माझी पितृभाषा (असे काही अस्तित्वात असेल तर)इन्ग्रजी आहे. आता जपानात मुक्काम ठोकल्यावर गप्पा पण जपानीत ठोकाव्या लागतात. त्यामुळे माझ्या डोक्यात भाषान्चा (हे असं टिळकान्च्या संत, सन्त, सन् तसारखं वाटतं आहे पण सवय होईपर्यंत इलाज नाही.) एक अभूतपूर्व गुंडा झाला आहे. त्यातूनच “ही डिश कसली ओईशिई (जपानीत चविष्ट) आहे नां!” असली त्रिवेणी संगमी वाक्ये अस्मादिकांच्या मुखातून सहज बाहेर पडतात. सांगायचा मुद्दा हा की चुकुनमाकुन माझ्या मनातला इंग्रजीचा कप्पा उघडला गेलाच तर चूकभूल द्यावी घ्यावी.
मग अशा मुलीने मराठीत लिहायचे उपद्व्याप करायचेच कशाला?
एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथे कुणालाही मराठी वाचता येत नाही. त्यामुळे मला कुणाचा राग आला की मी शिस्तीत एक कागद घेते आणि खुश्शाल त्याच्यावर माझी लेखणी मोकाट सोडते. (ह्यालाच papyrus therapy असं म्हणतात. जपानीत कागद आणि देव ह्यांच्यासाठी “कामी” असा एकच शब्द आहे हा योगायोग म्हणावा का?)
दुसरं म्हणजे इथे माझं काम जरी इंग्रजी शिकवण्याचं असलं तरी मुलं सर्रास जपानीतच बोलतात. त्यांना इंग्रजी बोलायला लावायचे माझे सर्व प्रयत्न कामी आले. मी इंग्रजीतून त्यांना काहीही विचारले की (मातृभूमीतले) कावळे वस्तूचे निरिक्षण करताना जशी मान वाकडी करतात तशी मान वेळावून ते “ऑं…ऑं???” असा विचित्र आवाज काढतात. त्यांना माझ्याशी बोलायचं नसावं कदाचित असा समज होऊन काही काळ मी थंड घेतलं. पण तेच प्रश्न माझ्या भारी जपानीत विचारले तर त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. हे ऐकून अडचण मी नसून भाषा आहे हे समजल्यावर निजमनास अतीव आनंदु जहाला.
आता त्याचेच अस्त्र मी त्यांच्याविरुद्ध वापरते. म्हणजे पहा हां- कुणीही मुलाने मला “先週の土曜日何をしたの?“(गेल्या शनिवारी काय केलंस?) असं विचारलं की मी शुद्ध मराठीत “अरे मट्ठा इंग्लिशमधे बोल की!” अशी सुरुवात करते. मुलगा/मुलगी कितीही मट्ट असली तरीही इंग्लिश हा शब्द त्यांना व्यवस्थित समजतो आणि गाडी इंग्रजीवर येते.
तिसरं कारण म्हणजे विशाल, शशांक, ट्युलिप वगैरें दिग्गजांच्या अनुदिन्या मी बरेचदा चाळते. पण “कधीतरी वाचणा-याने लिहिणा-याचे हात घ्यावेत” म्हणून लिहायला सुरुवात तर केली आहे. जात्यावर बसलं की ओव्या सुचतात म्हणतात तसं लिहायला लागल्यावर सुचतं आहे का बघू.
पण काहीही म्हणा. माझ्या मातीपासून दूर गेल्यावरच मी तिच्या जवळ यायला लागली आहे हे मात्र खरं!
keep posting.
Keep posting.
"मुलगा/मुलगी कितीही मट्ट असली तरीही इंग्लिश हा शब्द त्यांना व्यवस्थित समजतो आणि गाडी इंग्रजीवर येते."
चुकुन एखादा मराठी आल्यास जपावे. यासाठी best of luck!
टिळकांच्या सन्त च्या उदाहरणात आणि तुमच्या भाषान्चा उदाहरणातला एक फरक (कदाचित कळला असेलच आतापर्यंत) की टिळक बरोबर आहेत.
अनुस्वाराचे व्यंजन (का जे काय असेल ते) हे त्याच्या पुढच्या अक्षरावरून कळते. म्हणजे संत मधे ‘त’ पाइ तो अनुस्वार अर्धा न होतो, पण तुमच्या ‘भाषांच्या’ तला अनुस्वार काढायचा असेल तर तो ‘भाषाञ्चा’ लिहावा लागेल, तसेच ‘इंग्रजी’ चे ‘इङ्ग्रजी’ होईल.
काही छान links आधीच्या comment मधे कळवल्याप्रमाणे येथे आहेत : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1