V-Day

ब-याच दिवसात काहीच लिहिलेलं नाही. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. लिहिण्यावरचं माझं प्रेम व्यक्त करण्याचा लिहिण्यासारखा दुसरा मार्ग नाही आणि व्हॅलेंटाइन डे सारखा दुसरा मुहूर्त नाही असा विचार करून शेवटी जरा उशीरा का होईना पण जपानी व्हॅलेंटाइन डे बद्दलंच लिहायचं ठरवलं.
एकंदरीत V-day म्हणजे कुणीही कुणावरही प्रेम करण्याचा दिवस असं मला वाटायचं. पण जपानात आले आणि काहीतरी वेगळाच प्रकार ऐकला आणि पाहिला. १४ फेब्रुवारीला जपानात व्हॅलेंटाईन डे नाही तर चॉकलेट डे असं म्हणतात. हया दिवशी घरोघरच्या ताई माई अक्का ह्या काका, मामा, बाबा, मित्र सहकारी अशा कुठल्याही कॅटेगरीतल्या पुरुषांसाठी चॉकलेटं किंवा इतर काही वस्तू बनवतात किंवा विकत घेतात. चॉकलेटचेही असंख्य प्रकार. तोमो-चॉको=मैत्री व्यक्त करण्यासाठीचं एकदम जनरल चॉकलेट, गिरी-चॉको=वरिष्ठांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठीचं “मस्का” चॉकलेट, आई-चॉको=प्रेम व्यक्त करण्यासाठीचं चॉकलेट वगैरे वगैरे….
इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण खरी आश्चर्याची गोष्ट पुढेच आहे. १४ फेब्रुवारीला मिळालेली सगळी चॉकलेटं आणि भेटवस्तू परत कराव्याच लागतात- १४ मार्चला! जपानात त्यादिवशी पांढरा दिवस साजरा केला जातो. आता प्रेमाचा रंग लाल किंवा गुलाबी असतो अशी एक युनिवर्सल समजूत आहे. पण जपानी लोकांना ते पांढरं का दिसावं हे मला माहीत नाही.
बरं नुसतं चॉकलेट फ़ॉर चॉकलेट असावं तर तेही नाही. काय तर म्हणे घेतलेल्या वस्तूच्या निदान तिप्पट किमतीची वस्तू तरी द्यावीच लागते. (कदाचित अशा अघोरी प्रथेमुळे पुरुषांचे पांढरेफटक पडलेले चेहरे पाहूनच कुणालातरी त्या दिवसाला पांढरा असं नाव देण्याची दुष्ट कल्पना सुचली असावी) सगळं जग जरी महिला दिवस ८ मार्चला साजरा करीत असलं तरी जपानी महिला मात्र तो ख-या अर्थाने १४ मार्चला साजरा करत असाव्यात.
पण मला मात्र ही जपानी पद्धत अजिबात पटत नाही. प्रेमाने दिलेल्या एखाद्या वस्तूची किंमत तरी कशी मोजावी आणि केवळ कोरडया व्यवहारापोटी परत केलेल्या तिप्पट किमतीच्या वस्तूची किंमत खरं तर शून्यच नाही का?
तो संत वॅलेंटाईन कोण होता त्याने खरंच प्रेमाचा प्रसार केला किंवा नाही ह्या गोष्टीशी मला जराही देणंघेणं नाही. पण प्रेम किंवा मैत्रीसारखी ब-याचदा अव्यक्त रहाणारी भावना शब्दांत किंवा कृतीत उतरवण्याचा दिवस म्हणून मला हा दिवस आवडतो.
आता काही जण म्हणतील की मग त्याला वेगळा दिवस कशाला हवा, ते आपण कधीही करू शकतो की! खरं आहे. पण काही शब्द सततच्या वापराने गुळगुळीत आणि बोथट होतात त्यापैकीच प्रेम हा आहे. मी किंवा माझे बरेच मित्रमैत्रिणी मेलचा शेवट “love” असा करतात. त्यापैकी किती वेळा तो खरंच मनापासून लिहिला जातो आणि किती वेळा फक्त बोटांपासून लिहिला जातो? मागे मी Amy Tan नावाच्या लेखिकेने लिहिलेलं The Joy Luck Club नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. पूर्ण गोष्ट मला आठवत नाही पण एक प्रसंग मात्र ह्या संदर्भात आठवतो. लिना आणि तिचा नवरा कुठेतरी बाहेर निघालेले असतात आणि आणि गाडीत शिरताशिरता लिना आपल्या नव-याचा हात हातात घेते आणि प्रेमाने म्हणते, “Herald, I love you!” हेराल्ड आरशात पहात गाडी मागे घेत म्हणतो, “ I love you too. Did you lock the door?”
पुस्तक वाचतानाही वाटलं होतं आणि आत्ताही वाटतं आहे…something is missing…seriously missing!

6 Comments:

 1. Anonymous said...
  Yes, something is missing.
  Or is it someone? ;)
  Saee said...
  something is missing because someone is missing...or is it the other way round? i dont know...[:)]
  Anonymous said...
  No new post?
  प्रशांत said...
  Hi,
  I am also a marathi blogger.
  Your blog is quite interesting.
  Keep blogging. Can you write to me on pumanohar@gmail.com ?
  I am collecting names and emails of marathi bloggers.
  This comment may not be published.
  Unknown said...
  उपरोक्त लेख उत्तम आहे ... परन्तु हां लेख मी काही महिने आधीच वाचला आहे ... पण असो ... नेहमीप्रमाणे लिखाण छान झाला आहे ... थोडा नियमितपणा दाखवा की ताई !! चार महिने उलटले आहेत ... नवीन लेख नाही ... लोका सांगे ब्रम्ह ज्ञान असे नको व्हायला :)

  खडूसपणा बास झाला !! छान लिहिला आहे ... एकदम पुलं प्रेरित शैली वगैरे .. नेहमी लिहित जा ... आणि विविध विषयांवर .. म्हणजे तुझ्या शिक्षकीचा आम्हाला जपान अभ्यासात फायदा होईल
  Yogita Kamat said...
  Very well narrated,extremely well-drafted,re-kindled fond memories of yester-years.
  Mumbai chi athvan karun dilis,ani khaas karun majhya parlyachi.
  ithe bangalore madhe asun,mumbaila jaun alo ase vatle.thank you for writing such a wonderful blog.
  keep it up.all the best!

Post a Comment