कचरा

जपानात पहिले दोन आठवडे होमस्टेची ऐश लुटल्यावर स्वत:च्या अपार्टमेंट्मध्ये येऊन “चला आता आपण स्वातंत्र्यवीर” असा मोकळा श्वास घेतला. पण लवकरच ’स्वातंत्र्यातला जाचकपणा’ सारख्या आत्तापर्यंत फक्त गज़लांमध्येच ऐकलेल्या कल्पना प्रत्यक्षात अनुभवाला यायला लागल्या.
आल्याआल्याच सहज नजर फिरवली तेव्हा माझ्या स्वयंपाकघरातल्या भिंतीं कॅलेंडरसारख्या दिसण-या रंगीबेरंगी तक्तांनी व्यापलेल्या होत्या. त्यावर जपानी चित्रलिपीत काहीतरी लिहिलं होतं. मेंदूला फारसा ताण न देता असेल जपानी पद्धत म्हणून सोडून दिलं. पण कारण पुढच्याच आठवडयात कळलं.
कोण्या एका रम्य संध्याकाळी शेजारच्या एक जपानी काकू “गोमेन कुदासाई” अशी मंजुळ हाक मारत दारात आल्या. (माझ्या मराठमोळ्या नजरेला सगळ्याच जपानी बायका संतूरछाप “त्वचासे मेरी उम्र का पता ही नहीं चलता” वाटतात. त्यामुळे त्यांना काकू म्हणताना जीभ जरा अडखळते.) जपानी माणूस कधीही वेळ ठरवल्याशिवाय येत नाही. आलाच तर काहीतरी गडबड आहे असं डोळे मिटून समजून जावं. त्यामुळे त्यांना तेव्हा तसं अचानक आलेलं पाहून आज कुठला राग आळवला जाणार आहे ह्याचा मी अंदाज बांधायला लागले.
जनरल गप्पा झाल्यावर काकू समेवर आल्या. “कचरा कसा टाकतेस तू?” आता माझं घर, माझा कचरा, टाकणारी पण मीच. मग ह्या काकूंना कशाला नसत्या चौकश्या? एवढा विचार करेपर्यंत काकू स्वयंपाकघरात घुसलेल्या होत्या आणि त्यांनी चक्क माझ्या कचरापेटीला हात घातलेला होता. आणि पुढच्याच क्षणी माझ्या कचरापेटीचा नम्र भाषेत पंचनामा सुरु झाला. आणि मग अर्जुनाला गीता सांगावी अशा थाटात त्यांनी मला कच-यावर आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबद्दल एक गीताई सांगितली. तीच ’थोडक्यात’ (?)
कच-याला जपानीत “गोमी” असं म्हणतात. ऐकता क्षणीच cuteness scale वर ह्या शब्दाला दहापैकी नऊ मार्क देवून टाकले. गोमी म्हटलं की दोन पोनीटेल घातलेली एक छकुली “माझं नाव गोमी” म्हणत बागडते आहे असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं रहातं.
सध्या जपान्यांच्या जिव्हाळ्याचे शब्द म्हणजे “मोत्ताईनाई (wastage)”, “एको (eco)” आणि “रीसाईकुरिंगु (recycling)” (जपानीत ’अ’ हा स्वरच नसल्यामुळे सगळे अकारान्ती शब्द उकारान्ती उच्चारले जातात. त्यामुळे एकदम ज्ञानेश्वरी मराठीत बोलल्यासारखं वाटतं.) जपानमध्ये मोत्ताईनाई (टाकाऊ) असं काहीही आणि कुणीही रीसायकल होवू शकते. एका नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार इथली माणसे जवळजवळ एक चतुर्थांश आयुष्य कच-याची ३२७ गटात विभागणी करण्यात घालवतात. मुलांवरही इथल्या समस्त शामच्या आया हे संस्कारही करत असाव्यात.
आपण इतके घाईत असतो की कच-याची जबाबदरी खुश्शाल कचरेवाल्यावर सोपवून मोकळे होतो. पण इथे कचरेवाला ही संस्थाच नाही. आठवड्याच्या ठरवून दिलेल्या वारीच कचरा टाकता येतो, रोज नाही. बरं कचरा टाकायचा म्हणजे नुसताच घराबाहेर ठेवायचा असे नाही. तर विभागानुसार नाक्यानाक्यावर छोटया खोल्या बांधलेल्या असतात. त्या त्या विभागातील लोक आपल्या जवळच्या खोलीत ठरलेल्या वारी ८-४ या वेळात कचरा जमा करतात.
आत्तापर्यंत कचरा ही टाकण्याची गोष्ट आहे एवढंच मला माहीत होतं. पण त्यालाही एक पद्धत असते हे मला जपानने शिकवलं. कच-याच्या प्रकारानुसार त्याला रंग ठरवून दिलेला असतो. उदा. माझ्या विभागात burnable कच-यासाठी पिवळा, recyclable कच-यासाठी हिरवा आणि इतर प्रकारच्या कच-यासाठी निळा रंग ठरलेला आहे. त्याप्रमाणे त्या त्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या विकत घेऊन, त्यावर नाव घालूनच कचरा टाकावा लागतो. पहिले काही दिवस मी नाव घालायचं विसरले तेव्हा माझा बेवारशी कचरा उचलला गेला नाही. ह्या पिशव्या जवळच्या दुकानात, कन्विनियन्स स्टोअर्समध्ये मिळतात. इतर ठिकाणचे मला माहित नाही पण माझ्या जवळच्या दुकानात मिळणा-या पिशव्यांवर सेइवा हे माझ्या गावाचं नाव ठळक अक्षरात छापलेलं असतं. म्हणजेच मला त्या पिशव्या दुसरीकडे विकत घेता येणार नाहीत आणि घेतल्याच तर कदाचित त्यावर पत्ताही लिहावा लागेल. असलं काही मी अजून करून पाहिलेलं नाही. पण काकूंना विचारून माहिती करून घ्यायला हवी.

कचरा ब-याच प्रकारे विभागला जातो.
१. मोएरु गोमी (burnable waste)
नावावरूनच स्पष्ट होतं त्याप्रमाणे जाळता येतं असं काहीही. खरं म्हणजे त्याचं खत तयार करणे हा सर्वात उत्तम आणि eco-friendly उपाय आहे. कदाचित तसं करण्याने माझ्या शेजा-यांना फारसा आनंद होणार नाही पण पुढच्या वेळी मासे पकडायला जाताना गळाला लावण्यासाठी किडे विकत घ्यावे लागणार नाहीत हा फायदा आहे. ओला कचरा खरंतर वाळवून पण अगदीच शक्य नसेल तर निदान कागदात गुंडाळून टाकावा असा नियम आहे.
२. उमेताते गोमी (land-fill waste)
काही कचरा कितीही उत्तम प्रतीचं जळण वापरूनही जाळता येत नाही. तो सरळ non-burnable कच-याच्या पिशवीत घालावा.
३. शिगेन गोमी (recyclable waste)
शीतपेयांचे कॅन्स, प्लास्टिकचे कागद, पिशव्या, पेट बॉटल्स, काचेच्या वस्तू, कागदी/ थर्मोकोलचे पॅक्स. प्रत्येक पॅकवर तो recyclable आहे असं लिहिलेलं असल्यामुळे अजिबात डोकं चालवावं लागत नाही. दुधाचे पॅक, मासे/चिकनचे थर्मोकोलचे ट्रे, कॅन्स वगैरे वस्तू धुवून, वाळवून टाकाव्यात असा नियम आहे.
४. ओगाता गोमी (large waste)
अर्थात जुनं फर्निचर, इलेक्ट्रॉनिक सामान वगैरे. अशा सामानची विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे आहेत. मी अजून स्वत: अनुभव घेतलेला नाही पण असं ऐकलंय की वॉर्ड ऑफिसमधून काही शे येनचे स्टॅंप विकत घेऊन ते त्या कच-यावर चिकटवून त्या कच-याच्या खोलीबाहेर ठेवलं की कोणीतरी अदृश्य शक्ती ते सामान उचलून नेते.
ह्या संदर्भात internet वर थोडाशी शोधशोध केल्यावर कळलं की पूर्वी नको असलेली इलेक्ट्रिक उपकरणे नदीकाठी, रस्त्याच्या कडेला वगैरे टाकलेली आढळत. एवढयाशा देशात जिथे माणसांनाच जागा अपूरी पडते तिथे असा अवजड कचरा हा मोठाच प्रश्न होऊन बसला. ह्यावर उपाय म्हणून महत्त्वाची घरगुती उपकरणे ६०% recyclable असलीच पाहिजेत असा कायदा करण्यात आला. यशिरो येथे मत्सुशिता इलेक्ट्रॉनिक्स ह्या प्रसिद्ध कंपनीचा (पॅनासॉनिक फेम) एक appliance-recycling plant आहे. तिथे दरवर्षी एक कोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चुंबकीय प्रणाली वापरून recycle केली जातात.

तर असे सगळे नियम म्हणजे सुरुवातीला सासुरवास वाटला पण नंतरनंतर हाताला सवयच लागली. एका बाबतीत मला जपान्यांचं फार कौतुक वाटतं. हे सगळे नियम जिथेतिथे लिहिलेले असतात किंवा चित्रांमधून स्पष्ट केलेले असतात. त्यामुळे जपानी वाचता येत असेल/नसेल तरीही माणूस ते नजरेआड करूच शकत नाही. गावातल्या प्रत्येकाला माझ्या घरात आहेत तशी कचरा कॅलेंडर्स वाटली जातात. त्यात प्रत्येक तारखेला कुठला कचरा टाकावा हे व्यवस्थित लिहिलेलं असतं. इथे कचरादेखील एवढा स्वच्छ असतो की त्याला गोमी सारखं cute नाव खरंच शोभून दिसतं.
सर्वसाधारणपणे recycling म्हणजे एखाद्या वस्तूचा re-make एवढंच मला माहित होतं. पण recyclingची व्यापकता एवढयापुरतीच मर्यादित न रहाता आता recyclable वस्तूंचा कच्चा माल म्हणून अनेक प्रकारे उपयोग करता येतो.
आता ट्रेन किंवा विमानातून जाताना ह्या विमानाचे पंख/ ट्रेनचा दरवाजा काही महिन्यांपूर्वीचा कुणाचातरी बिअरचा कॅन होते का? किंवा आज मी हौसेने विकत घेतलेला शर्ट म्हणजेच पूर्वाश्रमीची पेट बॉटल असेल का? असे मजेशीर विचार
ब-याचदा माझ्या मनात येतात. त्याचबरोबर आपल्या इटुकल्या गावाची आणि देशाची जिवापाड काळजी घेणारे हे लिलिपुट्स मला फ़ुजीसानएवढे उंच भासतात.

2 Comments:

 1. प्रशांत said...
  >>>माझ्या मराठमोळ्या नजरेला सगळ्याच जपानी बायका संतूरछाप “त्वचासे मेरी उम्र का पता ही नहीं चलता” वाटतात...............
  ...........आणि पुढच्याच क्षणी माझ्या कचरापेटीचा नम्र भाषेत पंचनामा सुरु झाला. आणि मग अर्जुनाला गीता सांगावी अशा थाटात त्यांनी मला कच-यावर आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबद्दल एक गीताई सांगितली. <<<
  :D
  "कचर्‍यातून कला" ऐकलं होतं. पण त्यावर इतकं सुरेख लेखन होऊ शकतं याचा अंदाजच नव्हता. आणि नेहमीप्रमाणे जपानी शब्दकोषातील नवनवीन शब्द शिकायला मिळाले.
  मस्तच जमलाय लेख.
  Unknown said...
  Hey Saee khupach chaan lihites tu! Me Environmental Studies shikavte na FYBCom chya students na I will use this information of yours about waste recycling thank you ajun kahi ya baddal mahiti asel tar mala mail kar :)

Post a Comment