ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच. त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात. आणि मग एखाद्या गवयाने सुराला सूर जोडत गात जावं तसंच कधी आमटीचा भुरका, कधी लोणच्याचं बोट तर कधी स्निग्ध तुपाने सुस्नात मोदकाचा घास असं चवीला चव जोडत खवय्ये खात जातात. मोदकांवर पळ्यांनी आग्रह पड्तच जातो, रिकाम्या झालेल्या वाटया घरच्या अन्नपूर्णांच्या प्रेमाने भरतच जातात. हास्यविनोदात सामील झालेल्या बाप्पाचे डॊळेपण हसताना बारीक झालेले असतात. शेवटी कुणीतरी उठून बडिशेप, विडे आणतो आणि पानं हलतात. मघाच्या आरतीतल्या भक्तीरसाबरोबरच आता इतर अनेक रसांनी ती खोली तुडुंब भरून गेलेली असते!

मी जपानाला आले आणि ह्या ताटावरच्या मैफिलीत रंग भरले जाईनात. पण त्याच वेळेस माझ्या आजुबाजूची माणसं मात्र “उमाई” “ओइशिई” म्हणत त्या जेवणावर चॉपस्टिक्सने तुटून पडली होती. आणि मग एकदम लक्षात आलं. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मनगटावर मारे गजरेबिजरे बांधून गेलं तरी लावणीचा ठसका मिळणार नाही; शास्त्राच्या पुस्तकात भटांची गजल असणार नाही. तसंच जपानी जेवणातही घरच्या चवी सापडणार नाहीत. असा “परि तू जागा चुकलासी”चा साक्षात्कार मला झाला तेव्हाच मी जपानी जेवणात ख-या अर्थाने रस घ्यायला लागले.

जपानी जेवण ही काही (नुसतीच) खायची गोष्ट नाही…ती तर लिहायही, बघायची गोष्ट आहे. जपानी भाषेत “आधी डोळ्यांनी खावं आणि मग हातांनी” (मे दे ताबेतेकारा, ते दे ताबेरु) अशा अर्थाची म्हणच आहे. एखाद्या मादक यौवनेने “drink to me only with thine eyes” म्हणावं आणि वारुणीशिवायच नशा यावी तसंच “eat to me only with thine eyes” असं म्हणणा-या जपानी जेवणाकडे बघूनच समाधान होतं. पसरट वाटीत तोफुचा (तोफु=सोयाबीनचं पनीर) पांढराशुभ्र चकचकीत ठोकळा, त्याच्यावर टेकवलेलं टिकलीएवढं हिरवं वासाबी (वासाबी=जपानी मोहरीची चटणी), वरून भुरभुरलेल्या पातीच्या कांद्याच्या हिरव्या भिंगो-या, आणि पांढ-याशुभ्र तोफुवरून वहाणारे सोयासॉसचे तपकिरी ओघळ! बाजूला सुशीच्या रंगीबेरंगी गुंडाळ्या, एकीकडे तेनपुराच्या (तेनपुरा=जपानी भजी) आरस्पानी आवरणातून डोकावणारी गाजरं, वांगी, रताळी.भारताच्या शोधात निघालेला कोलंबस जसा अमेरिकेला जाऊन पोचला तसाच चवीच्या शोधात निघालेला खवय्या इथे नितांतसुंदर सौंदर्यापाशी येऊन पोचतो.





निसर्गाने जपानला भरभरून दिलंय. मग जपानी माणूसही निसर्गाला आपल्या घरचाच एक असल्यासारखा प्रेमाने वागवतो. घर कितीही लहान असलं तरी तिथे झाडांना, पानाफुलांना त्यांची अशी जागा असते. कधी घरापुढे अंगण असतं (त्याला “निवा” म्हणतात), तेव्हढीही जागा नसेल तर घराच्या दारात आल्यागेल्याचं स्वागत करायला ताजी रंगीत फुलं उभी असतात. तेही नसेल तर अगदी किमानपक्षी बाथरूमच्या कट्टयावरच्या एवढयाशा जागेत चिमुकल्या वाटीत, काचेच्या भांडयात फुलं, पानं, वेली असतातंच. जपानच्या एका वर्षात चार ऋतू आपापलं वैशिष्टय जपत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असतात. ऋतू सरत जातात तसा बदल पहिल्यांदा हवेत होतो आणि मग तिथून थेट जेवणात उतरतो. त्या त्या ऋतूचं वैशिष्टय असलेल्या भाज्या, फळं हे सगळं जेवणात येतं. मला माझ्या शाळेतली मुलं कुतुहलाने विचारतात,” तुमच्या इंडियातल्या वांग्याची चव इथल्यासारखीच असते का?” आता वांगं म्हटल्यावर माझ्या जिभेवर येते ती भरल्या वांग्याची चव किंवा वांग्याच्या कापांची चव. पण दोन्ही मसालेदारच. त्यामुळे मला काहीही उत्तर देता येत नाही. जपानी जेवणात पदार्थाची मूळची नैसर्गिक चव मारून टाकायचा प्रयत्न नसतो. म्हणूनच मग भेंडीचा बुळबुळीतपणा, कारल्याचा कडवटपणा, कोबीचा करकरीतपणा, कच्च्या गाजराचा गोडवा हे सगळं जसं आहे तसं ताटात उतरतं. हे सगळं माझ्या जिभेला रुचलं नाही तरी त्यातली “जे जसं आहे ते तसं” स्वीकारायची भावना मात्र मला आवडते.

जपानी जेवणात सी-वीड (नोरी) वापरतात. माझे आईबाबा जपानला आले असताना योशिदासाननी खास माझ्या आईबाबांसाठी ताज्या सी-वीडचे हिरवे कागद मागवले होते. त्यावर भात पसरून, आत भाज्या घालून गुंडाळून खायचं होतं. (थोडक्यात नोरी फ्रॅंकी!) माझ्या आईने तो प्रकार तोंडात घालताक्षणीच,”ह्याला खारट पाण्याचा (पक्षी: माशाचा) वास येतो आहे!” असं मराठीत म्हटलं. इकडे योशिदासान जपानीत सांगत होत्या, “हे फार चांगल्या प्रतीचं सी-वीड आहे कारण ह्याला अजून समुद्राचा वास येतोय!” माझी चांगलीच पंचाईत झाली. त्यावेळी तिथली भाषेची दरी माझ्यातल्या दुभाष्याने भरून काढली असती तरी ही सांस्कृतिक दरी मात्र मी सोयिस्करपणे मौनानेच भरून काढली.

इथे आल्यावर मला “तुम्ही लोक हाताने का जेवता?” असं सगळेच एकदातरी विचारतात. त्यावर उत्तर म्हणून मी त्यांना “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म” समजावून सांगते. आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटताना जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं. असं हे आपल्या “वदनीकवळ”चं पावित्र्यच मला वज्रासनात ताठ बसलेला जपानी, समोरचं बुटकं सोनेरी कलाकुसर केलेलं टेबल, त्यावर मांडलेले असंख्य चिमुकले वाडगे, ते अदबीने हाताच्या ओंजळीत उचलून एकेक घास शांतपणे तोंडात घालणा-या जपानी माणसात दिसतं. भले चवी वेगळ्या असतील पण आकाशातल्या ज्या अदृश्य शक्तीचा अंश आपण ग्रहण करीत आहोत त्याविषयी कृतज्ञतेची भावना मात्र “वदनीकवळ” म्हटलं काय किंवा “इतादाकिमास” म्हटलं काय सारखीच आहे असं मला वाटतं.

मागे एकदा असंच डिक्शनरीशी खेळ करताना मी “जपान” ह्या शब्दाचा अर्थ पाहिला होता. जसा चायना शब्दाला विशिष्ट अर्थ आहे (संदर्भ: bull in a China shop!) तसंच जपान म्हणजे लाकडी भांडी वॉर्निशने चमकवून त्यांवर लाखेने केलेलं सोनेरी नक्षीकाम. लाखेचेच नव्हेत पण चिनीमातीचे, भूमितीतल्या आणि भूमितीबाहेरच्या सगळ्या आकारांचे (मेपलच्या पानाचे, साकुराच्या पाकळीचे, चंद्रकोरीचे) सुंदर ताटल्या, वाटया, वाडगे इथे पाहिले. एवढंच नव्हे तर खोलगट बांबू, शिंपले, वेताच्या टोपल्या ह्यांचादेखील जेवण वाढण्यासाठी कलात्मकतेने वापर केलेला पाहिला. एकदा तर “सफरचंदाचं ग्लटन” नावाचा प्रकार तर चक्क लालचुटुक सफरचंद पोखरून त्यातच बनवलेला होता! आणि देठाचा भाग झाकण म्हणून ठेवला होता. तिथे “गाजराची पुंगी”सारखं “सफरचंदाची वाटी, आतलं संपलं तर ठीक नाहीतर मोडून खाल्ली!” हे मी किती वेळा मनात म्हटलं! समोर वाढलेलं ते सगळं सौंदर्य डोळ्यात आणि मग पोटात साठवून घेताना परत एकदा “उदरभरण नोहे...”तल्या उदात्ततेचीच अनुभूती आली.




जेवण (मग जपानी असू दे नाहीतर आपलं!) कुणालाही एवढं प्रिय का वाटावं? कारण जेवणातून मिळणारं समाधान नेहमीच चवीत नसतं. ते मनात असतं. जेवणाशी चित्र/ आठवणी जोडलेल्या असतात. आपण नुसतंच जेवत नसतो. तेव्हापुरत्या त्या सुखद आठवणी जगत असतो. हेच बघा नां...रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां? जे आपल्याकडे तेच जपानात. इथे उन्हाळ्यात सोमेन नूडल्स खातात. बाहेर उन्हाची काहिली वाढलेली असते. तशातच पाण्याची किंवा उन्हाळ्यातल्या स्वच्छ आकाशाची निळाई सोमेनच्या बाऊलमधे उतरलेली असते, त्यात बर्फाचे खडे आणि त्यावर तरंगणा-या पारदर्शक सोमेन नूडल्स. मग त्या सोमेन सुर्रकन ओढून खाताना आतपर्यंत जाणवलेला बर्फाचा गारेगार स्पर्श...ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा आभास होतो. A way to one’s heart goes through stomach किंवा A way to one’s stomach goes through heart दोन्हीही तितकंच खरं असतं. इथल्या जेवणाशीही माझ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेवताना त्यानीच जेवणाला चव येते.

आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.

हे आणखी काही फोटो:







;;