धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात. दूरवर बघावं तर झाडं, घरं, डोंगर, गाडया एक आकार बनून कधीच त्या बर्फात विलीन झालेले असतात. डिसेंबरला जुनं वर्ष पूर्ण करून आपल्या घराकडे परत जाण्याची इतकी घाई असते म्हणूनच की काय दिवसही आपसूक लहान होतात. घरापासून दूर असलेल्या प्रत्येक जपानी माणसाला ह्यावेळी त्या डिसेंबरसारखीच आपापल्या घराची ओढ लागलेली असते. नवीन वर्षाच्या उंबरठय़ावर जपानी घरं मुलाबाळांनी, भावाबहिणींनी, दीरजावांनी भरून जातात. ऋतुचक्राबरोबरच कुटुंबाचं चक्रही संपूर्ण होतं. डिसेंबर महिना जाता जाता हवेत गारठा आणि घरात ऊब मागे ठेवून जातो.

नवीन वर्षाचा आनंद खरंतर जगभरात साजरा केला जातो. पण जपानमधे मात्र त्याला वर्षानुवर्षाच्या परंपरांचं कोंदण आहे. जपानीत नवीन वर्षाच्या सोहळ्याला “ओशोगात्सु” (お正月) असं म्हणतात. आपली दिवाळी जशी अनेकविध धर्मांच्या भारतीयांना एकत्र आणते, तसंच ओशोगात्सुचा सणही शिंतो आणि बौद्ध ह्या जपानमधील दोन धर्मांतील परंपरांचा सुंदर मिलाफ घडवून आणतो. जपानी माणूस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बौद्ध देवळात घुमणा-या पितळी घंटेचे १०८ टोले (जोयानो काने) ऐकण्यासाठी जेवढा आतूर होतो तेवढयाच श्रद्धेने नवीन वर्षाच्या पहाटेला जिंजात जाऊन शिंतो देवदेवतांपुढेही नतमस्तक होतो (“हात्सुमोदे”). इतर वेळेस यंत्रवत काम करणा-या जपानी माणसाचं घरगुती, लेकुरवाळं रूप ओशोगात्सुच्या निमित्ताने पहायला मिळतं.
त्यामुळेच ओशोगात्सुचे सोहळे पाहिले की मला घरच्या दिवाळीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
दस-याला घटांची पाठवणी झाली की माळ्यांवरच्या लांब झाडूंना, कंदिलांच्या सांगाडयांना, चकलीच्या सो-यांना, रांगोळीच्या रंगांना, ठिपक्याच्या कागदांना आलेली जाग...
फराळांच्या वासांतून, डुलक्या घेणा-या शांततेत मधेच टचकन उडणा-या टिकल्यांतून, खरेदीच्या पिशव्यांतून ओसंडून वाहणारी दिवाळी...
नरकचतुर्दशीच्या पहाटे फटाक्यांच्या धुमधडाक्यात ऐकलेलं रेडिओवरचं कीर्तन, कंदिलाच्या हेलकावणा-या प्रकाशात चमकणारे रांगोळीतले रंग, रांगोळीत पणत्या ठेवणारी आई आणि पणतीच्या मिणमिण प्रकाशातही लख्ख उजळणारं तिच्या तोंडावरचं हास्य.
नरकचतुर्दशीच्या दिवशी आई कारीट फोडायला द्यायची. पुढे कळलं की कारीट हे नरकासुराचं प्रतीक आहे. नरकासुरासारख्या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट झाल्याचा आनंद म्हणून दिवाळी साजरी करायची. अर्थ कळला न कळला तरीदेखील आमचा आनंद मात्र त्या कारीटावर पाय देऊन गचकन त्यातून बाहेर सांडणा-या बिया पहाण्यातच असे.

मला आठवतंय दिवाळीत काकाच्या, मामाच्या, आत्याच्या घरून, झालंच तर शेजार पाजारूनही आवर्जून फराळाच्या पिशव्या घरी येत. मग आई त्या सगळ्या पुडया उघडून त्यातल्या चकल्या, शेव, कडबोळी, करंज्या वगैरे घरच्या फराळात मिसळून टाकत असे. चकली शेवेच्या विविध पिवळ्या छटा, कातलेल्या / दुमडीच्या करंज्यांच्या ओल्यासुक्या सारणांच्या विविध चवी, घरोघरच्या तेलातुपाचे खमंग वास सारे एकाच डब्यांत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असत. देवदिवाळी झाली तरी फराळ संपता संपत नसे. प्रत्यक्षात अव्यक्त असलेल्या सगळ्या भावना अशा देवाणघेवाणीतून व्यक्त होत. ऐन दिवाळीतले फराळाचे डबे म्हणजे फक्त फराळाचीच नव्हेत तर ह्या सद्भावनांचीच अक्षयपात्रे होते.
जपानात नववर्षाला भेटवस्तू नाही तर भेटकार्डे पाठवण्याची पद्धत आहे. पोस्टऑफिसेससाठी वर्षाअखेरीचा हा काळ अतिशय धावपळीचा असतो. नोव्हेंबरपासूनच सगळ्या पोस्टांमध्ये खास भेटकार्डांसाठी वेगळी पेटी ठेवली जाते. २५ डिसेंबरपर्य़ंत पोस्टात पडलेली सर्व भेटकार्डे बरोब्बर एक जानेवारीला जपानभर घरोघरी पोचवली जातात. अगदी सामान्यातला सामान्य जपानीसुद्धा जर दरवर्षी जवळजवळ ५०-६० भेटकार्डे पाठवतो. त्यावरून पोस्टाच्या कामाची आणि तत्परतेची कल्पना यावी. भेटकार्ड पाठवतानाही नुसताच छापील मजकूर नाव घालून पाठवायचा असं नाही. तर को-या कार्डांवर आपले, मुलाबाळांचे, घराचे, अगदी घरी हौसेने पाळलेल्या कुत्र्या-मांजरांचेदेखील फोटो छापून, प्रत्येक कार्ड ज्याला पाठवायचं त्याची आठवण काढत, त्याच्या सहवासात घालवलेल्या क्षणांची उजळणी करत मोठया निगुतीने लिहिलं जातं. वर्षाच्या पहिल्या दिवशी आप्तेष्टमित्रांकडून आलेली असंख्य भेटकार्ड पहातानाचा आनंद खरंच त्या मिचमिच डोळ्यांत मावत नाही. फरक असला तर तो एवढाच की आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो, तर इथले लोक आठवणींची!
कुठलाही सण खाण्याशिवाय अपूर्ण राहतो. जपानी ओशोगात्सुचं खाणं आणि पिणं म्हणजे “ओसेची” आणि “ओतोसो”. नवीन वर्षी देवही (तोशीगामी)घरी जेवायला येतात असं जपानी लोक मानतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी दारावर “शिमेनावा” बांधतात. दारासमोर “कादोमात्सु” ठेवतात. ओसेची खायलाही खास चॉपस्टिक्स वापरतात. त्यांना “इवाई बाशी” असं म्हणतात. नेहमीच्या चॉपस्टिक्सची खायची बाजू निमुळती आणि धरायची बाजू थोडी जाड असते; इवाई बाशीच्या दोन्हीही बाजू निमुळत्या असतात. म्हणजे एका बाजूने आपण जेवत असतानाच त्याच चॉपस्टिक्सने आपल्याबरोबर देवही जेवत असतात! बहुतेक देवाच्या अथांग आकाशातही भरल्या घरातल्या अगत्याची, प्रेमाची, लटक्या रागाची ऊब नसावी. त्यासाठी त्यालाही असं इथे मातीतच उतरून यावं लागतं!


इतर कुठल्याही जपानी जेवणाप्रमाणेच ओसेचीही रंगीबेरंगी असते. लाखेची नाजूक सोनेरी कलाकुसर केलेल्या लाकडी जुबाकोच्या काळसर तपकिरी रंगावर भाज्यांचं ताजे रंग अधिकच उठून दिसतात. नवीन वर्षाचा सण एक जानेवारीपासून थेट सहा जानेवारीपर्य़ंत चालतो. पूर्वी ह्या संपूर्ण आठवडयात जपानी घरात चूल पेटत नसे. त्यामुळे पारंपारिक ओसेची ही अगदी भात, भाज्या, लोणची, कोशिंबीरी अशी डाव्या उजव्या बाजूंनी परिपूर्ण असते. नवीन वर्ष धनधान्याचं, समृद्धीचं, दीर्घयुष्याचं जावं म्हणून ओशोगात्सु साजरा करायचा. म्हणून मग ओसेचीत कुठले पदार्थ वापरावेत ह्याचे फार मजेशीर जपानी संकेत आहेत. ते कधी त्यांच्या दिसण्यावरून पडतात; कधी नावांवरून. उदाहरणार्थ एबि (海老) म्हणजे आपली कोळंबी. चित्रलिपी पाहिली तर कोळंबी म्हणजे चक्क “समुद्रातले आजोबा”. कारण कोळंबीच्या पाठीला बाक असतो. झालंच तर मिशा हे इथे बुद्धिमत्तेचं लक्षण मानतात. म्हणूनच कोळंबी खाल्ल्याने दीर्घायुष्य आणि विद्वत्ता लाभते असं मानतात. ताझुकुरी नावाचे छोटे मासे पूर्वी भाताच्या रोपांना खत म्हणून वापरले जात. म्हणूनच नवीन वर्षात शेतीची भरभराट होण्यासाठी ताझुकुरी खाण्याची पद्धत! अशा नितांतसुंदर साग्रसंगीत ओसेचीला नकळत डोळ्यांनीच चित्राहुती घातली जाते. घरच्यांच्या समाधानातून, हास्यविनोदातून नवीन वर्षात पुन्हा नव्याने कष्ट करण्याची उमेद येते. प्रथा भारतीय असो किंवा जपानी. हे सारं आपण आजही का करतो? “मी कोण आहे?” असा प्रश्न पडतो तेव्हातेव्हा अशा वरकरणी अनाकलनीय परंपराच आपल्याला आपण एखाद्या समृद्ध संस्कृतीचा अंश असल्याची आठवण करून देतात, पूर्वजांशी आपली नाळ अजूनही तितकीच घट्ट जोडलेली असल्याची सुखद जाणीव करून देतात. जसजसा काळाचा पट उलगडत जातो तसं जीवनमानही बदलत जातं. पण त्याचबरोबर शतकानुशतकांच्या परंपरांचं, विचारांचं संचितही एका पिढीकडून दुस-या पिढीकडे सोपवलं जातं. फुलांच्या ताटव्यातून स्वच्छंदपणे उडणा-या रंगीबेरंगी फुलपाखराचे नाजूक पंख धरायला जावं तर ते क्षणात दूर निसटून जातं. “संस्कृती म्हणजे काय?” ह्याचा शोध घेतानाही नेमकं असंच होतं. कारण तो अर्थ जाणीव नेणीवेच्या अधेमधे कुठेतरी दडलेला असतो. संस्कृतीचं हे फुलपाखरू कदाचित कुणीच पकडू शकणार नाही. पण त्याने आपल्या हातांवर मागे ठेवलेले प्रथांचे, रिवाजांचे रंग मात्र पुसू म्हटलं तरी कधीच पुसले जाणार नाहीत.

;;