असेच गणपतीचे दिवस. दणकवून झालेल्या आरत्या, डाव्या उजव्या बाजूंचं साग्रसंगीत जेवण, अटीतटीने खाल्लेले मोदक आणि मोदकांवर तुपाएवढांच पळ्यांनी पडणारा आग्रह असं झोपेचं मस्त रसायन जमलं होतं. पण लवकरच पाहुण्यांची ये-जा सुरु होणार म्हणून प्रत्येकाचंच बाजीप्रभू होऊन खिंड लढवणं चालू होतं. एवढयात कोणीतरी ताईच्या लग्नाचा अल्बम आणला आणि मग गप्पा पुन्हा रंगात आल्या. ब-याच वेळाने लक्षात आलं. आत्तापर्यंत अखंड चिवचिव करणारं, मावशीला टेडी बेअर समजून चिवळणारं माझं भाचरू कुठे गेलं? आतल्या खोलीत शोधलं, बाहेर शोधलं, अगदी शेजारी पण विचारलं त्यात ५-७ मिनिटं गेली असतील नसतील तेवढयात स्वयंपाकघरातून एक ठणठणीत आवाज आला. “मी इथे आहे!” (“तुम्हाला मोठया माणसांना एवढं साधं कसं कळत नाही?” असं मनात असताना सात्विक रागाचा जो एक नैसर्गिक टोन लागेल तोच टोन…अर्थात तिच्या दृष्टीने पोकेमॉनमधल्या पिकाचू आणि बल्बासॉरची लढाई झाली तर कोण जिंकेल हे सांगता न येणारं कोणीही लहानंच होतं! त्यामुळे नेमकं उलट तिच्या मनात आलं नसेलच असं नाही)
चेहरा स्वयंपाकघरातल्या फ्रीज आणि कपाटाच्या खबदाडीत बसल्याने घामाघूम आणि रागाने अधिकच गोलगरगरीत झालेला होता. अगदी थेट कंपासने वर्तुळ काढावं तसा! डोळे एकटक तिच्या आईवर रोखलेले… तेव्हा क्षणभर त्या टपो-या बोलक्या डोळ्यांना सांगावंसं वाटलं “तुम्ही जरा गप्प बसलात तरच मला तिचं बोलणं ऐकता येईल.” अशा सगळ्या एकंदर अवतारावरून मेलोड्राम्याची चिन्ह स्पष्टच दिसत होती.
“सांग बरं काय झालं??” ताई.
“तुम्ही माझे आई-बाबा आहात नां?” एकदम सिरियस सन्नाटा. (पाठीमागे एखादं शोकसंगीत असतं तर एकदम थेट क-केविलवाणा प्रसंग झाला असता!)
“अगं हो. असं का विचारतेस?” तिच्या आईचा सांत्वन मोड
“मग तुमच्या लग्नाला मला का नाही बोलावलंत? माझा एकपण फोटो नाहीए.”
अगदी तोंडाशी आलेलं हसू दाबत तिला मिठीत घेत शक्य तितक्या सहजपणे ताई म्हणाली,”मनू सॉरी! पण तुझा जन्म थोडा उशिरा झाला म्हणून… नाहीतर नक्की बोलावलं असतं तुला…”
“मी माझ्या बच्चूला माझ्या लग्नाला नक्की बोलावणार आहे”….तिच्या ह्या जाहीरनाम्यावर सगळ्यांनी खोखो हसून घेतलं.
*****
आणि असाच त्या दिवशी तोमोमीच्या लग्नाचा अल्बम पहात होतो. तेव्हा फोटोतल्या एका गोब-या गालांच्या किमोनो घातलेल्या छ्बकडीकडे बोट दाखवून ती म्हणाली,” ही रेना. माझी मुलगी. आता किती वेगळी दिसते नाही!”
इथे माझा आश्चर्याने आ वासलेला आणि मला ह्यात आश्चर्य वाटावं ह्याचे तोमोमीला आश्चर्य! अशा आश्चर्यांच्या देवाणघेवाणीलाच “सांस्कृतिक धक्का” म्हणत असावेत कदाचित.
तर ह्या सांस्कृतिक धक्क्यातून सावरत माझ्या निरागस मनात जे आगाऊ प्रश्न आले ते शक्य तितक्या नम्रपणे विचारले. “तुझ्या लग्नात तुझी मुलगी यावी हे कसं बरं झालं?”
“त्यात काय विशेष? इथे असं कितीतरी वेळा होतं!” माझ्या आश्चर्यात भर.
शेवटी एकदा सरळच विचारून टाकलं,” तुझं लग्न तुझ्या मुलीच्या जन्मानंतर कसं झालं?”
“तसं नाही काही. नव-याच्या family register मध्ये माझ्या नावाची नोंद झाली की रीतसर लग्न झालं असं आम्ही मानतो. लग्नाचा वाढदिवसही त्या नावनोंदणीच्या दिवशीच साजरा करतो. जिंजामध्ये जाऊन देवाच्या साक्षीने ’फक्त’ विधी होतात. ह्या लग्नविधी आणि रिसेप्शनच्या खर्च ४०,००००-५०,०००० येनच्या जवळपास होतो. तो करण्याची ऐपत आली की मग विधी केले तरी चालतात. मी दोन मुलांची आई झाल्यावर कुठे पुरेसे पैसे आम्ही साठवू शकलो.”
“एवीतेवी मुलं झालीच होती तर मग एवढया वर्षांनी ते ’फक्त’ विधी करण्याची काय गरज?” असाही प्रश्न मला पडलाच. (पण असले प्रश्न विचारायला सुधीर गाडगीळ असावं लागतं सई मुंडले नाही हे वेळीच लक्षात येऊन आवरलं.)
*****
चला म्हणजे फ़ारा वर्षापूर्वी माझ्या चिमखडया भाचीच्या बालमुखातून बाहेर पडलेले बोल जपानात खरे होऊ शकतात म्हणायचं म्हणून तिला फोन केला तर ती म्हणाली,”अगं तेव्हा मी लहान होते; पण आता मोठ्ठी झालिए. मला माहित्येय की लग्न झाल्यावरच बच्चू होतं. मग त्याला नाहीच बोलावता येणार नां आईबाबांच्या लग्नाला! तिने एप्रिल फूल केलं असेल तुला!”
ती आणि मी दोघीही किती बदलल्या आहोत ह्या विचाराने तेव्हासारखंच आत्ताही हसायला आलं.

हाइकू हा नावाप्रमाणेच चिमुकला (जपानमध्ये जन्मला म्हणूनही असेल कदाचित!) पण अर्थपूर्ण काव्यप्रकार.
माझ्या शाळेतल्या जपानीच्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की हाइकूला यमकाचं बंधन नाही. पण अक्षरसंख्येवर आणि शब्दनिवडीवर मात्र आहे. तीन ओळीत अनुक्रमे ५-७-५ सिलॅबल आवश्यक आहेत. आता मराठी आणि जपानीत सिलॅबल्स मोजण्याची पद्धत सारखी असल्यामुळे मराठीत हाइकू रचताना इंग्रजीएवढा प्रश्न येणार नाही. (उदा. हाइकू ह्या शब्दात हा-इ-कू अशी तीन सिलॅबल्स आहेत.)
हाइकू रचताना “किगो” नावाच्या खास हाइकूसाठी वापरल्या जाणा-या शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे. हे शब्द रोजच्या बोलण्यात वापरले जात नाहीत. मराठीत उदाहरण द्यायचं झालं तर मला ऐवजी मजला, झाड ऐवजी तरू असे खास कवितेसाठी राखून ठेवलेले शब्द आपल्याकडेही आहेतच. जपानमध्ये चारही ऋतूंचं आपापलं असं वैशिष्ठ्य आहे. ते दाखवणारे हे शब्द असतात. पण हे बंधन लोक आजकाल फारसं पाळत नाहीत.
झालंच तर ओळ संपताना “किरेगो” म्हणजे ओळीचा शेवट दाखवणारे शब्दही वापरणे आवश्यक आहे. उदा. या/केरी/ओरु वगैरे. आता इतर भाषेत हाइकू लिहिणे कठीण होण्याचं कारण म्हणजे हे केरी/ओरु वगैरे शब्दच अर्थवाही असतात. उदा. कुठल्याही क्रियापदाला जोडून केरी आलं की त्या क्रियापदाचा अर्थ सरधोपट न रहाता “असं असेल का?” असा होतो. उदा. “वातारू” ह्या क्रियापदाचा साधा अर्थ “ओलांडणे” असा आहे. पण हेच जर मी “वातारीकेरी” असं म्हटलं तर “क्षयझ काहीतरी ओलांडत असेल का?” असा अर्थ सूचित होतो. (म्या पामराला ’जणू, भासे, गमे असे देशी शब्द आठवले!) ह्या छोट्याशा शब्दात अर्थाच्या खाणी असतात असं त्या म्हणाल्या. त्यामुळे इतर भाषेत इतक्या कमी शब्दांत पण तितक्याच प्रभावीपणे अर्थ व्यक्त करता येईलंच असं नाही.
साधारणपणे हाइकूचा विषय निसर्ग असतो. विषेशत: साध्याशाच गोष्टीतून नव्याने जाणवलेले काहीतरी, नैसर्गिक चमत्कार पाहिल्यावर कवीच्या मनात उमटणारे भाव, एखाद्या वेगळ्याच कोनातून टिपलेला निसर्ग वगैरे. उदा. माझ्या गावात एक जुना आणि अवाढव्य दगडी पूल आहे. त्याची उंची जवळजवळ ३० एक मीटर असावी. मध्यरात्री त्या पुलाखालून जाताना कवीला अचानक भास झाला की आत्ता कुणीतरी तो पूल ऒलांडून जात आहे. पण पाहिलं तर वर कुणीच नव्हतं. मग तो म्हणतो की कदाचित चंद्रच असावा! पुष्कळ प्रयत्न करूनही ही कल्पना मला मराठी हाइकूत नाही उतरवता आली. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं!
आता एकदम वोरिजिनल, गरमागरम भज्यांसारखी कुरकुरीत कल्पना सुचेपर्यंत हाइकूदेवतेची प्रार्थना करणे किंवा तोपर्यंत इतर दिग्गजांनी तळलेल्या आयत्या भज्यांवर ताव मारणे ओघाने आलेच!

;;