"कुठलाही पदार्थ जिवंत असता तर त्याने काय बरं सांगितलं असतं?" असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाची झलक येते. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या!

असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी लागला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली. चारी दिशांत भरलेली युद्धाची धुमश्चक्री. युद्धावर जायला निघालेल्या एखाद्या अनाम सैनिकाचं घर. कितीही निरोप घेतला तरी कमीच अशी वेळ. एका डोळ्यात विरह आणि दुस-या डोळ्यात त्याच्याविषयीचा प्रचंड अभिमान बाळगून चेह-यावर मंद हास्याचा मुलामा देणारी त्याची ती. इतरांकडून मिळालेले निरोप, आशीर्वाद, प्रार्थनांच्या बरोबरीनेच त्याने जपून ठेवलेली आणखी एक वस्तू. तिने स्वत: केलेलं तिरामिसु! त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा! आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी! नेहमीच तिरामिसु खाताना हे सगळं प्रेम मला जाणवतं...आणि मग कॅलरी वगैरेचा विचार करायला वेळच मिळत नाही.
पारंपरिक इटालियन तिरामिसु करताना लिकर, केक, मास्कारपोनी (?) चीज आणि सॅवॉर्डी (?) बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खानाखजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईल्च्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही! :)

साहित्य
• २ चहाचे चमचे भरून कॉफी पावडर
• १०० मि.ली. दूध
• १२ मारी बिस्किटे
• २०० मि.ली. क्रीम
• ५० ग्रॅम बारीक साखर
• २ चहाचे चमचे व्हिनेगर (पुस्तकात तांदळाचं व्हिनेगर वापरा असं लिहिलेलं आहे. पण मी फ्रुट- व्हिनेगर वापरूनही करते)
• एका अंडयाचा बलक
• सजावटीसाठी थोडी कोको पावडर (साखर नसलेली)
• मारीची ६ बिस्किटं (३ x २) झोपतील असा एक डबा

कृती
• कॉफी पावडर दुधात विरघळवा.
• मारी बिस्किटं त्या दुधात बुडवून ठेवा. बिस्किटं अखंडच रहातील (त्यांचा लगदा होणार नाही) याची काळजी घ्या. बिस्किटं पुरेशी भिजली की बाजूला काढून ठेवा.
• एका बाऊलमधे क्रीम घेऊन त्यात साखर फेटून विरघळवून घ्या.
• मग व्हिनेगर घालून पुन्हा थोडेसे फेटा. व्हिनेगर घातल्याघातल्याच क्रीम घट्ट होत जाईल. जवळजवळ भज्यांच्या पिठापेक्षा किंचित जास्त घट्ट होईल.
• आता त्यात अंडयाचा बलक घालून पुन्हा नीट फेटून घ्या.
• आता डब्यात ती कॉफीत भिजवलेली सहा बिस्किटं ३ x २ अशी ठेवा. त्यावर त्या फेटलेल्या क्रीममधलं अर्धं ओता आणि सारखं पसरा. त्यावर पुन्हा उरलेली सहा बिस्किटं लावून उरलेलं क्रीम पसरून घ्या.
• वरती गाळण्यातून कोको पावडर भुरभुरवा आणि ८-१२ तास फ्रीजमधे थंड करत ठेवा.
• चांगलं घट्ट झालं की आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा तिची आठवण काढत खा.

सुगरणीचा सल्ला
• व्हिनेगरचं प्रमाण पुस्तकात जरी २ चमचे लिहिलं असलं तरी मी पहिल्यांदा केलेला केक मला जरा आंबट वाटला. म्हणून मी आता दीडच चमचा व्हिनेगर घालते. व्हिनेगरप्रमाणेच कॉफी पावडरचं प्रमाणही आवडीनिवडीप्रमाणे कमी-जास्त झालं तरी चालतं.
• पण क्रीममधे साखर, व्हिनेगर आणि अंडं घालायचा क्रम बदलला तर मात्र पुढे जे काही होईल त्याला केक म्हणता येणार नाही.

ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच. त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात. आणि मग एखाद्या गवयाने सुराला सूर जोडत गात जावं तसंच कधी आमटीचा भुरका, कधी लोणच्याचं बोट तर कधी स्निग्ध तुपाने सुस्नात मोदकाचा घास असं चवीला चव जोडत खवय्ये खात जातात. मोदकांवर पळ्यांनी आग्रह पड्तच जातो, रिकाम्या झालेल्या वाटया घरच्या अन्नपूर्णांच्या प्रेमाने भरतच जातात. हास्यविनोदात सामील झालेल्या बाप्पाचे डॊळेपण हसताना बारीक झालेले असतात. शेवटी कुणीतरी उठून बडिशेप, विडे आणतो आणि पानं हलतात. मघाच्या आरतीतल्या भक्तीरसाबरोबरच आता इतर अनेक रसांनी ती खोली तुडुंब भरून गेलेली असते!

मी जपानाला आले आणि ह्या ताटावरच्या मैफिलीत रंग भरले जाईनात. पण त्याच वेळेस माझ्या आजुबाजूची माणसं मात्र “उमाई” “ओइशिई” म्हणत त्या जेवणावर चॉपस्टिक्सने तुटून पडली होती. आणि मग एकदम लक्षात आलं. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मनगटावर मारे गजरेबिजरे बांधून गेलं तरी लावणीचा ठसका मिळणार नाही; शास्त्राच्या पुस्तकात भटांची गजल असणार नाही. तसंच जपानी जेवणातही घरच्या चवी सापडणार नाहीत. असा “परि तू जागा चुकलासी”चा साक्षात्कार मला झाला तेव्हाच मी जपानी जेवणात ख-या अर्थाने रस घ्यायला लागले.

जपानी जेवण ही काही (नुसतीच) खायची गोष्ट नाही…ती तर लिहायही, बघायची गोष्ट आहे. जपानी भाषेत “आधी डोळ्यांनी खावं आणि मग हातांनी” (मे दे ताबेतेकारा, ते दे ताबेरु) अशा अर्थाची म्हणच आहे. एखाद्या मादक यौवनेने “drink to me only with thine eyes” म्हणावं आणि वारुणीशिवायच नशा यावी तसंच “eat to me only with thine eyes” असं म्हणणा-या जपानी जेवणाकडे बघूनच समाधान होतं. पसरट वाटीत तोफुचा (तोफु=सोयाबीनचं पनीर) पांढराशुभ्र चकचकीत ठोकळा, त्याच्यावर टेकवलेलं टिकलीएवढं हिरवं वासाबी (वासाबी=जपानी मोहरीची चटणी), वरून भुरभुरलेल्या पातीच्या कांद्याच्या हिरव्या भिंगो-या, आणि पांढ-याशुभ्र तोफुवरून वहाणारे सोयासॉसचे तपकिरी ओघळ! बाजूला सुशीच्या रंगीबेरंगी गुंडाळ्या, एकीकडे तेनपुराच्या (तेनपुरा=जपानी भजी) आरस्पानी आवरणातून डोकावणारी गाजरं, वांगी, रताळी.भारताच्या शोधात निघालेला कोलंबस जसा अमेरिकेला जाऊन पोचला तसाच चवीच्या शोधात निघालेला खवय्या इथे नितांतसुंदर सौंदर्यापाशी येऊन पोचतो.





निसर्गाने जपानला भरभरून दिलंय. मग जपानी माणूसही निसर्गाला आपल्या घरचाच एक असल्यासारखा प्रेमाने वागवतो. घर कितीही लहान असलं तरी तिथे झाडांना, पानाफुलांना त्यांची अशी जागा असते. कधी घरापुढे अंगण असतं (त्याला “निवा” म्हणतात), तेव्हढीही जागा नसेल तर घराच्या दारात आल्यागेल्याचं स्वागत करायला ताजी रंगीत फुलं उभी असतात. तेही नसेल तर अगदी किमानपक्षी बाथरूमच्या कट्टयावरच्या एवढयाशा जागेत चिमुकल्या वाटीत, काचेच्या भांडयात फुलं, पानं, वेली असतातंच. जपानच्या एका वर्षात चार ऋतू आपापलं वैशिष्टय जपत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असतात. ऋतू सरत जातात तसा बदल पहिल्यांदा हवेत होतो आणि मग तिथून थेट जेवणात उतरतो. त्या त्या ऋतूचं वैशिष्टय असलेल्या भाज्या, फळं हे सगळं जेवणात येतं. मला माझ्या शाळेतली मुलं कुतुहलाने विचारतात,” तुमच्या इंडियातल्या वांग्याची चव इथल्यासारखीच असते का?” आता वांगं म्हटल्यावर माझ्या जिभेवर येते ती भरल्या वांग्याची चव किंवा वांग्याच्या कापांची चव. पण दोन्ही मसालेदारच. त्यामुळे मला काहीही उत्तर देता येत नाही. जपानी जेवणात पदार्थाची मूळची नैसर्गिक चव मारून टाकायचा प्रयत्न नसतो. म्हणूनच मग भेंडीचा बुळबुळीतपणा, कारल्याचा कडवटपणा, कोबीचा करकरीतपणा, कच्च्या गाजराचा गोडवा हे सगळं जसं आहे तसं ताटात उतरतं. हे सगळं माझ्या जिभेला रुचलं नाही तरी त्यातली “जे जसं आहे ते तसं” स्वीकारायची भावना मात्र मला आवडते.

जपानी जेवणात सी-वीड (नोरी) वापरतात. माझे आईबाबा जपानला आले असताना योशिदासाननी खास माझ्या आईबाबांसाठी ताज्या सी-वीडचे हिरवे कागद मागवले होते. त्यावर भात पसरून, आत भाज्या घालून गुंडाळून खायचं होतं. (थोडक्यात नोरी फ्रॅंकी!) माझ्या आईने तो प्रकार तोंडात घालताक्षणीच,”ह्याला खारट पाण्याचा (पक्षी: माशाचा) वास येतो आहे!” असं मराठीत म्हटलं. इकडे योशिदासान जपानीत सांगत होत्या, “हे फार चांगल्या प्रतीचं सी-वीड आहे कारण ह्याला अजून समुद्राचा वास येतोय!” माझी चांगलीच पंचाईत झाली. त्यावेळी तिथली भाषेची दरी माझ्यातल्या दुभाष्याने भरून काढली असती तरी ही सांस्कृतिक दरी मात्र मी सोयिस्करपणे मौनानेच भरून काढली.

इथे आल्यावर मला “तुम्ही लोक हाताने का जेवता?” असं सगळेच एकदातरी विचारतात. त्यावर उत्तर म्हणून मी त्यांना “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म” समजावून सांगते. आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटताना जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं. असं हे आपल्या “वदनीकवळ”चं पावित्र्यच मला वज्रासनात ताठ बसलेला जपानी, समोरचं बुटकं सोनेरी कलाकुसर केलेलं टेबल, त्यावर मांडलेले असंख्य चिमुकले वाडगे, ते अदबीने हाताच्या ओंजळीत उचलून एकेक घास शांतपणे तोंडात घालणा-या जपानी माणसात दिसतं. भले चवी वेगळ्या असतील पण आकाशातल्या ज्या अदृश्य शक्तीचा अंश आपण ग्रहण करीत आहोत त्याविषयी कृतज्ञतेची भावना मात्र “वदनीकवळ” म्हटलं काय किंवा “इतादाकिमास” म्हटलं काय सारखीच आहे असं मला वाटतं.

मागे एकदा असंच डिक्शनरीशी खेळ करताना मी “जपान” ह्या शब्दाचा अर्थ पाहिला होता. जसा चायना शब्दाला विशिष्ट अर्थ आहे (संदर्भ: bull in a China shop!) तसंच जपान म्हणजे लाकडी भांडी वॉर्निशने चमकवून त्यांवर लाखेने केलेलं सोनेरी नक्षीकाम. लाखेचेच नव्हेत पण चिनीमातीचे, भूमितीतल्या आणि भूमितीबाहेरच्या सगळ्या आकारांचे (मेपलच्या पानाचे, साकुराच्या पाकळीचे, चंद्रकोरीचे) सुंदर ताटल्या, वाटया, वाडगे इथे पाहिले. एवढंच नव्हे तर खोलगट बांबू, शिंपले, वेताच्या टोपल्या ह्यांचादेखील जेवण वाढण्यासाठी कलात्मकतेने वापर केलेला पाहिला. एकदा तर “सफरचंदाचं ग्लटन” नावाचा प्रकार तर चक्क लालचुटुक सफरचंद पोखरून त्यातच बनवलेला होता! आणि देठाचा भाग झाकण म्हणून ठेवला होता. तिथे “गाजराची पुंगी”सारखं “सफरचंदाची वाटी, आतलं संपलं तर ठीक नाहीतर मोडून खाल्ली!” हे मी किती वेळा मनात म्हटलं! समोर वाढलेलं ते सगळं सौंदर्य डोळ्यात आणि मग पोटात साठवून घेताना परत एकदा “उदरभरण नोहे...”तल्या उदात्ततेचीच अनुभूती आली.




जेवण (मग जपानी असू दे नाहीतर आपलं!) कुणालाही एवढं प्रिय का वाटावं? कारण जेवणातून मिळणारं समाधान नेहमीच चवीत नसतं. ते मनात असतं. जेवणाशी चित्र/ आठवणी जोडलेल्या असतात. आपण नुसतंच जेवत नसतो. तेव्हापुरत्या त्या सुखद आठवणी जगत असतो. हेच बघा नां...रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां? जे आपल्याकडे तेच जपानात. इथे उन्हाळ्यात सोमेन नूडल्स खातात. बाहेर उन्हाची काहिली वाढलेली असते. तशातच पाण्याची किंवा उन्हाळ्यातल्या स्वच्छ आकाशाची निळाई सोमेनच्या बाऊलमधे उतरलेली असते, त्यात बर्फाचे खडे आणि त्यावर तरंगणा-या पारदर्शक सोमेन नूडल्स. मग त्या सोमेन सुर्रकन ओढून खाताना आतपर्यंत जाणवलेला बर्फाचा गारेगार स्पर्श...ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा आभास होतो. A way to one’s heart goes through stomach किंवा A way to one’s stomach goes through heart दोन्हीही तितकंच खरं असतं. इथल्या जेवणाशीही माझ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेवताना त्यानीच जेवणाला चव येते.

आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.

हे आणखी काही फोटो:







इसापाच्या गोष्टीत असतं तसं प्राण्यांचं एक आटपाट नगर होतं. तिथे अनेक प्रकारचे प्राणी अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. प्रत्येक प्राण्याची आपली अशी वेगळी संस्कृती होती. “उतायचं नाही, मातायचं नाही आणि माणसांसारखं भांडायचं नाही” हे मुळी त्या नगराचं ब्रीदवाक्यच होतं. ह्या ब्रीदवाक्याला जागून होता होईल तेवढी सांस्कृतिक देवाणघेवाण करायची ह्यावर तिकडचे सगळेच नागरिक एकमत होते. ह्या नगरातल्या एका भागाचा हा क्रॉससेक्शन!
*****
ह्या वस्तीत तीन शेजारी रहात होते; कोल्हा, करकोचा आणि कावळा.
करकोचा दिसायला दौलदार आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता. इतर पांढ-या प्राण्यांना जरी करकोच्याच्या पांढ-या रंगात पिवळसर झाक दिसली तरी स्वत: करकोच्याला मात्र तो स्वत: पांढराशुभ्र असल्याची खात्री होती. म्हणूनच दिवसातला त्याचा बराचसा वेळ आपले पंख चोचीने साफ करण्यात आणि बाकीचा वेळ घर साफ करण्यात जात असे. तसा तो फारच प्रेमळ आणि नम्र होता. एकटाच आपला पाण्यात तासनतास उभा राहून मासे पकडत असे. पण त्याला कोणी सामान्य पक्ष्यांच्या (विशेषतः कावळ्यांच्या) पंगतीला बसवले की त्याला ते मुळीच खपत नसे.
त्याचा शेजारी कोल्हा; तांबूस रंगाचा आणि झुपकेदार शेपटीचा. कोल्ह्याच्या घरावरचे गोल घुमट, घराची बांधणी ह्यावरूनच त्याच्या हुच्च राहणीचा कुणालाही अंदाज आला असता. कोल्ह्याच्या घरी अगदी पिढया दर पिढया जणु लक्ष्मी आणि सरस्वती जुळ्यानेच जन्माला येत होत्या. त्यामुळे अशा सर्वसंपन्न कोल्हासंस्कृतीत करकोच्याला विशेष रस होता.
तिसरं घर कावळ्याचं. कावळा दिसायला काळा पण अतिशय हुशार आणि मेहेनती होता. त्याच्या गबाळ्या घरावरून त्याच्या तल्लख बुद्धीची कल्पना कुणालाच आली नसती. म्हणा तसा कावळ्याला त्याने काही फरक पडणार नव्हता. कारण एक काडी जमवत जमवत त्याने बरीच पुंजी जमवली होती. वस्तीतल्या सगळ्यांनाच काकसंस्कृतीविषयी विलक्षण आकर्षण होतं. विशेषत: कावळ्यांचं जेवण जरी आजतागायत कोणी खाऊन पाहिलं नसलं तरी कावळ्यांची खाद्यसंस्कृती हा तिथल्या सांस्कृतिक चर्विच्चर्वणाचा विषय बनला होता.
*****
ह्याचाच फायदा घेऊन आपल्या शेजा-यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करावेत ह्या हेतूने कावळ्याने एकदा करकोच्याला आपल्या घरी मेजवानीचं आमंत्रण दिलं. आता करकोच्याची झाली पंचाईत! सांस्कृतिक आदानप्रदानाचा झेंडा अखंड फडकवत ठेवतानाच कावळ्याला नकार कसा द्यावा ह्याचा तो विचार करायला लागला.
पण फार विचार करायची गरज पडली नाही. कारण कोल्ह्यानेही अगदी त्याच दिवशी त्याच वेळी त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. निवड सोप्पी होती. लगेच कोल्ह्याकडे होकाराचे आणि कावळ्याकडे नकाराचे निरोप गेले. घेतला वसा टाकावा न लागल्यामुळे करकोच्याची मान एक इंचभर उंचावली.
आता कोल्ह्यासारख्या कला-साहित्य-शास्त्रसंपन्न घरात मोकळ्या हाती कसं जायचं म्हणून करकोच्याची तयारी सुरु झाली. मिसेस करकोच्यांनी अस्सल करकोची खाद्यपदार्थ जातीने तयार केले, बाळ करकोच्यांनी बाळ कोल्ह्यांसाठी आपल्या बाळहातांनी चित्रे काढली, भेटकार्डे तयार केली. अशाप्रकारे जय्यत तयारीनिशी करकोचा कोल्ह्याकडे रवाना झाला.
कोल्ह्याने दारातच करकोच्याची स्तुती आणि स्वागत केलं. करकोचाही त्यात मागे राहिला नाही. कोल्हासंस्कृतीविषयी त्याला वाटणारी तळमळ तो भेटींच्या स्वरूपात बरोबर घेऊन आलाच होता. ती त्याने कोल्ह्याकडे सुपूर्त केली. कोल्ह्याने कोणतेही आढेवेढे न घेता त्या सर्व भेटींचा सादर स्वीकार केला. आणि सगळे जेवणाच्या टेबलाकडे रवाना झाले.
त्या टेबलावर कोल्हासंस्कृतीतले अनेकोत्तम पदार्थ मांडले होते. झालंच तर पेले, वाट्या आणि ताटल्यादेखील कोल्हासंस्कृतीच्या उच्चपणाची ग्वाही देत होत्या. गालिचे, रुमाल टेबलक्लॉथ ह्यावर देखील कोल्हा संस्कृतीची छाप जाणवत होती. करकोच्याला ताटलीतल्या कोल्हासंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा होता. पण ताटलीच्या पसरट आकारामुळे तो आपली चोच ओली करण्यापलिकडे तो काहीही करू शकला नाही. अर्थात, तरीही त्या पदार्थांच्या न घेतलेल्या चवीची तारीफ करायला तो विसरला नाही.
शेवटी निरोपाची वेळ आली. करकोच्याकडून मिळालेल्या भेटीची परतफेड म्हणून कोल्ह्याने आपल्या संस्कृतीचा ठसा असलेल्या ताटल्या आणि वाडगे भेट दिले. अशाच सांस्कृतिक भेटी घडत राहिल्या पाहिजेत असा निर्धार करूनच करकोचा घरी परतला.
*****
आजकाल कावळा इतर प्राण्यांना कोल्हा आणि करकोच्यांच्या संस्कृतीवर भाषणे देत फिरत असतो. आणि घरी कावळ्याची मुलंबाळं (करकोच्याकडून मिळालेल्या) कोल्हासंस्कृतीय ताटवाटयातून (कोल्ह्याकडून मिळालेल्या) करकोचासंस्कृतीय पदार्थांचा आस्वाद घेत असतात. असं इतर प्राणी ऐकून आहेत.
*****
वरील गोष्ट हे रूपक आहे ही गोष्ट लक्षात आली असेलच. इथे कुठल्याही संस्कृतीवर दोषारोप करण्याचा उद्देश नाही. पण कुठल्याही संस्कृतीचे घटक असलेल्या मनुष्यस्वभावाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मात्र आहे.
इथे जपानात मी इंग्रजी तर शिकवतेच पण त्याचबरोबर जपानी मुलांना माझ्या देशाची ओळख करून देणे हादेखील माझ्या कामाचाच एक भाग आहे. म्हणूनच माझे जपानी विद्यार्थी आणि त्यांच्याच वयाचे भारतीय विद्यार्थी यांच्यात पत्रमैत्री घडवून आणली तर? अशी एक कल्पना मी शाळेत मांडली. असा प्रकल्प आधी कुणी केला नसल्याने त्याला बजेट नाही. त्यामुळे पोस्टेजचा खर्च उचलण्याचीही मी तयारी दाखवली. पण माझ्या शाळेतल्या फक्त तीन मुलींनी प्रत्येकी पाच ओळींची पत्र लिहिण्याएवढाच उत्साह दाखवला. बरोबरच आहे म्हणा…आपण ज्यांना बाटल्यांची बुचं आणि पैसा पाठवतो अशा मुलांशी मैत्री करण्यात इथल्या मुलांना अजिबात रस नव्हता.
त्याच सुमारास इटालीच्या एका शाळेकडूनही अशीच ऑफर आली. आणि काय गम्मत! जादूची कांडी फिरवल्यासारखी अख्खी शाळा कामाला लागली. व्हिडिओ तयार केले, चित्रं काय काढली, पत्रं काय लिहिली (एवढी पत्र आली की शेवटी निवड करावी लागली! ती निवडक पत्र तपासून सुधारणा मीच करून दिल्या!) ते सगळं इटालीला पाठवून जपानी मुलं उत्तराच्या अपेक्षेत होती.
आणि उत्तर आलं. तिथल्या मुलांनी काढलेली काही चित्र आणि काही पत्र होती. सगळे विद्यार्थी शाळेच्या हॉलमधे जमा झाले आणि मुख्याध्यापकांनी मोठ्या अपेक्षेने एक पत्र उघडलं. आणि त्यांचा चेहराच पडला. ती सगळी पत्र चक्क इटालियन भाषेत लिहिलेली होती. जपानी मुलांना इटालियनमधून लिहिलेली पत्रे वाचता येणार नाहीत हा साधा विचारही कोणाच्या मनात येऊ नये ह्याचं मला प्रचंड आश्चर्य वाटले. ह्यापेक्षा आमच्या शाळेतल्या मुलांना पत्रे पाठवली असतीत तर त्याचे तुम्हाला कळेल अशा भाषेत नक्कीच उत्तर आले असते असे सांगावेसे वाटले पण सांगून काही उपयोग होईल असं वाटलं नाही म्हणून शांत बसले.
पण तरीही मी इटालीहून मिळालेल्या मिठाया खाल्ल्याच, झालंच तर त्या सगळ्या पत्रांचे आधी इंग्रजीत आणि नंतर जपानीत भाषांतरही केले आणि इथून इटालीला पाठवलेल्या सगळया व्हिडिओजच्या कॉप्या करून घेतल्या. न जाणो पुढेमागे जपानी शाळांवर बोलायची, लिहायची वेळ आलीच तर त्यांचा मला चांगलाच उपयोग होईल.

प्राजूची “प्रिय सौ. आईस” नावाची मिपावरची कविता वाचून सुचलेलं काहीतरी...एका आईचं मनोगत. ही मी केलेली पहिलीवहिली कविता (?) असल्याने चु.भु.द्या.घ्या. कल्पना फार पूर्वी वाचलेल्या इंग्रजी कवितेवरून सुचली असली तरी भावना आणि शब्द एकदम वोरिजिनल!

मला आजही आठवतंय माझं बाळ…
पाळणाघराच्या खिडकीत बसून
माझी वाट बघणारं…
धावत येऊन मला बिलगणारं…
माझ्या हातात असायच्या पिशव्या
भाजी, खाऊ, खेळणी, जबाबदा-यांनी गच्च भरलेल्या…
अगदी तळाशी असायचं दबलेलं माझं तुझ्यावरचं प्रेम…
रस्ताभर तुझी माझ्यातल्या आईशी बडबड आणि माझी माझ्यातल्या प्रोफेशनलशी!
“उद्या शाळेत नां”…"बहुतेक ओव्हरटाईम करावा लागणार!”
“आज माझी वही”…"डेडलाईन पुन्हा उलटून जाणार!”
“आई उद्या शाळेत सोडायला येशील?”…"९.२७ नंतर एकदम ९.५६!”

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे…
तुझं बोट धरून यायचं होतं गं…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल…
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले…
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

आणि एक दिवस खरंच…
झालीस की गं मोठी!
आता मी रोज संध्याकाळी…
दारात उभी असायची तुझी वाट पहात…
तुझ्याशी राहिलेलं सगळं बोलायचं होतं…ऐकायचं होतं!
पण आजही तू निघून गेली होतीस…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
आणि मी राहिले मागेच
तुला निरोपाचे हात हलवत…

आजकाल ऐकते तुला फोनवर…
कधी ई पत्रातून भेटते…
अश्शीच बोलत रहातेस भडाभडा…
तुझ्या बाळाबद्दल, त्याच्या शाळेबद्दल,
डबे, लोकल, डेडलाईन्सबद्दल…
खरं खरं सांगू…
लांब असलीस नां तरी
फार फार जवळ वाटतेस तेव्हा!

पाहते तर योशिदासान करंगळीएवढया, He-manच्या तलवारीसारख्या दिसणा-या स्टीलच्या आयुधाने मला टोचत होत्या. पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांनीही किमोनोत दडवलेल्या पाकिटातून आपापल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या. मंडळी ती मिठाई नाजूकपणे तलवारीने कापून, तिलाच टोचून खात होती. हातातोंडाच्या लढाईला आम्ही तलवार वापरत नाही असं त्यांना सांगावसं वाटलं. पण चहा मिळाल्यावर बोलू म्हणून गप्प बसले. पण बाकी काहीही म्हणा मिठाई दिसायला आणि असायला भलती़च ग्वाssड होती.










आम्ही मिठाई खात असतानाच एक तरूण मुलगी खोलीत आली आणि चहा करायला लागली. यंत्राचं बटण दाबावं तशा तिच्या स्लो-मोशनमधे शिस्तबद्ध हालचाली सुरु झाल्या. प्रथम एका लाल सिल्कच्या कापडाची त्रिकोणी घडी करून चहाचे वाडगे आणि पळी पुसली, वाडग्यात मापाने माच्चाची हिरवी पावडर घातली, काळ्या चिनीमातीच्या बोन्साई रांजणातलं गरम पाणी बांबूच्या पळीने त्या वाडग्यात ओतलं आणि लाकडी चासेनने अंडं फेटावं तसाच पण हळुवारपणे चहा फेटला. तयार झालेला चहाचा वाडगा घड्याळाच्या दिशेने तीन वेळा फिरवला आणि बाजूला ठेऊन दिला. त्याबरोब्बर आज्जी उठल्या आणि तो वाडगा घेऊन पाहुण्यांकडे गेल्या. पाहुण्यांनी तो तीन वेळा आपल्याकडे फिरवून घेतला आणि त्या वाडग्यावरची नक्षी पाहून धन्य झाल्यासारखं दाखवलं. बोलक्या काकूंनी सगळ्यांच्या वतीने वाडगा आवडल्याचं सांगितलं. त्याबरोब्बर आज्जीची वाडगा कोण, कुठला, सध्याच्या ऋतूला तो कसा चांगला आहे ह्याविषयीची कॉमेंट्री सुरु झाली. वास्तविक मी जपानमधेच ह्याच्यापेक्षा कित्तीतरी सुंदर वाडगे पाहिले आहेत. त्या काळ्या वाडग्यात एवढं पाहण्यासारखं काय होतं ते त्या झेनलाच ठाऊक! सगळ्यात शेवटी माझ्यापर्यंत चहा पोचला. तो लहान बाळांच्या फॅरेक्स एवढा घट्ट आणि फेसाळ होता. चव कडुलिंबाच्या रसासारखी होती. लहानपणी चहाच्या आधी क्रीमचं बिस्किट खाल्लं की आई “आता चहा काय गोड लागणार!” असं म्हणायची. आणि इथे नेमकं तेच तत्त्व वापरून चहा पद्धतशीरपणे कडू लागवण्यात आला होता. सगळेजण वाडगा तोंडाला लावून सुर्रकन तो घट्ट चहा शोषून घेत होते. एवढी एकच गोष्ट मात्र मला चांगली जमली. चहा पिऊन झाल्यावर आलेल्या हिरव्या मिशा आणि आपापल्या कपाची उष्टावलेली कड ओल्या टिश्यूने पुसून तो वाडगा परत तीन वेळा फिरवून आज्जींकडे परत दिला. चहा करणा-या काकूंनी मग हळूहळू एक एक करून कप विसळले, चहाची भांडी विसळली, पुसली आणि एकदाचे नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही निघायला मोकळे झालो. इथे एका परिच्छेदात आटपलेली सेरेमनी प्रत्यक्षात मात्र तासभर चालू होती. एक तास वज्रासनात बसून पाय जड होऊन दुखण्याच्या पलिकडे गेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच “चहा नको पण सेरेमनी आवर” असा मी आपल्या देवाचा धावा केला।



चहा पिण्यासारखा साधा आनंद एवढा अगम्य का वाटावा? का तो सोपा झाला तर त्यातली मजा निघून जाईल? टी सेरेमनी करण्यामागे “इचि गो इचि ए” (一期一会) अशी संकल्पना आहे. म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक गाठभेट ही एकमेवच असल्याने तिचा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी हा टी सेरेमनीचा खटाटोप. बरोबरच आहे. असा अखंड वज्रासनात बसवून, न बोलता, कडू चहा प्यायला दिला तर ती भेट ही शेवटचीच ठरेल ह्यात काय शंका?

चहाचा मार्ग वगैरे म्हटलं की मला लगेच आठवतो आमचा कॉलेजचा दीक्षित रोड. ’चायला’ ही शिवी न रहाता देणा-याला आणि घेणा-यालाही आनंद वाटावा अशी जागा म्हणजे तो चहावाला. आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची. आमच्या टी. वायच्या वर्गात मोजून नऊ टाळकी होती. तास संपला की चर्चा, मस्करी सगळं फुल्याफुल्यांच्या गाळलेल्या जागा भरून वर्गातून टपरीवर पुढे चालू होई. एकदा तर पावसाळ्यात शेक्सपिअर शिकताना “अत्ता चहा हवा होता बुवा!” असं कुणीतरी म्हणालं तेव्हा कॉलेजच्या आणि टपरीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तो चहा टपरी ओलांडून वर्गात आला होता. आणि मग तेव्हापासून आम्ही Tea.Y.B.A. म्हणून ओळखले जायला लागलो. तिथे टपरीवर खिदळणे, गाडयांचे हॉर्न, चहावाल्याने पळीने केलेली ठोकठो्क ह्या सगळ्या गदारोळात चर्चा, रोमान्स, भांडणं, मांडवली, अभ्यास हे सगळं व्यवस्थित चालू असायचं. जप्त झालेली आय. डी., प्रेमभंग सारखी चहाच्या कपातली वादळंही चहानेच थंड व्हायची आणि केट्या सुटल्याचे, थापा पचल्याचे आनंदही चहानेच साजरे केले जायचे. दुःखाचा किंवा आनंदाचाही जास्त बाऊ न करता “कटिंग”वरच ठेवायची फिलॉसोफी त्या टपरीवरच्या चहाने शिकवली. मला खात्री आहे की जपानी टी सेरेमनीतसुद्धा नियमांच्या ऐवजी थोडया दिलखुलास गप्पा असत्या तर तो कडू चहाही नक्कीच गोड झाला असता. आणि ह्या एकमेव भेटीनेच पुढल्या भेटीची ओढ लावली असती.

निःशब्दपणे हिरव्या चहाचा एकेक घोट घेताना त्या चहातून आजुबाजूचा निसर्ग आपलाच एक भाग असल्याची सुखद जाणीव झेनला होते। आणि मला चहापत्तीच्या कडवटपणातून, आल्याच्या तिखटपणातून आणि दूधसाखरेच्या गोडव्यातून अगदी जिवलग मित्राला भेटल्याचं, मनसोक्त गप्पा मारल्याचं समाधान मिळतं. कुणाचं सुख कशात असेल हे सांगता येत नाही. पण म्हणतात नां “सर्व देव नमस्कारम्, केशवम् प्रतिगच्छति” तसेच चहाचे कोणतेही मार्ग शेवटी आनंदाच्याच वाटेला जाऊन मिळतात हेच खरं.

जपानविषयी मला अगदी लहानपणापासूनच आपुलकी वाटत आली आहे ती चहामुळे. योगायोगाने इथेही चहाला “चा” असंच म्हणतात. कॉफी ही जरी चहाचीच श्रीमंत घरात दिलेली बहिण असली तरी चहा मात्र पहिल्यापासूनच कांदेपोहे, बटर, केक, भजी, खारी बिस्कुट ह्या सर्वांना जोडणारा; चांदीच्या किटलीत आणि मातीच्या कुल्हडमधेही “ठेविले अनंते” म्हणत सुखेनैव रहाणारा मध्यमवर्गीयच आहे असं मला नेहमी वाटतं. जपानमधे मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते. पण अजूनही जगप्रसिद्ध टी सेरेमनी बघण्याचा योग काही आला नव्हता.
एकदा मी तसं योशिदासानना बोलून दाखवलं. योशिदासान म्हणजे जपानमधल्या माझ्या सबकुछ. इतक्या की आई त्यांना “यशोदा” सानच म्हणते. मला स्वतःला त्या छोटया केसांचा, शर्टपॅंट घालणारा, मेकअप करणारा देवच आहेत की काय असं वाटतं. कारण मी त्यांना काहीही म्हटलं की त्या तथास्तु म्हणून इच्छा लगेच पूर्ण करतात. त्यातून टी सेरेमनी म्हणजे योशिदासानचं होमपिच. बारा गावचं पाणी प्यावं तसा त्यांनी बाराशे सेरेमनीचा चहा प्यायला असेल. त्यामुळे लगेचच पुढच्या वीकांताला जपानी टी सेरेमनी पहायला त्या मला घेऊन गेल्या.
त्यादिवशी बसलेल्या धक्क्यांची सुरुवात योशिदासानला भेटल्या क्षणापासून झाली. आपली "मेहेबूबा मेहेबूबा" वाली हेलन जर अंगभर साडी, खांद्यावर पदर, आंबाडयात गजरा, कपाळावर कुंकू अशा अवतारात उभी राहिली तर साक्षात सलमानसुद्धा जसा तिला ओळखणार नाही तसं मी त्यांना ओळखलंच नाही. गुलाबी रंगाचा चेरीच्या पाकळयांचं डिझाइन असलेला किमोनो, त्यावर जांभळ्या रंगाचा चापूनचोपून बसवलेला दप्तरासारखा ओबी, त्यांच्या गोल चेह-याच्या परिघावर शिस्तीत बसलेले केस, आणि चेह-यावर पडलेलं किमोनोचं गुलाबी प्रतिबिंब…फेब्रुवारीतच पाहिला की मी वसंत!
टी सेरेमनीचं स्पेलिंग सोडल्यास आमची पाटी कोरी होती. त्यामुळे गाडीतून जाताना योशिदासानी 'धावतं'वर्णन केलं. एरवी जपानात जो हिरवा “ओचा” पितात त्याहून अधिक पौष्टिक “माच्चा” नावाचा चहा टी सेरेमनीला पितात. चहाला जमलेल्या मंडळींच्या सम्मेलनाला “चाजी” किंवा “ओचाकाई” असं म्हणतात तर प्रत्यक्षात चहा करण्याच्या कलेला “सादो” (茶道) असं म्हणतात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे 'चहा'आणि 'मार्ग'असा आहे. चहा पिण्यातून जे पावित्र्य, साधेपणा, शांतता मिळते तोच जगण्याचा मार्ग आहे असं कदाचित ह्यातून झेन धर्माला सांगायचं असावं. आपण जसा चहा करतो, टाकतो किंवा ठेवतो तसंच जपानीत “ओचा तातेरु” (お茶 立てる) असं म्हणतात. ’'तातेरु' म्हणजे 'उभा करणे'. यजमानांनी उभा केलेला चहा पाहुण्यांनी वज्रासनात बसून प्यायचा की झाली टी सेरेमनी! हाय काय आणि नाय काय!
पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणादार होता. ही टी सेरेमनी आतापर्यंत फक्त गुळगुळीत मासिकातच पाहिलेल्या भव्य हॉटेलच्या एका हॉलमधे होती. त्या झुळझुळीत सिल्कच्या जगात आमचं कॉटन उगीचच लक्ष वेधून घेत होतं. आत शिरलो तर दारातंच घोळका करून लोक काहीतरी पहात होते. बघितलं तर एका कागदावर ब्रशने एक मोठ्ठं शून्य काढलेलं होतं. आणि ते बघून सगळे “सुगोई (सही)” “उत्सुकुशिइ (सुंदर)” असं म्हणत होती. “अरे हे तर नुसतंच शून्य आहे!” नागडया राजाच्या गोष्टीतल्या लहान मुलाच्या निरागसतेने मी म्ह्टलं. तर आजूबाजूच्या बायका फिस्सकन हसल्या. आणि योशिदासाननी माझ्याकडे “म्हणून मी तुला कुठे नेत नाही!” असं बघितलं. दहा डिक्शन-या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही. चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे. टी सेरेमनीतून मिळणा-या पूर्णत्वाचं शून्य हे प्रतीक असावं असा मी अंदाज केला।












ते चित्र धरून त्या खोलीत तातामी चटया, चहाचं सामान, एका कोप-यात अगम्य जपानी कॅलिग्राफीमधे लिहिलेला तक्ता, एक आजी आणि शांतता एवढंच होतं.त्या आजीनी सगळ्या पाहुण्यांना बसायला सांगितलं. बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते. त्यामुळे मी इतर सगळे बसल्यावर वज्रासनात बसले. आणि सेरेमनी सुरु झाली.












काय मजा आहे बघा! आपल्याकडचा गप्पिष्ट चहा जपानात जाऊन एकदम गप्पगप्प होतो इथे यजमानांच्या वतीने त्या आजी आणि पाहुण्यांच्या वतीने आमच्यातल्याच एक अनुभवी काकू एवढी दोनच माणसं एकमेकांशी बोलत होती. गप्पादेखील आभारप्रदर्शन, हवापाणी आणि चहा ह्याच्या पलिकडे जात नव्हत्या. बाकीचे लोक गंभीर चेहरा करून माना डोलवत होते. चहाचा पत्ताच नव्हता.
एवढयात खोलीचा दरवाजा उघडला आणि बदामी हलव्यासारखी दिसणारी गुलाबी मिठाई आली. ती खायला जाणार एवढयात...काहीतरी टोचलं…

वाचकांसाठी सूचना: प्रस्तुत लेख हा भावनेच्या भरतीच्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या भावना वाचकांच्या अंगावर आदळून वाचक भिजण्याची शक्यता आहे. कृपया रेनकोट घालून लेख वाचावा.

त्यादिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर टयूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!

“लट उलझी सुलझा जा बालम…
माथे की बिंदिया बिखर गयी है…
अपने हाथ सजा जा बलमा”

अरेच्चा ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नी ची जादू असावी का? का रेहमानच्या पॉपचा परिणाम आहे? काही कळत नव्हतं. बसमध्ये, शाळेत, जेवताना सारखं मागे कुठेतरी हेच गाणं वाजत होतं. आणि मग एकदम चमकून गेलं! रेहमानने मूळ चीजेतून चक्क एक ऒळच गाळली आहे!
“लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा!”
मग रेहमानच्या सिंथसाईझरच्या सुरांचं बोट धरून ऍलिससारखी थेट माझ्या लहानपणीच्या वंडरलॅंड्ला जाऊन आले.

पहिल्यांदा आठवला तो व्यास बाईंचा गाण्याचा क्लास. त्याला गाण्याचा क्लास का म्हणायचं हेच आधी मला कळायचं नाही. कारण ते तर एक छान गाणारं घरच होतं. बाबांबरोबर पहिल्यांदा मी तिथे गेले तेव्हा बाहेर हा चपलांचा खच पडला होता. “बाबा, एवढया लोकांसमोर मी काय गाणार? आपण घरी जाऊयात.” असं मी म्हटल्यावर बाबा म्हणाले होते, “ अगं देवळाबाहेर पण ब-याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का?” तेव्हापासून आजपर्यंत मला गाणं म्हटलं, ऐकलं, गुणगुणलं की देवळात आल्याचाच भास होतो.

शेवटी हो नाही करत करत आत पाय ठेवला. आजूबाजूला बघण्याची तर हिंमतच होत नव्हती. अलगद जाऊन समोर पाठमो-या बसलेल्या लोकांच्यात गुपचुप मिसळून जावं असं वाटत असतानाच एकदम सगळं शांत झालं. आणि आतापर्यंत दिसणा-या पाठींचे चेहरे होऊन वीसएक डोळे माझ्याकडे बघून लुकलुकायला लागले. तेवढयात लांबून एक आवाज म्हणाला, “ सरगम म्हणून दाखव पाहू!” पेटीच्या सुरात सूर लपवत म्हटलं एकदाचं सरगम. त्याबरोबर तो आवाज बाबांना म्हणाला, “चला आता तुम्ही बाहेर बसा. एका तासाने गाणं संपलं की पुढचं बोलूयात.” अशाप्रकारे फारसं नाट्यमय काहीही न घडता आमच्या गळ्यावर सुरेलपणाचं शिक्कामोर्तब झालं. आणि मग आठवड्यातून दोन दिवस डोक्याबरोबरच गळाही चालता व्हायला लागला.

क्लासमधे अगदी नवीन नवीन असताना मी सगळ्यात मागे, कधीही पळून जाता येईल किंवा चपलांच्या ढिगातून चपला लवकर मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी बसायचे. पण एक दिवस पहिल्या फळीतल्या काही लोकांच्या अनुपस्थितीमुळे बाईंनीच मला पुढे बसायला बोलावलं. गृहपाठ, परिक्षा, मार्कं, प्रश्न ही भानगड नसल्यामुळे मीही लगेच पुढे गेले. आणि मग एवढे दिवस लांबून बघितलेला व्यासबाईंचा चेहरा एकदम झूम इन केल्यासारखा जवळ आला. आतापर्यंत बाईंच्या आवाजाशी माझी ओळख होती. पण आता त्यांच्या गालावरच्या खळीशी, मधेच लखकन चमकणा-या खड्याच्या चमकीशी, लता मंगेशकरांसारख्या लांब पण पातळ वेणीशी हळूहळू ओळख व्हायला लागली.

बाईंच्या डाव्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी होती. गाणं शिकवत असताना बाई पेटी तर वाजवतंच पण पेटीच्या भात्यावर अंगठीवाल्या हाताने ताल देत. कुणी बेसूर होत असेल तर पेटीवरचा उजवा हात जोरात चाले आणि बेताल होत असेल तर भात्यावरचा डावा हात जोरजोरात ताल देऊ लागे. आमच्या घरी पेटी आणल्यावर मी बाईंची नक्कल करत तसंच भात्यावर ताल देत एक गाणं वाजवलं तर कुणीतरी म्हणालं, “व्वा! पेटीवर तबला चांगला वाजवतेस तू!”

मग एक दिवस बिहागातली ही चीज शिकले. बिहाग शिकले तेव्हा त्यातल्या शुद्ध-ती्व्र मध्यमाच्या लपाछपीतून तयार होणारा तरल, अवखळ शृंगार कळण्याचं माझं वय नव्हतं. आता मात्र त्या सुरेल धुक्यामागे लपलेली प्रेयसीची आर्जवं, तगमग अस्पष्ट दिसते आणि शब्दांचं चित्र होतं.
“लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा!”
सोळा शृंगार करून प्रियकराची वाट पहाणारी कुणी यौवना. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो मात्र कुठेतरी दूर. मग तिचे मेंदीने भरलेले हात तिच्या मदतीला येतात. ती मनातच त्याला म्हणत्येय, “ह्या बटा बघ नां कशा गुंतून बसल्यात….आणि त्यातच ही बिंदी पण विस्कटली आहे…पण ह्या मेंदीने माझे हात बांधले आहेत रे… आता तूच ये आणि आपल्या हातांनी नीट करून जा”…एवढंच. ह्या चीजेत शृंगारिक असं काहीच नाही. पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या दोन ऒळींच्यामधे फक्त आपलाच असा एक गाव असतो. सूर काय किंवा शब्द काय. ते आपले एखाद्या will-o-the-wisp सारखे आपल्याला फक्त त्या आपल्याच गावात घेऊन जातात एवढंच. म्हणूनच षड्जाला स्पर्श न करता अव्यक्तच रहाणारा “लट उलझी” मधला शृंगार मला खूप आवडतो.

ही चीज ऐकली की आणखी एक आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे मेंदीची. मेंदीचे तयार कोन मिळत नव्हते तेव्हापासून मी मेंदी लावत आलिये. किंबहुना मेंदी प्रत्यक्ष हातांवर लागेपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी एक सोहळा होत्या. हिरव्या भुरभुरीत मेंदीचा रानटी वास, त्यात चहाचं लालभडक आधण मिसळलं जात असताना हळूहळू गडद होत जाणारा तिचा रंग, मऊशार पोत, निलगिरीचा उग्र वास हे सगळं मला काल केल्यासारखं आठवतंय. मला मेंदी लावायची जरी प्रचंड हौस असली तरी ती लावण्याचं कसब मात्र माझ्याकडे नाही. ब-याचदा पुस्तकात पाहून काढायला घेतलेल्या मेंदीची परिणिती वैतागून मेंदी हातांवर फासण्यात होत असे.

मग आमच्या शेजारच्या मारवाडी कुटुंबातल्या बायड्यांना माझी दया येऊन शनिवारी रात्री तिचं काम आटपल्यावर मेंदी लावून देण्याचं आश्वासन देई. मग तो दिवस संपण्याची वाट पहाताना, ती विसरणार तर नाही नां म्हणून तिच्या अवतीभवती घुटमळताना वाटणारी बालसुलभ उत्सुकता, अपेक्षा, आनंद असे अनेक भाव मेंदी म्हटलं की आजही माझ्या मनात दाटून येतात. मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणा-या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणा-या ओल्या रेषा पहातंच रहाव्यात असं वाटे. कदाचित माझ्या उनाड स्वभावात नसलेला आखीवरेखीवपणा तात्पुरता का होईना पण मेंदीच्या रेषांतून माझ्या हातात आल्याचं समाधान मला तेव्हा मिळत असावं. माझ्या हातावर मेंदी “पुरे आता” इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, “सासरी लाड होणार तुझे” असं थट्टेने म्हणालं होतं. पण मेंदी रंगल्याच्या आनंदापलिकडे दुसरा कसलाच विचार यायला तेव्हा मनात जागाच नव्हती.

आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रिजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत.
गुलजारच्याच शब्दांत सांगायचं तर…
“इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं,
वहां दास्तां मिली, लम्हा कही नहीं”
रेमान ने त्याच्या गाण्यातून वगळलेल्या ओळीच्या माझ्यापुरत्या आता आठवणी झाल्या आहेत। मनमोहिनी ऐकताना त्या नसलेल्या ओळीची जागा ह्या आठवणी घेतात आणि गाणं पूर्ण होतं.

अगदी लहानपणी उंदीर मला आवडायचा. कारण तेव्हा जेरी किंवा मिकी माऊस हाच खरा उंदीर अशी उंदराची प्रतिमा भलतीच ग्लॅमरस होती. खरा उंदीर पाहिला तेव्हा अशा विध्वंसक आणि पाताळयंत्री प्राण्याला गोंडस रूप देताना वॉल्ट डिस्नेने किती कल्पकता खर्ची घातली असेल ह्याचा अंदाज आला. बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं. शाळा-कॉलेजात असतानाही माझ्या कित्येक स्वप्नांचा व्हिलन उंदीर (किंवा उडरं झुरळ) असायचा. घरची बेल वाजते आणि दरवाजा उघडावा तर शे दीडशे गलेलट्ठ उंदीरांची टॊळीच घरात शिरते किंवा एम. ए. चा पेपर आहे आणि माझ्या सगळ्या नोट्सचं उंदराने भुस्कट पाडलंय अशी स्वप्न मला कितीतरी वेळा पडायची. तर खरंच एका शनिवारी भल्या पहाटे दहा वाजता आत्तापर्यंत पाहिलेली सगळी भयावह स्वप्न आता सत्यात उतरणार म्हणून आमचे डोळे खाड्कन उघडले.

तर झालं काय की सकाळी झोपेतच स्वैपाकघरातलं काचेचं दारवालं कपाट उघडणार तोच आत एक काळी लांबट आणि ओलसर गोष्ट दिसली. डोळे लहानमोठे करून, लांबून-जवळून कसंही पाहिलं तरी इतकी किळसवाणी गोष्ट उंदराच्या लेंडीशिवाय दुसरं काहीही असूच शकत नव्हतं. किडयांना मारायचा जबरदस्त पूर्वानुभव असल्यामुळे चिरडणे, चेचणे, जाळणे, फटकारणे, झोडपणे अशा कारवायांत मी एव्हाना तरबेज झाले होते. पण ह्यापैकी एकही कौशल्य उंदराच्या बाबतीत उपयोगी पडणार नव्हतं. त्यानिमित्ताने Variety is the spice of life या उक्तीला अनुसरून वीकांत मसालेदार होणार अशी चिन्ह दिसायला लागली.

तो उंदीर बहुतेक त्या कपाटाबरोबर सरळ माझ्या डोक्यातच घुसला होता. कारण लगेच माझ्या मेंदूने तार्कीक आणिबाणी जाहीर करून टाकली. परिणामी एरवी ज्याच्यासाठी मी इतरांना वेड्यात काढलं असतं अशा गोष्टी मीच करून बसले.
पहिल्याप्रथम वेळकाळाचा काहीही विचार न करता आधी भारतात आईला फोन लावला. पण त्यामुळे उंदीर आणि आई ह्या दोघांना काहीच फरक पडला नाही. शेवटी माझीच आई ती! “अगं पिंजरा वगैरे पाठवू का इथून? का गुरख्यालाच पाठवू?” अशी प्रेमळ शब्दांत विचारपूस झाल्यावर दुस-या मिनिटाला संभाषण संपले.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कपाटात संभावित लपून बसले होते ते कपाट आजपासून उघडायचेच नाही असं मी मनातल्या मनात ठरवून टाकलं. कारण त्यामुळे तो उंदीर स्थानबद्ध होऊन त्याला पकडणं सोपं जाणार होतं. पण कपाट लाकडी असल्याने बाहेर पडण्यासाठी उंदीर स्वतःची मदत स्वतःच करू शकतो एवढी एकच जुजबी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. (जाऊ द्या हो! महान माणसांना असल्या बारीकसारीक चुका माफ असतात!)

उंदराविषयी आजही माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. तो दिसत असताना भीती वाटते; आणि दिसत नसताना राग येतो. गुपचुप घरात घुसतो काय, वाट्टेल ते कुरतडतो काय किंवा जिथेतिथे आपल्या खुणा सोडून जातो काय…बरं हा जर माणूस, मांजर किंवा कुत्रा असता तर मी माझ्या रागाचा बोलून, उपाशी ठेवून, आदळाआपट करून निचरा केला असता. पण उंदराला मात्र माझ्या रागाचं काहीही सोयरसुतक नसतं. उलट कुठलंही काम करत असताना माझ्या मेंदूचा एक भाग मात्र सतत “तो आत्ता काय करत असेल?” ह्याचा विचार करत रहातो. मग साला आपल्याला आपल्याच घरात बेशिस्त वागण्याची चोरी होते. म्हणजे एरवी केळी वगैरे मी बिनधास्त डायनिंग टेबलावर ठेवते. पण तो आल्यापासून जाळीच्या पिशवीत आणि ती जाळीची पिशवी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायला लागले. एवढे कष्ट करूनही हा पठ्ठा ती पिशवी, जाळी आणि केळी हे सगळंच कुरतडू शकतो ही काळजी बाकी राहिलीच. थोडक्यात त्याच्यापुढे आपण अगदीच हॅss आहोत असं मला एकसारखं वाटायला लागलं.

तर अशाप्रकारे वीकांत तर तापदायक गेलाच पण पुढचा संपूर्ण आठवडा तसाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला. पण उंदराचं भिजत घोंगडं तसंच होतं. ह्याच वेगाने काम केलं तर काहीही करायची गरज न पडता त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं.

बराच उहापोह झाल्यावर वेगवेगळे मार्ग पुढे आले. लोखंडी पिंजरा हा ऑप्शन जपानमधे केव्हाच मोडीत निघाला आहे असं कळलं. आणि हायटेक पिंज-याची किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा मायभूमीहून आयात करणे परवडेल असं वाटलं. दुसरा उपाय म्हणजे चिकटपट्टीचा. पण उंदीर तिच्यावर चिकटलाच तर त्या जिवंत उंदराची विल्हेवाट कशी लावणार? असा प्रश्न पडल्याने चिकटपट्टीवरही काट मारली. रहाता राहिली विषाची गोळी. गोळ्या मी विकत घेऊन त्या घरात ठिकठिकाणी पेरून ठेवल्या तर त्या खायचं आणि बाहेर जाऊन मरण्याचं काम उंदीर स्वतःचं स्वतःच करणार असल्याने हा कामाची समान वाटणी असलेला पर्याय मला सर्वाधिक पटला. अडचण एकच होती ती म्हणजे उंदीराचे अड्डॆ अजूनही गुलदस्त्यात असल्याने सुरुंग नेमके कुठे पेरावे हे समजत नव्हते.

शेवटी अंदाजाने फ्रीजच्या आगेमागे, कपाटाच्या आजूबाजूला अशा सहा गोळ्या ठेवल्या. (अजूनही मी कपाट उघडायची हिंमत होत नव्हती.) वाट बघण्यात अजून दोन आठवडे गेले. मी आपली रोज गोळ्या तपासून पहात होते. पण गोळ्यांच्या संख्येत किंवा आकारमानात ढिम्म फरक पडला नव्हता.

आता जवळजवळ एक महिना झाला होता. तोपर्यंत माझ्याकडे उंदीर आला असल्याची दवंडी पिटून झाल्यामुळे लोकही मूषकवधाच्या सुरम्य कहाण्या ऐकण्यासाठी उतावीळ झाले होते. पण सांगण्यासारखं काहीच घडत नव्हतं. अगदीच नाही म्हणायला रोज त्याची खुडबुड ऐकू येऊन मला जागरणं होत होती.

ज्या कपाटात तो घुसबंडा लपून बसला होता तिथे मी काचेची भांडी, झालंच तर पापड आणि मसाल्य़ाची पाकिटं ठेवते. जपानी उंदराला आपले बेडेकर, लिज्जत, बादशहा वगैरे न झेपून त्याचा उपासमारीने आधीच बळी तर गेला नसेल नां? आणि जिवंत उंदरापेक्षा मेलेला उंदीर अधिक त्रासदायक असतो ह्या उक्तीनुसार शेवटी ते कपाट उघडायचं ठरवलं. दार उघडल्या उघडल्या उंदीर टुणकन अंगावर उडी मारेल अशी मनाची पूर्वतयारी करून दार उघडलं. अरे! पण काहीच झालं नाही. आणि जिच्यामुळे हे सगळं घडत होतं ती आमची कृष्णवर्णा नायिका मात्र अजूनही जशीच्या तशीच पडून होती. आजवर जिला मी काचेच्या बाहेरून पहिलं होतं तिला काचेच्या अलिकडून आज प्रथमच पाहिलं आणि कपाळाला हात लावला. इथे मिळणार नाही म्हणून घरून हौसेने आणलेल्या हवाबाण हरडेच्या पाकिटातून सांडलेली ती एक गोळी होती.

ह्या गोष्टीला एव्हाना चार पांच महिने झालेत. आता स्वप्न आणि झोप ह्यांचं चक्र पुन्हा सुरळीत चालू झालं आहे. पण हवाबाणची दोन अख्खी पाकीटं संपवूनही खोट्याखोट्या उंदराकडून झालेला माझा खर्राखुर्रा पोपट मात्र अजूनही माझ्या पचनी पडलेला नाही.

बाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबईतला महागाईचा प्रश्न सुटल्यासारखा वाटतो; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो.
पण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच. जपानमध्ये असताना जरी मला एकदाही भूकंप जाणवला नाही तरी घरी परत गेले असताना मला आणि इतरांना बसलेले भूकंपाचे काही सौम्य धक्के…

मला बसलेला धक्का
स्थळ: हनुमान मार्ग, विलेपार्ले
रिश्टर स्केल: २-३
सालाबाद्प्रमाणे ह्याही वर्षी सात वाजता आय. सी. आय. सी. आय. बॅंकेच्या कट्टयावर भेटायचं ठरलं. मी एकटीच मुलुंड नावाच्या परग्रहावरून येणार होते. अशावेळी मर्फीच्या नियमानुसार गाडया हमखास लेट असतात हे लक्षात घेऊन नेहमीपेक्षा चांगला अर्धा तास अगोदर निघाले आणि अगदी सात नाही पण सात पाचला संकेतस्थळी पोचले. बघण्यासारखे इतरही लोक तिथे असल्याने सव्वा सात कसे वाजले ते कळलंच नाही. मग मात्र न राहवून फोन लावला.
मी: हॅलो…मॅडम आहात कुठे? सातला भेटायचं ठरलं होतं! मी लांब राहून सर्वात आधी पोचली आहे याबद्द्ल तुला काही लाज???
ती: थंड घे. दोन मिनिटात निघतेच. तोपर्यंत तू ४९-९९ मधे जाऊन टाईमपास कर.
मी: काssssय??
ह्यावर नॉर्मल माणसं सॉरी म्हणतात पण आमच्या ब्रुटसने मलाच वर एक शामची आई छाप डायलॉग कम टोमणा मारला.
ती: बाळ शाम, शरीराने भारतात आलास तसाच मनानेही येण्याचा प्रयत्न कर हो.


आईला बसलेला धक्का
रिश्ट्र स्केल आईच्या मते १० वगैरे।
आई: काय गं, परिक्षा कशी झाली?
मी: रिझल्ट लागेपर्यंत उत्तम.
आई: रिझल्ट कधी आहे मग?
मी: नवव्या महिन्यात!
आई: काssssssssssssssssय????? बरी आहेस नां???
मी: ही हा हा हा…..

जपानी न येणा-या लोकांसाठी तळटीप
जपानीत महिन्यांना नावे नसतात. जानेवारीला पहिला महिना, फेब्रुवारीला दुसरा महिना असं म्हणतात. त्यामुळे नववा महिना म्हणजे सप्टेंबर ही गोष्ट हुशार वाचकांच्या लक्षात आलीच असेल.

मराठी न येणा-या लोकांसाठी तळटीप
अरे हो! ते हा ब्लॉग वाचण्याच्या भानगडीतच पडणार नसल्याने प्रश्न मिटलेला आहे.आणि जर चुकून तुम्ही कुण्या अमराठी भाषिकाला हा किस्सा विनोद म्हणून सांगितलातच तर स्वत:चा पोपट होऊ नये म्हणून तुम्ही यथाशक्ती उकल करालच की!

मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं.
आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात. ब-याच कोजागिरीच्या रात्री मी लक्ष्मीच्या नव्हे तर भय्याच्या भेळेच्या आमिषाने जागून काढल्या आहेत. एवढंच नव्हे तर खुद्द लक्ष्मीदेखील चांदण्या रात्री भेळेसारखा ’स्वर्गीय’ (की ’पार्थीव’?) आनंद लुटायला येत असावी असा माझा पक्का समज आहे.
खरं म्हणजे भेळ घरच्या सगळ्यांना खायची असायची पण ती आणायला मात्र कुणीच तयार होत नसे. अशावेळी स्वयंसेवकगिरी करायला अस्मादिक एका पायावर तयार. त्याचं एक कारण म्हणजे तिथे उभं राहिल्यावर कधी चटणी-बटाटा, कधी तिखटमीठ लावलेली करकरीत कैरी, कधी शेव-कुरमुरे अशी चविष्ट खिरापत न मागताच मिळत असे. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भेळेइतकीच भेळेच्या प्रोसेसच्याच मी एवढी प्रेमात होते की भेळ खाण्याचा अर्धा आनंद मला ती खाण्याआधीच मिळत असे. (असाच आनंद मला डोसा घालताना पळीबरोबर गोल फिरणारे डोसावाले किंवा टोमॅटो/ बटाटयाच्या चकत्या फ्रिस्बीसारख्या बरोब्बर पावावर उडवणारे सॅंडविचवाले पाहिले की पण होतो!)
वर्षानुवर्ष भय्याची यायची वेळ आणि जागा एवढया ठराविक होत्या की बिस्किट फॅक्टरीचा पाचचा भोंगा कशासाठी होतो? तर पार्लेकरांना भय्याच्या येण्याची वर्दी देण्यासाठी असा समज झाला किंवा “नाका म्हणजे काय?” असं विचारल्यावर कुण्या बालकाने “जिथे रस्ते आणि भेळवाला मिळतात अशी जागा” असं उत्तर दिलं तर गैर वाटू नये.
एकदा का तो त्याच्या पिचवर स्थिरस्थावर झाला की मग एखाद्या सैन्याच्या कमांडरच्या थाटात बहुतांच्या रसनेवर राज्य करण्याची त्याची तय़ारी सुरू होई. कुरमु-यांवर निखा-यांचं मडकं ठेवणे, गाडीच्या आतल्या बाजूने कैरी, बटाटा, कांदे, टोमॅटो अशी रंगीबेरंगी चळत रचणे, मासिकांचे गुळगुळीत आणि साधे कागद वेगळे करून फर्रकन ओढता येतील अशा अंतरावर लावणे, चटण्या तयार करणे ही कामं होईहोईपर्यंतच “भय्या, दो भेल..एक मीठा कम, एक जैन बनाना…इस्त्रीका कपडा लेके आता हू।“ अशी कुणीतरी ऑर्डर देऊन गेलेला असे. भय्याची वाट पहाणारी माझ्यासारखी अनेकजण असतील पण तयारी होऊन गि-हाईकांची वाट पहाणारा रिकामटेकडा भय्या मी कधीच पाहिलेला नाही.
मला सर्वात आकर्षण वाटायचं ते तो कांदा कापताना. प्रथम कांद्याची साले आणि शेंडी काढून सोलीव कांदा डाव्या हातात धरून तो त्यावर उभे काप देई. आणि मग कांदा एका लयीत गोल फिरवत खसाखस आडवे काप देई. त्याबरोब्बर कांद्याच्या छोट्याछोट्या चौकोनी तुकड्यांचा पांढ-याशुभ्र खच काही क्षणात जमा होई. इतर वेळेस भल्याभल्यांना रडवणा-या कांद्याचा भय्याच्या हातात मात्र सपशेल पांढरा बावटा! मी कित्येक वेळा कांदा तसा चिरून पहायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी कांद्याची दोन शकलं आणि माझी फजिती मात्र झाली.
पहावं तेव्हा भय्याभोवती माणसांचा गोतावळा जमलेला असे. कारण भेळेइतकाच तो नाका म्हणजे रसभरीत गप्पांचादेखील अड्डा होता. हिंदीमध्ये ’बातें बनाना’ असं का म्हणतात हे भेळवाल्यापाशी दोन मिनिटं थांबूनसुद्धा सूज्ञ्यांना लगे़च लक्षात येईल. बरं तिथे जमणारी सगळीच माणसं सरळसाधी होती असं नाही. काहीजण त्याच्या गाडीपाशी नुसतेच टाईमपास करायला येत; काही गप्पांबरोबरच शेवेवर हात मारत किंवा पु-या लाटत; काही भेळ मागवून पैसे खात्यात जमा करायला सांगत. पण ह्या नानापरीच्या गि-हाईकांवर वैतागलेला, पैशाचा तगादा लावणारा भय्या मी ऐकलेला नाही. उलट ही सगळी रिकामटेकडी माणसं भय्याने सांगताच भेळेच्या पुडया बांधणे, बटाटे सोलणे, भेळ नेऊन पोचवणे अशी चिल्लर कामे करायला लगेच तयार होत. वर भय्याचं त्यांना प्रोत्साहन “आप सेवममरा मांगते है जरूर पर काम बढिया करें हों। एक दिन मेरी छुट्टी करोगे।“ ग्राहकराजावरच गुपचुप राज्य करायचं अचाट कौशल्य त्याच्याकडे होतं. ही सगळी माणसं त्याच्या चटपटीत भेळेसाठी तिथे जमत की मधाळ गप्पांसाठी हे ठरवणं खरंच कठीण आहे.
पुढे आम्ही घर बदललं आणि मग ओघाने भेळवालाही बदलला. पण पहिल्या प्रेमासारखा ह्या पहिल्या भेळवाल्याने मनातलाही एक नाका कायमचा व्यापून ठेवला आहे.
***
दुसरा एक माझ्या आठवणीतला भेळवाला म्हणजे दादर स्टेशनवरचा. जनसामान्यांच्या उदरभरणाचा भार आपल्या अगडबंब पोटावर पेलणारा तो दादरचा भेळवाला पाहिला की मला अवघ्या पृथ्वीचा भार आपल्या खांद्यावर पेलणारा ग्रीक पुराणकथेतला ऍटलासच आठवतो. ट्रेनमधली खिडकीजवळची जागा, गार वारा, खिडकीतून दिसणारी झोपेला आलेली मुंबईची झगमग, जिभेवर रेंगाळणारी सुक्या भेळेची चटपट आणि आठवणी चाळवणारी एफ. एम.वरची गाणी अशा खास मध्यमवर्गीय सुखासाठी कित्येक वेळा फास्ट ट्रेन सोडून स्लो ट्रेनने जाण्याचा मोह मला आवरता आलेला नाही.
प्लॅटफॉर्मवरच्या वर्दळीमुळे असेल किंवा पानाच्या तोब-यामुळे माहित नाही, पण ह्या भय्याचा आवाज ऐकण्याची संधी फार कमी वेळा आली. त्याच्या आजूबाजूला झडणा-या राजकारण, कला, क्रीडा, तेजी मंदीवरच्या चर्चाही त्याची लय कधीच बिघडवू शकल्या नाहीत. एखाद्या कसलेल्या गायकाने ताना मुरक्या घेऊन समेवर यावं तसंच याने पुढ्यातल्या दहा पिशव्यातून हात फिरवून शेवटी पुरी खोचलेली पुडी आपल्या हातात द्यावी. मला भेळेत चणे आवडत नसत आणि हा तपशील मी एकदाच त्याला सांगितल्याचं माझ्या आठवणीत आहे. मला खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्या अनेक रसिकांचे ’वर्ज्य’ त्याच्या मेंदूत कायमचे साठवले गेले असतील.
त्याच्या आजूबाजूला कणीसवाले, चटपटे चणेवाले असे अनेक rivals होते. एकदा कुणीतरी भय्याला म्हटलं, “भय्याजी, देखो सभी लोग कैसे भाव बढा रहें है। आपही हो जो सदियोंसे ५ रुपियें में भेल खिलाते आये हो। आपभी बढाईए… ” त्याच्यावर तो आधी नुसताच तोबरा सांभाळत हसला. आणि मग म्हणाला,”एक बात यू हैं की भाव पाच से सात करो तो छुट्टें पैसे देने होंगे। आजकल छुट्टोंकी शार्टेज हैं साब। और दुसरी दिलकी बात कहें तो सिर्फ़ रुपिये नही तो लोगोंकी दुवाए भी तो हम कमाते है। पैसोंसे जेब भरे पर दिल तो नहीं…एक जमाना था जब हम भी आये थे बम्बई मुलुकसे…दो रुपियोंकी कीमत हमही जाने।“ आणि पहिल्यांदाच मला भय्याच्या विशाल देहामागचा तेवढाच विशाल माणूस दिसला.
***जपानात आपल्या भेळवाल्यांसारखेच ताकोयाकी, ताईयाकी, ओमोची वगैरेंचे स्टॉल दिसतात. पण बाह्य रूप सोडल्यास भेळवाल्याशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. भेळ हा चमच्यांच्या मापाने, कॅलरीचा हिशेब मांडत बसणा-यांचा प्रांत नव्हे. तिथे बचके आणि मुठींचं राज्य चालतं. (हां आता चवीचं परिमाण स्वच्छता असेल तर गोष्ट वेगळी!) आमचा भय्या नसेल इथल्या एप्रन घातलेल्या ताकोयाकीवाल्याएवढा अदबशीर पण शेव कुरमु-यांचे किंवा पुरीचे ऊठसूट एक्स्ट्रा चार्जेस नाही लावत. ताकोयाकीवाल्याच्या पारदर्शक काचेतून पलिकडची स्वच्छता आणि काटेकोरपणा दिसतो. पण काचेमागचा ताकोयाकीवाला मात्र माझ्यासाठी आजतागायत अदृश्य आहे. प्रत्येक पदार्थात त्याच्या कर्त्याचा अंश असतो म्हणे! जेव्हा तो मला जपानात सापडेल तेव्हा मला आमच्या भेळवाल्याची उणीव इथे भासणार नाही.

;;