हाइकू हा नावाप्रमाणेच चिमुकला (जपानमध्ये जन्मला म्हणूनही असेल कदाचित!) पण अर्थपूर्ण काव्यप्रकार.
माझ्या शाळेतल्या जपानीच्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की हाइकूला यमकाचं बंधन नाही. पण अक्षरसंख्येवर आणि शब्दनिवडीवर मात्र आहे. तीन ओळीत अनुक्रमे ५-७-५ सिलॅबल आवश्यक आहेत. आता मराठी आणि जपानीत सिलॅबल्स मोजण्याची पद्धत सारखी असल्यामुळे मराठीत हाइकू रचताना इंग्रजीएवढा प्रश्न येणार नाही. (उदा. हाइकू ह्या शब्दात हा-इ-कू अशी तीन सिलॅबल्स आहेत.)
हाइकू रचताना “किगो” नावाच्या खास हाइकूसाठी वापरल्या जाणा-या शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे. हे शब्द रोजच्या बोलण्यात वापरले जात नाहीत. मराठीत उदाहरण द्यायचं झालं तर मला ऐवजी मजला, झाड ऐवजी तरू असे खास कवितेसाठी राखून ठेवलेले शब्द आपल्याकडेही आहेतच. जपानमध्ये चारही ऋतूंचं आपापलं असं वैशिष्ठ्य आहे. ते दाखवणारे हे शब्द असतात. पण हे बंधन लोक आजकाल फारसं पाळत नाहीत.
झालंच तर ओळ संपताना “किरेगो” म्हणजे ओळीचा शेवट दाखवणारे शब्दही वापरणे आवश्यक आहे. उदा. या/केरी/ओरु वगैरे. आता इतर भाषेत हाइकू लिहिणे कठीण होण्याचं कारण म्हणजे हे केरी/ओरु वगैरे शब्दच अर्थवाही असतात. उदा. कुठल्याही क्रियापदाला जोडून केरी आलं की त्या क्रियापदाचा अर्थ सरधोपट न रहाता “असं असेल का?” असा होतो. उदा. “वातारू” ह्या क्रियापदाचा साधा अर्थ “ओलांडणे” असा आहे. पण हेच जर मी “वातारीकेरी” असं म्हटलं तर “क्षयझ काहीतरी ओलांडत असेल का?” असा अर्थ सूचित होतो. (म्या पामराला ’जणू, भासे, गमे असे देशी शब्द आठवले!) ह्या छोट्याशा शब्दात अर्थाच्या खाणी असतात असं त्या म्हणाल्या. त्यामुळे इतर भाषेत इतक्या कमी शब्दांत पण तितक्याच प्रभावीपणे अर्थ व्यक्त करता येईलंच असं नाही.
साधारणपणे हाइकूचा विषय निसर्ग असतो. विषेशत: साध्याशाच गोष्टीतून नव्याने जाणवलेले काहीतरी, नैसर्गिक चमत्कार पाहिल्यावर कवीच्या मनात उमटणारे भाव, एखाद्या वेगळ्याच कोनातून टिपलेला निसर्ग वगैरे. उदा. माझ्या गावात एक जुना आणि अवाढव्य दगडी पूल आहे. त्याची उंची जवळजवळ ३० एक मीटर असावी. मध्यरात्री त्या पुलाखालून जाताना कवीला अचानक भास झाला की आत्ता कुणीतरी तो पूल ऒलांडून जात आहे. पण पाहिलं तर वर कुणीच नव्हतं. मग तो म्हणतो की कदाचित चंद्रच असावा! पुष्कळ प्रयत्न करूनही ही कल्पना मला मराठी हाइकूत नाही उतरवता आली. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं!
आता एकदम वोरिजिनल, गरमागरम भज्यांसारखी कुरकुरीत कल्पना सुचेपर्यंत हाइकूदेवतेची प्रार्थना करणे किंवा तोपर्यंत इतर दिग्गजांनी तळलेल्या आयत्या भज्यांवर ताव मारणे ओघाने आलेच!

7 Comments:

  1. Sumedha said...
    सही! Thanks ग सई!

    जपानी भाषेत नेहेमीच अगदी कमी कांजीत खूप काही सांगता येतं हे माहीत होतं. अखेर चित्रलिपीच ती. पण एकेक कांजी अगदी कमी syllable मधे उच्चारली जाऊ शकते हे लक्षात नव्हतं आलं. काय जादू आहे भाषेची! म्हणूनच मराठीत तसंच्या तसं उतरवणं अवघड आहे न? पण प्रयत्न केला!

    नीरव राती
    चाहूल कोणाची गे?
    चांद लबाड!
    Akira said...
    Sae,

    Nice write up! :) ...Mala sakhali haiku karta kho milala ahe tevha he wachun theory pakki kartye ;)

    Sumedha,

    Tujhi ithli haiku masta ahe...I see a haiku-queen in the making :)
    प्रशांत said...
    छान माहिती दिलीस हाईकूची.
    नियम तंतोतंत पाळून हाईकू करणं थोडं अवघड आहे. पण भविष्यात प्रयत्न अवश्य करेन.
    a Sane man said...
    Thanks for this.

    I searched internet (mainly wikiepedia) for this when Sumedha started that chain on her blog...and there was so much confusion regarding 5-7-5 that I gave up. Thanks for this write up!
    Saee said...
    प्रशांतने एक चांगला प्रश्न विचारला. “हाइकू तो, ती की ते?” जपानीत लिंग हा प्रकारच नसल्यामुळे उत्तर देणं कठीण आहे. पण लिंग नाही म्हणूनच ते हाइकू म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं.
    आता माझंही नवंकोरं हाइकू.
    एकच चंद्र
    मनातला असो की
    खिडकीतला.
    Anonymous said...
    मस्त गं! छान माहिती मिळाली.
    बाकी नवीन काही पोस्टलं नाहीस का?
    sahdeV said...
    Just came across this blog... Sahi lihites! Keep posting!!! :)

Post a Comment