इसापाच्या गोष्टीत असतं तसं प्राण्यांचं एक आटपाट नगर होतं. तिथे अनेक प्रकारचे प्राणी अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. प्रत्येक प्राण्याची आपली अशी वेगळी संस्कृती होती. “उतायचं नाही, मातायचं नाही आणि माणसांसारखं भांडायचं नाही” हे मुळी त्या नगराचं ब्रीदवाक्यच होतं. ह्या ब्रीदवाक्याला जागून होता होईल तेवढी सांस्कृतिक देवाणघेवाण करायची ह्यावर तिकडचे सगळेच नागरिक एकमत होते. ह्या नगरातल्या एका भागाचा हा क्रॉससेक्शन!
*****
ह्या वस्तीत तीन शेजारी रहात होते; कोल्हा, करकोचा आणि कावळा.
करकोचा दिसायला दौलदार आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता. इतर पांढ-या प्राण्यांना जरी करकोच्याच्या पांढ-या रंगात पिवळसर झाक दिसली तरी स्वत: करकोच्याला मात्र तो स्वत: पांढराशुभ्र असल्याची खात्री होती. म्हणूनच दिवसातला त्याचा बराचसा वेळ आपले पंख चोचीने साफ करण्यात आणि बाकीचा वेळ घर साफ करण्यात जात असे. तसा तो फारच प्रेमळ आणि नम्र होता. एकटाच आपला पाण्यात तासनतास उभा राहून मासे पकडत असे. पण त्याला कोणी सामान्य पक्ष्यांच्या (विशेषतः कावळ्यांच्या) पंगतीला बसवले की त्याला ते मुळीच खपत नसे.
त्याचा शेजारी कोल्हा; तांबूस रंगाचा आणि झुपकेदार शेपटीचा. कोल्ह्याच्या घरावरचे गोल घुमट, घराची बांधणी ह्यावरूनच त्याच्या हुच्च राहणीचा कुणालाही अंदाज आला असता. कोल्ह्याच्या घरी अगदी पिढया दर पिढया जणु लक्ष्मी आणि सरस्वती जुळ्यानेच जन्माला येत होत्या. त्यामुळे अशा सर्वसंपन्न कोल्हासंस्कृतीत करकोच्याला विशेष रस होता.
तिसरं घर कावळ्याचं. कावळा दिसायला काळा पण अतिशय हुशार आणि मेहेनती होता. त्याच्या गबाळ्या घरावरून त्याच्या तल्लख बुद्धीची कल्पना कुणालाच आली नसती. म्हणा तसा कावळ्याला त्याने काही फरक पडणार नव्हता. कारण एक काडी जमवत जमवत त्याने बरीच पुंजी जमवली होती. वस्तीतल्या सगळ्यांनाच काकसंस्कृतीविषयी विलक्षण आकर्षण होतं. विशेषत: कावळ्यांचं जेवण जरी आजतागायत कोणी खाऊन पाहिलं नसलं तरी कावळ्यांची खाद्यसंस्कृती हा तिथल्या सांस्कृतिक चर्विच्चर्वणाचा विषय बनला होता.
*****
ह्याचाच फायदा घेऊन आपल्या शेजा-यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करावेत ह्या हेतूने कावळ्याने एकदा करकोच्याला आपल्या घरी मेजवानीचं आमंत्रण दिलं. आता करकोच्याची झाली पंचाईत! सांस्कृतिक आदानप्रदानाचा झेंडा अखंड फडकवत ठेवतानाच कावळ्याला नकार कसा द्यावा ह्याचा तो विचार करायला लागला.
पण फार विचार करायची गरज पडली नाही. कारण कोल्ह्यानेही अगदी त्याच दिवशी त्याच वेळी त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. निवड सोप्पी होती. लगेच कोल्ह्याकडे होकाराचे आणि कावळ्याकडे नकाराचे निरोप गेले. घेतला वसा टाकावा न लागल्यामुळे करकोच्याची मान एक इंचभर उंचावली.
आता कोल्ह्यासारख्या कला-साहित्य-शास्त्रसंपन्न घरात मोकळ्या हाती कसं जायचं म्हणून करकोच्याची तयारी सुरु झाली. मिसेस करकोच्यांनी अस्सल करकोची खाद्यपदार्थ जातीने तयार केले, बाळ करकोच्यांनी बाळ कोल्ह्यांसाठी आपल्या बाळहातांनी चित्रे काढली, भेटकार्डे तयार केली. अशाप्रकारे जय्यत तयारीनिशी करकोचा कोल्ह्याकडे रवाना झाला.
कोल्ह्याने दारातच करकोच्याची स्तुती आणि स्वागत केलं. करकोचाही त्यात मागे राहिला नाही. कोल्हासंस्कृतीविषयी त्याला वाटणारी तळमळ तो भेटींच्या स्वरूपात बरोबर घेऊन आलाच होता. ती त्याने कोल्ह्याकडे सुपूर्त केली. कोल्ह्याने कोणतेही आढेवेढे न घेता त्या सर्व भेटींचा सादर स्वीकार केला. आणि सगळे जेवणाच्या टेबलाकडे रवाना झाले.
त्या टेबलावर कोल्हासंस्कृतीतले अनेकोत्तम पदार्थ मांडले होते. झालंच तर पेले, वाट्या आणि ताटल्यादेखील कोल्हासंस्कृतीच्या उच्चपणाची ग्वाही देत होत्या. गालिचे, रुमाल टेबलक्लॉथ ह्यावर देखील कोल्हा संस्कृतीची छाप जाणवत होती. करकोच्याला ताटलीतल्या कोल्हासंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा होता. पण ताटलीच्या पसरट आकारामुळे तो आपली चोच ओली करण्यापलिकडे तो काहीही करू शकला नाही. अर्थात, तरीही त्या पदार्थांच्या न घेतलेल्या चवीची तारीफ करायला तो विसरला नाही.
शेवटी निरोपाची वेळ आली. करकोच्याकडून मिळालेल्या भेटीची परतफेड म्हणून कोल्ह्याने आपल्या संस्कृतीचा ठसा असलेल्या ताटल्या आणि वाडगे भेट दिले. अशाच सांस्कृतिक भेटी घडत राहिल्या पाहिजेत असा निर्धार करूनच करकोचा घरी परतला.
*****
आजकाल कावळा इतर प्राण्यांना कोल्हा आणि करकोच्यांच्या संस्कृतीवर भाषणे देत फिरत असतो. आणि घरी कावळ्याची मुलंबाळं (करकोच्याकडून मिळालेल्या) कोल्हासंस्कृतीय ताटवाटयातून (कोल्ह्याकडून मिळालेल्या) करकोचासंस्कृतीय पदार्थांचा आस्वाद घेत असतात. असं इतर प्राणी ऐकून आहेत.
*****
वरील गोष्ट हे रूपक आहे ही गोष्ट लक्षात आली असेलच. इथे कुठल्याही संस्कृतीवर दोषारोप करण्याचा उद्देश नाही. पण कुठल्याही संस्कृतीचे घटक असलेल्या मनुष्यस्वभावाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मात्र आहे.
इथे जपानात मी इंग्रजी तर शिकवतेच पण त्याचबरोबर जपानी मुलांना माझ्या देशाची ओळख करून देणे हादेखील माझ्या कामाचाच एक भाग आहे. म्हणूनच माझे जपानी विद्यार्थी आणि त्यांच्याच वयाचे भारतीय विद्यार्थी यांच्यात पत्रमैत्री घडवून आणली तर? अशी एक कल्पना मी शाळेत मांडली. असा प्रकल्प आधी कुणी केला नसल्याने त्याला बजेट नाही. त्यामुळे पोस्टेजचा खर्च उचलण्याचीही मी तयारी दाखवली. पण माझ्या शाळेतल्या फक्त तीन मुलींनी प्रत्येकी पाच ओळींची पत्र लिहिण्याएवढाच उत्साह दाखवला. बरोबरच आहे म्हणा…आपण ज्यांना बाटल्यांची बुचं आणि पैसा पाठवतो अशा मुलांशी मैत्री करण्यात इथल्या मुलांना अजिबात रस नव्हता.
त्याच सुमारास इटालीच्या एका शाळेकडूनही अशीच ऑफर आली. आणि काय गम्मत! जादूची कांडी फिरवल्यासारखी अख्खी शाळा कामाला लागली. व्हिडिओ तयार केले, चित्रं काय काढली, पत्रं काय लिहिली (एवढी पत्र आली की शेवटी निवड करावी लागली! ती निवडक पत्र तपासून सुधारणा मीच करून दिल्या!) ते सगळं इटालीला पाठवून जपानी मुलं उत्तराच्या अपेक्षेत होती.
आणि उत्तर आलं. तिथल्या मुलांनी काढलेली काही चित्र आणि काही पत्र होती. सगळे विद्यार्थी शाळेच्या हॉलमधे जमा झाले आणि मुख्याध्यापकांनी मोठ्या अपेक्षेने एक पत्र उघडलं. आणि त्यांचा चेहराच पडला. ती सगळी पत्र चक्क इटालियन भाषेत लिहिलेली होती. जपानी मुलांना इटालियनमधून लिहिलेली पत्रे वाचता येणार नाहीत हा साधा विचारही कोणाच्या मनात येऊ नये ह्याचं मला प्रचंड आश्चर्य वाटले. ह्यापेक्षा आमच्या शाळेतल्या मुलांना पत्रे पाठवली असतीत तर त्याचे तुम्हाला कळेल अशा भाषेत नक्कीच उत्तर आले असते असे सांगावेसे वाटले पण सांगून काही उपयोग होईल असं वाटलं नाही म्हणून शांत बसले.
पण तरीही मी इटालीहून मिळालेल्या मिठाया खाल्ल्याच, झालंच तर त्या सगळ्या पत्रांचे आधी इंग्रजीत आणि नंतर जपानीत भाषांतरही केले आणि इथून इटालीला पाठवलेल्या सगळया व्हिडिओजच्या कॉप्या करून घेतल्या. न जाणो पुढेमागे जपानी शाळांवर बोलायची, लिहायची वेळ आलीच तर त्यांचा मला चांगलाच उपयोग होईल.

प्राजूची “प्रिय सौ. आईस” नावाची मिपावरची कविता वाचून सुचलेलं काहीतरी...एका आईचं मनोगत. ही मी केलेली पहिलीवहिली कविता (?) असल्याने चु.भु.द्या.घ्या. कल्पना फार पूर्वी वाचलेल्या इंग्रजी कवितेवरून सुचली असली तरी भावना आणि शब्द एकदम वोरिजिनल!

मला आजही आठवतंय माझं बाळ…
पाळणाघराच्या खिडकीत बसून
माझी वाट बघणारं…
धावत येऊन मला बिलगणारं…
माझ्या हातात असायच्या पिशव्या
भाजी, खाऊ, खेळणी, जबाबदा-यांनी गच्च भरलेल्या…
अगदी तळाशी असायचं दबलेलं माझं तुझ्यावरचं प्रेम…
रस्ताभर तुझी माझ्यातल्या आईशी बडबड आणि माझी माझ्यातल्या प्रोफेशनलशी!
“उद्या शाळेत नां”…"बहुतेक ओव्हरटाईम करावा लागणार!”
“आज माझी वही”…"डेडलाईन पुन्हा उलटून जाणार!”
“आई उद्या शाळेत सोडायला येशील?”…"९.२७ नंतर एकदम ९.५६!”

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे…
तुझं बोट धरून यायचं होतं गं…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल…
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले…
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

आणि एक दिवस खरंच…
झालीस की गं मोठी!
आता मी रोज संध्याकाळी…
दारात उभी असायची तुझी वाट पहात…
तुझ्याशी राहिलेलं सगळं बोलायचं होतं…ऐकायचं होतं!
पण आजही तू निघून गेली होतीस…
तुझ्या स्वप्नांच्या गावाला…
आणि मी राहिले मागेच
तुला निरोपाचे हात हलवत…

आजकाल ऐकते तुला फोनवर…
कधी ई पत्रातून भेटते…
अश्शीच बोलत रहातेस भडाभडा…
तुझ्या बाळाबद्दल, त्याच्या शाळेबद्दल,
डबे, लोकल, डेडलाईन्सबद्दल…
खरं खरं सांगू…
लांब असलीस नां तरी
फार फार जवळ वाटतेस तेव्हा!

;;