भेळ

बाहेरच्या लोकांसाठी मुंबईची ओळख जरी उद्योगसंस्कृती अशी असली तरीही मला मात्र मुंबईची खाद्यसंस्कृतीच जास्त भुरळ घालते. पिझ्झा हट्, मॅकडोनाल्डस्, सब्-वे अशा परकीय आक्रमणांना न जुमानता चाट, सॅन्डविच्, डोसा, वडापाव विकणारे असंख्य एतद्देशीय भय्या, दादा, काका, अण्णा हे मुंबईकरांच्या उदराभरणाचा गाडा सुखेनैव हाकत आहेत. मुंबईकरांच्या रसनेची आणि त्याचबरोबर खिश्याचीही काळजी घेणारी ही चालतीबोलती रेस्टॉरंट्स हेच मुंबईचे खरे वैशिष्टय आहे असे मला वाटते.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीविषयी बोलताना अग्रपूजेचा मान चाटचा आणि त्यातही भेळेचा (की भेळीचा?) काही जण मानतात की भेळ गुजरातहून आली, तर काही जण म्हणतात उत्तरप्रदेशातून. (पण भेळ बनवणा-यांसाठी भय्या हे कॉमन संबोधन असल्यामुळे भेळेचा जन्म एखाद्या उत्तरप्रदेशीय रसोईत झाला असावा हे माझे मत) पण भेळेचा बनिया संस्कृतीशी जवळचा संबंध असावा. गल्ल्यावर बसल्याबसल्या तोंडाला चाळा म्हणून कुरमुरे, शेव आणि चाट मसाला ह्यांचे मिश्रण जन्माला आले असावे. नंतर कुण्या देशीच्या बायडीने (बुवानेही असेल कदचित!) त्यात आपल्या कल्पकतेची भर घालून आजची साग्रसंगीत भेळ तयार झाली असावी. भेळेचं माहेर कुठेही असो. आज ती सासरी सुखाने नांदते आहे.

भेळेचा USP हा की ती चुटकीसरशी तयार होवू शकते. तळणे, शिजवणे, भाजणे ही भानगड नसल्यामुळे एकदा का कच्चा माल तयार असला की पाचव्या मिनिटाला खायला सुरुवात करता येते.
पण रस्त्यावरच्या भेळेचा ख्ररा आनंद लुटायला थोडं आंधळं व्हावं लागतं. भय्याच्या हातांचा रंग, चटणीसाठी वापरलेलं पाणी वगैरेचा विचार करायला लागलात तर भेळ तुमच्या कधीच पचनी पडणार नाही. फक्त कल्पना करा की समोर निळाशार समुद्र पसरलेला आहे, त्या स्वच्छ किना-यावर भेळेचं एक टुमदार दुकान आहे. तुम्ही तिथे गेल्यावर पांढराशुभ्र एप्रन नेसलेला भय्या अदबीने तुमचे स्वागत करीत आहे आणि ग्लोव्ह्ज घालून नुकत्याच निर्जंतुक केलेल्या पातेल्यात टी-स्पून टेबलस्पूनच्या मापाने भेळ बनवतो आहे. शेजारीच एका फलकावर भेळेच्या आहारमूल्याचा एक तक्ता लिहिलेला आहे. हे चित्र म्हणूनच ठीक आहे. पण प्रत्यक्षात भय्या जर असे वागू लागला तर लोक नक्कीच त्याच्या एक ठेवून देतील आणि त्याला भानावर आणतील. (“बागबान” नावाचा एक अतिशय सुमार हिन्दी चित्रपट पाहिला आहात का? त्यातल्या सलमान खानच्या अतिचांगुलपणामुळे मला अशीच एक ठेवून द्यावीशी वाटत होती!) जी गोष्ट भेळेची तीच पाणीपुरीची. लाल फडकं लपेटलेल्या स्टीलच्या घड्यात न बुचकळलेली पाणीपुरी खाल्ली तर माझं पोट नक्कीच बिघडेल! The secrets of a perfect bhel/panipuri lie in these imperfections! नाही म्हणायला मिनरल वॉटर पाणीपुरी नावाचे एक फॅड आले होते कधीतरी. पण मुंबईकरांना फार काळ मानवले नाही.
जुहूचा किनारा, खारी हवा, सुखद गारवा, आणि वाळूत अंथरलेल्या चटईवर बसून सूर्यास्त पहात आणि नाकाडोळ्यातलं पाणी परतवत कागदी द्रोणातल्या अगदी तळाशी रहिलेल्या चुरमु-यापर्यंत खाल्लेली झणझणीत पण चटकदार भेळ! तिची सर पंचतारांकित हॉटेलातल्या जेवणालाही येणार नाही. अगदी फुकट असलं तरीही…अशा भेळेच्या कर्त्याकरवित्याविषयी पुन्हा कधीतरी!

3 Comments:

  1. Unknown said...
    This is fabulous!! Truely mouth-watering and creates a nostalgia for the various Indian street foods! Keep it going!
    संदीप चित्रे said...
    सईsssss
    माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलायस. मी भेळेसाठी बाकी कुठलाही पदार्थ बाजूला ठेवू शकतो. म्हणजे सीकेपी असूनही मासेसुद्धा बाजूला ठेवू शकतो कारण भेळेची सर कशालाच नाही. माझ्या ब्लॉगवर ’थेट भेट’ नावीची लिंक आहे. तिथून मला इ-मेल पाठव. आपली मैत्री मस्त जमेल कारण मलाही भरपूर बोलायला आवडतं, वाचायला-लिहायला आवडतं आणि मुख्य म्हणजे भेळ आवडते. मी भारतवारीहून न्यू जर्सीला परत येताना पुण्यातल्या आमच्या भेळवाल्याकडून थोडया चटण्या घेऊन येतो !!! :)
    संदीप चित्रे said...
    सईssss...
    माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलायस. मी भेळेसाठी बाकी कुठलाही पदार्थ बाजूला ठेवू शकतो. म्हणजे सीकेपी असूनही मासेसुद्धा बाजूला ठेवू शकतो कारण भेळेची सर कशालाच नाही. माझ्या ब्लॉगवर ’थेट भेट’ नावीची लिंक आहे. तिथून मला इ-मेल पाठव. आपली मैत्री मस्त जमेल कारण मलाही भरपूर बोलायला आवडतं, वाचायला-लिहायला आवडतं आणि मुख्य म्हणजे भेळ आवडते. मी भारतवारीहून न्यू जर्सीला परत येताना पुण्यातल्या आमच्या भेळवाल्याकडून थोडया चटण्या घेऊन येतो !!! :)

Post a Comment