मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं.
आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात. ब-याच कोजागिरीच्या रात्री मी लक्ष्मीच्या नव्हे तर भय्याच्या भेळेच्या आमिषाने जागून काढल्या आहेत. एवढंच नव्हे तर खुद्द लक्ष्मीदेखील चांदण्या रात्री भेळेसारखा ’स्वर्गीय’ (की ’पार्थीव’?) आनंद लुटायला येत असावी असा माझा पक्का समज आहे.
खरं म्हणजे भेळ घरच्या सगळ्यांना खायची असायची पण ती आणायला मात्र कुणीच तयार होत नसे. अशावेळी स्वयंसेवकगिरी करायला अस्मादिक एका पायावर तयार. त्याचं एक कारण म्हणजे तिथे उभं राहिल्यावर कधी चटणी-बटाटा, कधी तिखटमीठ लावलेली करकरीत कैरी, कधी शेव-कुरमुरे अशी चविष्ट खिरापत न मागताच मिळत असे. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष भेळेइतकीच भेळेच्या प्रोसेसच्याच मी एवढी प्रेमात होते की भेळ खाण्याचा अर्धा आनंद मला ती खाण्याआधीच मिळत असे. (असाच आनंद मला डोसा घालताना पळीबरोबर गोल फिरणारे डोसावाले किंवा टोमॅटो/ बटाटयाच्या चकत्या फ्रिस्बीसारख्या बरोब्बर पावावर उडवणारे सॅंडविचवाले पाहिले की पण होतो!)
वर्षानुवर्ष भय्याची यायची वेळ आणि जागा एवढया ठराविक होत्या की बिस्किट फॅक्टरीचा पाचचा भोंगा कशासाठी होतो? तर पार्लेकरांना भय्याच्या येण्याची वर्दी देण्यासाठी असा समज झाला किंवा “नाका म्हणजे काय?” असं विचारल्यावर कुण्या बालकाने “जिथे रस्ते आणि भेळवाला मिळतात अशी जागा” असं उत्तर दिलं तर गैर वाटू नये.
एकदा का तो त्याच्या पिचवर स्थिरस्थावर झाला की मग एखाद्या सैन्याच्या कमांडरच्या थाटात बहुतांच्या रसनेवर राज्य करण्याची त्याची तय़ारी सुरू होई. कुरमु-यांवर निखा-यांचं मडकं ठेवणे, गाडीच्या आतल्या बाजूने कैरी, बटाटा, कांदे, टोमॅटो अशी रंगीबेरंगी चळत रचणे, मासिकांचे गुळगुळीत आणि साधे कागद वेगळे करून फर्रकन ओढता येतील अशा अंतरावर लावणे, चटण्या तयार करणे ही कामं होईहोईपर्यंतच “भय्या, दो भेल..एक मीठा कम, एक जैन बनाना…इस्त्रीका कपडा लेके आता हू।“ अशी कुणीतरी ऑर्डर देऊन गेलेला असे. भय्याची वाट पहाणारी माझ्यासारखी अनेकजण असतील पण तयारी होऊन गि-हाईकांची वाट पहाणारा रिकामटेकडा भय्या मी कधीच पाहिलेला नाही.
मला सर्वात आकर्षण वाटायचं ते तो कांदा कापताना. प्रथम कांद्याची साले आणि शेंडी काढून सोलीव कांदा डाव्या हातात धरून तो त्यावर उभे काप देई. आणि मग कांदा एका लयीत गोल फिरवत खसाखस आडवे काप देई. त्याबरोब्बर कांद्याच्या छोट्याछोट्या चौकोनी तुकड्यांचा पांढ-याशुभ्र खच काही क्षणात जमा होई. इतर वेळेस भल्याभल्यांना रडवणा-या कांद्याचा भय्याच्या हातात मात्र सपशेल पांढरा बावटा! मी कित्येक वेळा कांदा तसा चिरून पहायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी कांद्याची दोन शकलं आणि माझी फजिती मात्र झाली.
पहावं तेव्हा भय्याभोवती माणसांचा गोतावळा जमलेला असे. कारण भेळेइतकाच तो नाका म्हणजे रसभरीत गप्पांचादेखील अड्डा होता. हिंदीमध्ये ’बातें बनाना’ असं का म्हणतात हे भेळवाल्यापाशी दोन मिनिटं थांबूनसुद्धा सूज्ञ्यांना लगे़च लक्षात येईल. बरं तिथे जमणारी सगळीच माणसं सरळसाधी होती असं नाही. काहीजण त्याच्या गाडीपाशी नुसतेच टाईमपास करायला येत; काही गप्पांबरोबरच शेवेवर हात मारत किंवा पु-या लाटत; काही भेळ मागवून पैसे खात्यात जमा करायला सांगत. पण ह्या नानापरीच्या गि-हाईकांवर वैतागलेला, पैशाचा तगादा लावणारा भय्या मी ऐकलेला नाही. उलट ही सगळी रिकामटेकडी माणसं भय्याने सांगताच भेळेच्या पुडया बांधणे, बटाटे सोलणे, भेळ नेऊन पोचवणे अशी चिल्लर कामे करायला लगेच तयार होत. वर भय्याचं त्यांना प्रोत्साहन “आप सेवममरा मांगते है जरूर पर काम बढिया करें हों। एक दिन मेरी छुट्टी करोगे।“ ग्राहकराजावरच गुपचुप राज्य करायचं अचाट कौशल्य त्याच्याकडे होतं. ही सगळी माणसं त्याच्या चटपटीत भेळेसाठी तिथे जमत की मधाळ गप्पांसाठी हे ठरवणं खरंच कठीण आहे.
पुढे आम्ही घर बदललं आणि मग ओघाने भेळवालाही बदलला. पण पहिल्या प्रेमासारखा ह्या पहिल्या भेळवाल्याने मनातलाही एक नाका कायमचा व्यापून ठेवला आहे.
***
दुसरा एक माझ्या आठवणीतला भेळवाला म्हणजे दादर स्टेशनवरचा. जनसामान्यांच्या उदरभरणाचा भार आपल्या अगडबंब पोटावर पेलणारा तो दादरचा भेळवाला पाहिला की मला अवघ्या पृथ्वीचा भार आपल्या खांद्यावर पेलणारा ग्रीक पुराणकथेतला ऍटलासच आठवतो. ट्रेनमधली खिडकीजवळची जागा, गार वारा, खिडकीतून दिसणारी झोपेला आलेली मुंबईची झगमग, जिभेवर रेंगाळणारी सुक्या भेळेची चटपट आणि आठवणी चाळवणारी एफ. एम.वरची गाणी अशा खास मध्यमवर्गीय सुखासाठी कित्येक वेळा फास्ट ट्रेन सोडून स्लो ट्रेनने जाण्याचा मोह मला आवरता आलेला नाही.
प्लॅटफॉर्मवरच्या वर्दळीमुळे असेल किंवा पानाच्या तोब-यामुळे माहित नाही, पण ह्या भय्याचा आवाज ऐकण्याची संधी फार कमी वेळा आली. त्याच्या आजूबाजूला झडणा-या राजकारण, कला, क्रीडा, तेजी मंदीवरच्या चर्चाही त्याची लय कधीच बिघडवू शकल्या नाहीत. एखाद्या कसलेल्या गायकाने ताना मुरक्या घेऊन समेवर यावं तसंच याने पुढ्यातल्या दहा पिशव्यातून हात फिरवून शेवटी पुरी खोचलेली पुडी आपल्या हातात द्यावी. मला भेळेत चणे आवडत नसत आणि हा तपशील मी एकदाच त्याला सांगितल्याचं माझ्या आठवणीत आहे. मला खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्या अनेक रसिकांचे ’वर्ज्य’ त्याच्या मेंदूत कायमचे साठवले गेले असतील.
त्याच्या आजूबाजूला कणीसवाले, चटपटे चणेवाले असे अनेक rivals होते. एकदा कुणीतरी भय्याला म्हटलं, “भय्याजी, देखो सभी लोग कैसे भाव बढा रहें है। आपही हो जो सदियोंसे ५ रुपियें में भेल खिलाते आये हो। आपभी बढाईए… ” त्याच्यावर तो आधी नुसताच तोबरा सांभाळत हसला. आणि मग म्हणाला,”एक बात यू हैं की भाव पाच से सात करो तो छुट्टें पैसे देने होंगे। आजकल छुट्टोंकी शार्टेज हैं साब। और दुसरी दिलकी बात कहें तो सिर्फ़ रुपिये नही तो लोगोंकी दुवाए भी तो हम कमाते है। पैसोंसे जेब भरे पर दिल तो नहीं…एक जमाना था जब हम भी आये थे बम्बई मुलुकसे…दो रुपियोंकी कीमत हमही जाने।“ आणि पहिल्यांदाच मला भय्याच्या विशाल देहामागचा तेवढाच विशाल माणूस दिसला.
***जपानात आपल्या भेळवाल्यांसारखेच ताकोयाकी, ताईयाकी, ओमोची वगैरेंचे स्टॉल दिसतात. पण बाह्य रूप सोडल्यास भेळवाल्याशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. भेळ हा चमच्यांच्या मापाने, कॅलरीचा हिशेब मांडत बसणा-यांचा प्रांत नव्हे. तिथे बचके आणि मुठींचं राज्य चालतं. (हां आता चवीचं परिमाण स्वच्छता असेल तर गोष्ट वेगळी!) आमचा भय्या नसेल इथल्या एप्रन घातलेल्या ताकोयाकीवाल्याएवढा अदबशीर पण शेव कुरमु-यांचे किंवा पुरीचे ऊठसूट एक्स्ट्रा चार्जेस नाही लावत. ताकोयाकीवाल्याच्या पारदर्शक काचेतून पलिकडची स्वच्छता आणि काटेकोरपणा दिसतो. पण काचेमागचा ताकोयाकीवाला मात्र माझ्यासाठी आजतागायत अदृश्य आहे. प्रत्येक पदार्थात त्याच्या कर्त्याचा अंश असतो म्हणे! जेव्हा तो मला जपानात सापडेल तेव्हा मला आमच्या भेळवाल्याची उणीव इथे भासणार नाही.

;;